|| सुजाता लेले

कुंडीमधल्या झाडांची पाने पिवळी पडलेली बघून अबोलीला वाटलं की झाडांना पाणी कमी पडतंय. म्हणून तिने कुंडय़ांमधील माती ओली असतानासुद्धा झाडांना आणखी पाणी घातलं. हे पाहून आई म्हणाली, ‘‘अगं, पावसाळा आहे ना, मग एवढे पाणी लागत नाही गं सोनुले!’’ पण अबोलीला काही ते पटले नाही. ती म्हणाली, ‘‘अगं आई, पावसाळा असला तरी आपण पाणी पितोच ना! ’’त्यावर आई म्हणाली, ‘‘अगं, उन्हाळ्यात जितके पाणी पितो तितके पाणी आपण पावसाळ्यात नाही पीत!’’ त्यावर अबोली म्हणाली, ‘‘पावसाळ्यात पाणी कमी पीत असलो तरी आपण पाणी पितोच ना. मग झाडांना का नको? मी घालणार झाडांना पाणी.’’

उगाच विषय ताणायला नको म्हणून आईने विषयच बदलला. तिला माहीत होतं की दुसऱ्या विषयात किंवा गोष्टीमध्ये मन गुंतवलं की लहान मुलं स्वत: करत असलेला हट्ट विसरून जातात. त्यामुळे हट्टापायी झालेला ‘राग’ही आवरला जातो. आई म्हणाली, ‘‘अबोली, तो रांगोळीचा चौफुला घेऊन त्या तुळशीच्या कुंडीपाशी ये. तुला रांगोळी कशी काढायची ते शिकवते. आधी चिन्हे शिकवते. ती जमायला लागली की ठिपक्यांची रांगोळी, डिझाइन्स शिकवते. पण आधी चिन्हेसुद्धा थोडीच शिकवणार बरं का! सुरुवात छान करायची. सुबकपणा.. नीटनेटकेपणाने आपली ‘कला’ उठून दिसते. हे बघ, अशी चिमटीमध्ये रांगोळी धरायची. मग काढायला सुरुवात करायची. तुळशीपुढे काढतोय म्हणून ‘।। श्री तुळशीदेवी प्रसन्न।। ’असे लिहायचे. आता मंगलचिन्ह स्वस्तिक काढूयात. मधेच अबोली म्हणाली, ‘‘अगं, सुटीमध्ये आजीकडे गेले होते ना तेव्हा तिने रांगोळी काढता काढता चिन्हांचा अर्थपण सांगितला.’’ त्यावर आई हसून म्हणाली, ‘‘मग आता चिन्हे तीच; पण तुझ्यासारख्या नवीन पिढीला आवडेल असे अर्थ सांगू का? बघ, जुनेच, पण नव्याने.’’

त्यावर अबोली म्हणाली, ‘‘हो, चालेल की! तूच म्हणत असतेसच ना, की परिवर्तन घडत असते.’’ हे चिमणे बोल ऐकून आईनं अबोलीला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘हे बघ, या ‘स्वस्तिक’ चिन्हाच्या चार रेषा आहेत ना, त्याचा अर्थ असा सांगता येईल की, सर्व दिशांमध्ये असलेला जातीभेद नष्ट झाला पाहिजे, तरच शांततेचे प्रतीक ‘ओम’ काढता येईल. आता हे बघ, कमळ काढले आहे ना, म्हणजे फुलांचे सौंदर्य बघायचे असेल तर सारी वृक्ष- वल्लरी, झुडुपे, पानं, वनस्पती, दुर्वा यांना जपायचे.. आणि हो, गोपद्म म्हणजे..

‘‘आई गं, गाई-म्हशींना पाळायचे का गं!’’ आईचं बोलणं तोडत अबोली म्हणाली. तिच्या या निरागस उत्तरावर हसून आई म्हणाली, ‘‘अगं, शहरांमध्ये कुठे गाई- म्हशी पाळणार? तर पाळीव पशु व पक्षी आणि जंगलातील पशुपक्षी यांना जगवायचे. त्यांच्या हक्कांच्या जागांवर फक्त त्यांचाच अधिकार आहे हे लक्षात ठेवायचे. म्हणून हे चिन्ह. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवता असतात असे मानतात. आणि पूर्वी बऱ्याच जणांकडे गाई-म्हशी असायच्या. म्हणून ‘गोपद्म’ बरं!

आता आजचे शेवटचे चिन्ह शिकवते ते आहे- लक्ष्मीची पावले. हे बघ, जातीभेद संपवताना स्त्री-पुरुष असाही भेद करायचा नाही. स्त्रीचा आदर करायचा. म्हणून तर ‘बेटी बचाओ, बेटी को पढाओ’, कळलं. आता तू सराव करत बस थोडा वेळ.’’ अबोलीने आईला मिठी मारली व म्हणाली, ‘‘किती  सुंदर अर्थ सांगितलास गं आई!’’

‘‘आई, शाळेत रांगोळी स्पर्धा आहे ना, तर मी या वर्षी त्या स्पध्रेत भाग घेणार आहे.अशी चिन्हे काढून नवीन अर्थ परीक्षकांना सांगणार आहे. त्यांना नक्कीच आवडेल. आई, यू आर ग्रेट!’’ आई हसली. मुलीचं मन रमवलं यातच तिचं समाधान झालं होतं.

‘‘उद्या झाडांना पाणी घालूयात.’’ असं मनाशी ठरवून अबोली झोपी गेली. याचा अर्थ तिच्या डोक्यातून झाडांना पाणी घालण्याचा विषय पूर्ण निघून गेला नव्हता. झोपेत स्वप्नामध्ये ती झाडांना पाणी घालू लागली. सारी झाडांची पाने तिला म्हणाली, ‘‘अगं, आम्हाला सृष्टीचं वर्षांऋतूतलं नैसर्गिक पाणी मिळतंय गं. आम्ही ते पिऊन तृप्त आहोत. आम्ही जरी कुंडीत असलो तरी आम्हा पानांवर हे पाणी पडतं आणि घरंगळत जाऊन मातीतून मुळापर्यंत जातं. थंडीत आणि पावसाळ्यात आम्हाला कमी पाणी लागतं. पण उन्हाळ्यात आम्ही कोमेजून जातो. तेव्हा तू दोन वेळा पाणी घालतेस ते आम्हाला आवडतं. उन्हामुळे इतकं हैराण झालेलो असतो ना गं! तू आम्हाला कधी पाणी घालायला येतेस असं होऊन जातं. जेव्हा तू प्रेमानं आमच्याशी गप्पा मारत पाणी घालतेस तेव्हा आमच्यातले मोगरा, मदनबाण ही फुले तुला सुगंध देतात. त्यामुळे तुमचाही उन्हाळा आल्हाददायक होतो. पण ताई, आता नको ना जास्त  घालू पाणी.. प्लीज!’’

झाडांच्या या विनंतीवर ‘बरं चालेल.’ असं अबोली म्हणाली. तेवढय़ात तुळस म्हणाली, ‘‘अगं, तुझ्या आईने माझ्या कुंडीपाशी रांगोळी काढायला शिकवली ना! कशासाठी असेल ते सांगू का? अगं, माझ्यासारख्या वनस्पती, पिंपळ, वड यांसारखे वृक्ष प्राणवायू देणारे आणि हवेतील प्रदूषण कमी करणारे असतात. त्यामुळे माझ्या इथे रोज रांगोळीच्या निमित्ताने बसलीस ना, की तुला आपोआप शुद्ध हवा मिळेल आणि तुझे आरोग्य राखले जाईल. दारात तुळस असेल तर डास, किडे घरात येत नाहीत. अबोली, तुझ्या आईने चिन्हांचे अर्थ किती छान सांगितले गं! वर्षांनुवर्षे तेच तेच अर्थ ऐकून कंटाळा आला होता. पण तुझ्या आईनं जुन्यातून सोनं शिकवलं. आम्हाला बोलता येत असतं ना तर आम्ही साऱ्या वृक्षवल्लरींना हे सुंदर, पण तितकेच विचार करायला लावणारे अर्थ सांगितले असते. अबोली, तू शाळेतील स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस ना! मग माझी कुंडीपण तिथे ठेव. माझ्या भोवती ही चिन्हे काढ आणि चिन्हांच्या अर्थाबरोबर दारी ‘तुळस लावा आणि आरोग्य राखा,’ हे पण जरूर सांग. तुला नक्कीच पहिलं बक्षीस मिळेल.’ हे ऐकल्यावर अबोली टाळ्या वाजवत उठली आणि आन्हिकं उरकून तुळशीपाशी रांगोळी काढायला बसली.