News Flash

वेगळेपण.. दोन नववर्षांमधलं!

 ‘आजी, आम्ही आलो,’ म्हणत सगळी वानरसेना घरात घुसली.

‘आजी, आम्ही आलो,’ म्हणत सगळी वानरसेना घरात घुसली. स्वागतयात्रा बघण्याच्या निमित्ताने सकाळी लवकर उठणं झालं होतं आणि नवीन कपडे घालून छान रपेटही झाली होती.

पोटात कावळे ओरडताहेत हे ओंकारने गटागटा पाणी पित निदर्शनास आणून दिलं. आंबाडाळ व थंडगार पन्हं पोटात गेल्यावर सगळे शांत झाले.

‘‘आजी, आज किती छान वाटत होतं म्हणून सांगू बाहेर. रस्ताच नटलाय असं वाटत होतं. किती ठिकाणी मोठय़ा मोठय़ा रांगोळ्या काढलेल्या होत्या. किती वेळ लागला असेल गं.’’ मुक्ताची कळी खुलली होती.

‘‘रात्री जागून काढतात म्हणे खूप जणी.’’ रतीने माहिती सांगितली.

‘‘स्वागतयात्रेत बॅण्डचं पथक आणि तुतारीवालेही होते.’’ ओंकारने त्याच्या आवडीची गोष्ट लगेच अ‍ॅक्शन करून दाखवली.

‘‘मिरवणुकीत वेगवेगळ्या विषयांवरचे देखावे होते. पाणी वाचवा, प्लॅस्टिक वापर थांबवा, झाडं वाचवा, शहर स्वच्छ-सुंदर ठेवा. खूप जण पारंपरिक वेशात होते.’’ विराजने आश्चर्याने सांगितलं.

‘‘आज हे सगळं का होतं गं?’’आजीला छोटय़ा आराध्यने निष्पापपणे विचारलं.

‘‘अरे, आज गुढीपाडवा आहे ना म्हणून.’’ ओंकारने तेवढय़ात टपलीत मारण्याची संधी साधली. आराध्यने तत्परतेने फिटाफिट उरकली.

‘‘आजपासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नवीन वर्ष चालू झालं. त्याच्या स्वागतासाठी ही शोभायात्रा होती.’’आजीने दोघांना शांत केलं.

‘‘मग जानेवारी, फेब्रुवारी आपण कधी म्हणतो गं?’’ ओंकारला प्रश्न पडला.

‘‘अरे, ते इंग्रजी वर्षांचे महिने. १ जानेवारीपासून इंग्रजी वर्ष चालू होतं ना!’’ आजीने सांगितल्यावर ओंकारच्या डोक्यात प्रकाश पडला.

‘‘३१ डिसेंबरला आपण सकाळी तळ्यावर फिरायला गेलो होतो, आठवतंय का मुक्ता, रती?. रात्री १२ वाजता खूप फटाके वाजले. वाटेत भेटलेल्या काळे आजींना गमतीने आपण म्हणालो होतो की, ‘आपण आता पुढच्या वर्षी भेटणार. हो की नाही?’ सकाळी उठल्यावर आपण नवीन वर्षांची दिनदर्शिका भिंतीवर लावली.’’ आजीने सांगताच सगळ्यांनी ‘होऽ होऽऽ’ केलं. आजीने दोन्ही नवीन वर्षांमधला वेगळेपणा अधोरेखित करायला सुरुवात केली.

‘‘त्या दिवशी शाळेत प्रत्येक तासाला वहीत तारीख लिहिताना सारखं चुकायला होत होतं. खाडाखोड करावी लागत होती. दोनचार दिवस मला सारखं खोडरबर लागत होतं.’’ मुक्ताने अनुभवाची नोंद केली.

‘‘१ जानेवारीला सगळ्यांना सुटी असतेच असे नाही. पण गुढीपाडव्याला मात्र बहुतेक सुटी असते. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाला पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. गुढीपाडव्याची तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा असली तरी तारीख मात्र दरवर्षी वेगळी असते.’’ आजीने खुलासा केला.

‘‘म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष साजरं करायला रात्रीपासून सुरुवात होते आणि मराठी नवीन वर्ष सूर्योदयाबरोबर चालू होतं, असंच ना गं.?’’ रतीने नीट समजून-उमजून सांगितलं.

‘‘गुढी पाडव्याला गुढी उभी करायची असते म्हणून आपण घराच्या मुख्य दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधतो. तसं तोरण १ जानेवारीला बांधतोच असं नाही. पण नाताळाच्या दिवसापासून नवीन वर्षांच्या स्वागतार्थ जिकडे-तिकडे दिव्यांचा लखलखाट, रोषणाई केलेली आढळून येते. कोणतीही गोष्ट नवीन म्हटली की कौतुकाने सजावट केली जातेच.’’- इति आजी.

‘‘इंग्रजी नवीन वर्षांच्या वेळी नाताळाची सुटी संपून शाळा पुन्हा सुरू होतात. तर या नवीन वर्षांच्या वेळी परीक्षांची गडबड असते. त्यानंतर निकालाचा भोपळा फुटून शाळेला मोठी उन्हाळी सुटी लागणार असते.’’ विराजला विषय बरोबर कळला होता.

‘‘१ जानेवारीला मस्त थंडी असते आणि आता होळी झाल्यामुळे चांगलं गरम व्हायला सुरुवात झाली आहे.’’ मुक्ताने हाताचा पंखा चालू करत सांगितलं.

‘‘इंग्रजी नवीन वर्ष चालू होतं त्यावेळी हेमंत, शिशिर म्हणजे पानगळीचा ऋतू असतो. सगळी झाडांवरची जीर्ण, जुनी पानं गळायला लागलेली असतात. अंगणात इतका कुरकुरीत पानांचा कचरा साठतो की कुत्रं- मांजर त्याच्यावरून गेलं की कोणीतरी माणूस चालल्यासारखा कुरकुर आवाज येत राहतो.’’आजीने आपलं निरीक्षण नोंदवलं.

‘‘कुरकु ऱ्यांसारखा..’’ आराध्याने कुरकुऱ्यांच्या आठवणीने खुशीत येऊन सांगितलं.

‘‘मराठी नवीन वर्षांचा पहिला महिना चैत्र असतो आणि तेव्हा वसंत ऋतू चालू होतो. शुष्क फांद्यांना कोवळी नाजूक पोपटी पालवी फुटायला लागते. झाडं नवीन पानांनी सजायला लागतात, अगदी जुने कपडे टाकून नवीन कपडे घालावेत तशी.’’ आजीने अधिक वर्णन केलं.

‘‘आजी, १ जानेवारीला नवीन डायऱ्या बाजारातून बाबा मला मुद्दाम आणून देतात. मी रोज काहीतरी लिहिण्याचा संकल्प करते.. ’’

‘‘..पण कधीच पूर्ण करत नाही.’’ रतिचं अर्धवट वाक्य पूर्ण करत विराज मोठय़ांसारखा म्हणाला, त्याबद्दल रतीने लगेच त्याला बक्षीस म्हणून धम्मकलाडू देऊन टाकला.

‘‘नवीन वर्ष मराठी असो नाहीतर इंग्रजी, काही तरी चांगलं नवीन करायचं, वाईट जुनं विसरून जायचं हे ठरलेलंच आहे. या दोन्ही वर्षांची म्हणजे इंग्रजी तारीख महिने आणि मराठी तिथी यांची योग्य सांगड एकाच दिनदर्शिकेत घातली जाते. सगळे व्यवहार तारखेनुसार व सण, तिथीनुसार करत राहतो.’’ आजीने माहिती आवरती घेतली. हळूच कडूनिंबाच्या गोळ्यांचा डबा बाहेर काढला.

‘‘आता हा कडू गोळीचा घोट पाण्याबरोबर गिळून टाका, तरच मस्त श्रीखंड चाटायला मिळेल.’’ हे ऐकताच सगळ्यांची तोंडं वेडीवाकडी झाली.

‘‘मी खाईन, पण मला साखरेच्या गुलाबी आणि पांढरी अशा दोन गाठी खायला हव्यात.’’ आराध्यचं लक्ष त्या गाठींकडे आणल्यापासूनच होतं.

‘‘तुलाच का एकटय़ाला मलाही पाहिजे.’’ ओंकारने लगेच जाहीर केलं.

आजीने ‘‘सर्वानी वाटून खाऊन टाकावं,’’ असं म्हणताच सगळेच गोड हसले.

– सुचित्रा साठे

suchitrasathe52@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2018 12:43 am

Web Title: suchitra sathe story for kids part 2
Next Stories
1 मी? किंवा मी..?
2 डोकॅलिटी
3 सूर्यावर भरवसा
Just Now!
X