18 January 2019

News Flash

काले है तो क्या..

‘‘अरे, काळ्या साडय़ा त्यात टाकते, आता उकडतंय ना!’’ आजीने खुलासा केला.

|| सुचित्रा साठे

 suchitrasathe52@gmail.com

 

‘‘आजी, तू काय करते आहेस गं.’’ कपाट आवरण्याचा पसारा बघून ओंकार लगेच लुडबूड करायला धावत आला. उसकपासक करण्याचं काम तो तत्परतेने करू लागला.

‘‘अरे, काळ्या साडय़ा त्यात टाकते, आता उकडतंय ना!’’ आजीने खुलासा केला.

‘‘आता तू त्या नेसणार नाहीस का?’’ ओंकारचा प्रतिप्रश्न आलाच.

‘‘नाही, अरे थंडीत त्या नेसायच्या. कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो. त्यामुळे थंडीत शरीर गार पडू नये, तापमान कायम रहावं म्हणून ऋ तू आणि सण यांची सांगड घालावी लागते. संक्रातीला थंडी असते ना, म्हणून नुकतंच लग्न झालेल्या स्त्रीला कौतुकाने काळी साडी घेतो! लहान बाळांना बोरन्हाण घालण्यासाठी काळं झबलं शिवतो.

‘‘म्हणूनच का गं जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुकानांत शोकेसमध्ये जास्त करून काळ्या साडय़ा अडकवल्या जातात.’’ मुक्ताने निरीक्षण नोंदवलं.

‘‘आजी, मला फार आवडतो काळ्या रंगाचा ड्रेस.’’ थंडी कमी झाली म्हणून तो ड्रेस न वापरण्याची कल्पना मुक्ताला मान्य नव्हती.

‘‘तू जरूर घाल गं. पण त्या आधी काळा रंग आणखीन कुठे दिसतो ते शोधू या का?’’ आजीच्या सूचनेने सगळे क्षणभर विचारात पडले.

‘‘आजी, केस काळेभोरच छान दिसतात. ते पांढरे झाले ना की मग पुन्हा सारखा डाय लावून काळे करावे लागतात.’ रतीने महत्त्वाची नोंद केली.

‘‘काळेभोर डोळेही किती छान दिसतात नाही का!’’ मुक्ताचे टपोरे डोळे लकाकले.

‘‘लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या कपाळाला, गालाला, तळपायाला काळ्या काजळाचा मोठा टिळा लावतो.’’ -इति आजी.

‘‘आणि मग बाळाचा पापा घेताना तो आपल्या तोंडाला लागतो. माझं असं बऱ्याचदा होतं विराजला घेतल्यावर.’’ मुक्ताने अनुभवाचे बोल सांगितले.

‘‘पूर्वी काळ्या गंधाची म्हणजे तीटेची बाटली मिळायची. पण ती लावली की वाळेपर्यंत संभाळावं लागायचं. बाळाच्या हातवाऱ्यांनी दिवसातून एकदातरी तीटी फरफटायचीच. लग्न होईपर्यंत मुली काळं गंध लावायच्या.’’ आजीच्या बोलण्याचा रोख दोघींच्या लक्षात आला. एकमेकींकडे बघत त्यांनी हलकेच जीभ बाहेर काढली.

‘‘आजी, डान्सच्या वेळी मेकअप करताना आयलायनर, आय ब्रो पेन्सिल या काळ्या गोष्टी लागतातच. सगळा मेकअप पूर्ण झाल्यावर आम्ही काळा ब्युटीस्पॉट देतोच देतो.’’ रतीला काळा रंग आठवल्याचा आनंद झाला.

‘‘आजी, काळ्या रंगापेक्षा गोऱ्या रंगाला जास्त भाव असतो ना! मग खरंच हळद लावून गोरं होता येतं का?’’ मुक्ताने हळूच विचारलं.

‘‘छे गं, रंगावर काही नसतं. तुमच्यातले गुण महत्त्वाचे असतात. हा काळा सावळा रंग भारतीय म्हणून परदेशात आपली ओळख बनतो. प्रसन्न आणि हसरा चेहरा रंगावर मात करतो.’’ – इति आजी.

‘‘चित्र काढल्यावर मी चित्राला काळी बॉर्डर करतो ना तेव्हा ते एकदम भारी दिसतं. आणि एक गंमत सांगू का आई, माळा आवरताना जुनी डबल पाटी मला सापडली. मला त्याच्यावर लिहायला, पुसायला फार आवडतं. दसऱ्याला या पाटीवर आई सरस्वती काढून देते आणि मी पूजा करतो.’’ ओंकारने स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं.

‘‘लग्नानंतर मंगळसूत्र घालतात ते काळ्या मण्यांचंच असतं. लहान बाळाच्या हातात काळ्या मण्यांच्या मनगटय़ा घालतो.’’ आजी म्हणाली.

‘‘रंगीत चित्रपटांच्या आधी फक्त काळ्या- पांढऱ्या रंगातले चित्रपट होते ना, ते तुला आवडायचे का गं?’’ ओंकारने शंका विचारली.

‘‘हो तर.. कसं शांत वाटतं बघताना, डोळ्यांना त्रास होत नाही. काळा रंग अशुभ, वाईट, नकारार्थी समजला जातो. म्हणून आपली काळी बाजू लपविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. निषेध व्यक्त करताना काळ्या फिती, काळे बावटे याचा आवर्जून वापर केला जातो. काळंबेरं मनात येणं म्हणजे वाईट विचार मनात येणं. तोंड काळं करणं, तोंडाला काळं फासणं, काळं कुत्रंदेखील नसणं.. असे वाक् -प्रचार नकारात्मक अर्थाने वापरले जातात.’’ आजीने खूपच ‘अभ्यास’ ऐकवला.

‘‘आपण जमिनीला ‘काळीआई’ असं म्हणतो ना गं!’’- इति रती.

‘‘हो. पाण्याने भरलेले मेघ म्हणजे काळे मेघ. ते काळ्या मातीत बरसतात आणि हिरवं सोनं बाहेर येतं. आपण सगळे या काळ्या गोष्टींवरच तर अवलंबून असतो.’’ – आजी.

‘‘आमच्या बाई कधी कधी म्हणतात की, जरा पांढऱ्यावर काळं करा. म्हणजे लिहा, अभ्यास करा. ‘काळे’ असं आडनाव पण असतं की! वकिलांचा ड्रेस कोड काळा असतो. काळ्या रंगाची पिसं, चोच, जीभ, बोटं, एवढंच नव्हे तर रक्त आणि मांसही काळ्या रंगाचं असलेल्या कडकनाथचे म्हणजे कोंबडीचा भाव वाढल्याचे पेपरात वाचलं असेल ना.’’ रतीने आठवलेलं पटकन् सांगून टाकलं.

‘‘सर्वात मोठी काळी गोष्ट कोणती असते, आठवली का?’’ आजीने विचारताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्न चिन्ह उमटले.

‘‘अरे, रात्र काळी असते की नाही? या काळोखाची आपल्याला भीती वाटते. पण चोरांना नाही वाटत. चोरांचं चित्र काढलं तर काळा गॉगल घातलेला दाखवतो आपण त्याला. बरोबर ना!’’ लगेच ओंकारची गॉगल शोधण्याची धडपड चालू झाली.

‘‘रात्र काळी असते म्हणून तर चांदण्या लुकलुकताना चांगल्या दिसतात. गच्चीत जाऊन बघायला मला फार आवडतं.’’ रती मनाने गच्चीत पोहोचली होती.

‘‘रात्र झाली की आपण काय करतो ओंकार?’’ पेंगणाऱ्या ओंकारला आजीने जागे केले.

‘‘झोपतो.’’ ओंकारने झोपेतूनच सांगितलं.

‘‘निद्रा ही या काळ्या रात्रीनं दिलेली मोठी भेट आहे. झोप आली नाही तर काय अवस्था होते हे त्यावेळीच कळतं. सुखाची शांत झोप, माणसाला विश्रांती देते, निरोगी ठेवते. श्रावणातल्या कृष्णपक्षातल्या अष्टमीला गोपाळ कृष्णाचा जन्म झाला. काळ्या यमुनेतून वासुदेवांनी त्याला गोकुळात आणून सोडले आणि आनंदीआनंद झाला. रंग कुठलाही असला तरी सावली काळीच असते.’’ आजीने मुलांना आठवण करून दिली.

‘‘गंमतच आहे. कधी काळा रंग चांगला कधी वाईट. माणसासारखंच नाही का गं?’’ रतीला विषय नेमका कळला होता.

‘‘आजी हा कुणाचा पिटुकला फ्रॉक?’’ ओंकारला काहीतरी वेगळं सापडलं होतं.

‘‘अरे मुक्ताचा आहे तो लहानपणीचा. असाच ठेवून दिलाय.’’ आजीने माहिती दिली.

‘‘आजी, माझाही काळा टी-शर्ट ठेव ना तुझ्या कपाटात.’’ओंकारने धावतपळत टी-शर्ट आणून दिला.

‘‘मुक्ताचा फ्रॉक ठेवतेस, मग माझाही ठेव ना!’’ असा भाव त्याच्या डोळ्यांत उतरत होता.

आजीने हसून मान डोलावली आणि मोठय़ा कौतुकाने फ्रॉकबरोबर टी-शर्ट कपाटात टाकला.

First Published on April 29, 2018 12:06 am

Web Title: suchitra sathe story for kids 2