उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्याच जिवाची काहिली होते. आपल्यासारख्या बच्चेकंपनीलादेखील उकाडय़ामुळे काही सुचेनासं होतं, खरं ना? आता मात्र पावसाची चाहूल लागलेली आहे. वृत्तपत्रांमध्ये पाऊस अंदमानात केव्हा येणार, केरळात केव्हा दाखल होणार आणि तुमच्या-माझ्या गावात केव्हापर्यंत पोहोचणार याचे अंदाज येऊ  लागलेले आहेत. मात्र उन्हाळ्याची मजा अजूनही चालू आहे. खास उन्हाळ्यातली फळं अजूनही मिळताहेत, तेव्हा  उन्हाळ्याला निरोप देताना एक छान सलाद करू या, कसं?

चार जणांकरिता साहित्य : एक वाटी प्रत्येकी अर्धी चिरलेली हिरवी आणि काळी द्राक्षं, मऊ  पिकलेल्या पेरूचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, अननसाचे तुकडे, चेरी किंवा साध्या टोमॅटोचे तुकडे आणि हिरव्या ढोबळ्या किंवा सिमला मिरचीचे तुकडे. पुदिन्याची स्वच्छ धुतलेली मूठभर पानं, मीरेपूड, एका छोटय़ा लिंबाचा रस, प्रत्येकी दोन मोठे चमचे भरून मध आणि गोडं किंवा ऑलिव्ह तेल आणि चवीनुसार मीठ.

उपकरणं : सलाद बनवण्याकरिता मोठय़ा आकाराचं भांडं- सलादकरिता शक्यतो योग्य आकाराची स्टीलची कढई वापरा किंवा मोठं पातेलं. भाज्या आणि फळं चिरण्याकरिता सुरी किंवा विळी. सलाद मिसळण्याकरिता एक झारा किंवा मोठा चमचा. आणि सलादकरिता चटकदार ड्रेसिंग बनवण्याकरिता एक मोठी वाटी किंवा चिमुकलं पातेलं आणि चमचा. लिंबाचा रस काढण्याकरिता रस काढायचा चिमटा किंवा महादेव.

सगळ्यात आधी सर्व भाज्या आणि फळं स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. कापायला सुरुवात करण्याआधीच सलादकरता ड्रेसिंग बनवण्याची वाटीसोबत घेऊन बसा. या वाटीमध्ये प्रत्येक फळाचा कापताना निघालेला रस जमा करत जा. आता सर्वप्रथम काळ्या आणि हिरव्या द्राक्षांचे कापून दोन भाग करा. वाटीभर झाले म्हणजे सलाद करायच्या पातेल्यामध्ये टाका. एका पेरूचे चार तुकडे करा. होडीसारख्या आकाराच्या प्रत्येक तुकडय़ामधला गाभ्याकडचा बिया एकवटलेला भाग काढून टाका. सालाकडच्या बाजूने गराचा साधारण एक-दीड सेंटीमीटर थर राहील. आता या बिन-बियांच्या पेरूच्या भागाचे तुकडे करा. मग चेरी, टोमॅटो देठाकडून देठाकडे अर्धे कापा. मोठे टोमॅटो असतील तर त्यांचे आणि हिरव्या ढोबळ्या मिरच्यांचे चौकोनी आकाराचे तुकडे करा. हे सगळे तुकडे आपल्या सलादच्या भांडय़ामध्ये एकत्र करून चांगले दोन-तीन मिनिटं एकजीव होईतोवर हलवत राहा. सगळ्या भाज्या-फळांचे रस एकमेकांमध्ये मिसळतील. एकाची चव दुसऱ्यात मुरेल, दोघांची चव मिळून तिसऱ्याला छान चव देईल. भाज्या-फळांचं हे मिश्रण मिसळतानाच तुम्हाला त्याच्या स्वादाने, रंगीबेरंगी दिसण्याने भूक लागायला लागेल.

आता सलादकरिता ड्रेसिंगच्या तयारीला लागा. वाटीमध्ये टोमॅटो, द्राक्षं, अननस यांचा चिमुकला रस तुम्ही साठवलेला असेल, त्यात एका लिंबाचा रस पिळा. बिया या रसामध्ये पडू देऊ  नका बरं का! मग या मिश्रणामध्ये मध आणि तेल घाला. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट, आवडत असेल त्याप्रमाणे मीरेपूड घाला. सर्वात शेवटी पुदिन्याची पानं बारीक चिरून या रसामध्येच घाला. रस अजिबात सांडू न देता चांगलं तीनएक मिनिटं हे मिश्रण वेगात हलवा. तेल, मध, मीठ, लिंबाचा रस, पुदिना यांचा स्वाद चांगला एकजीव झाला पाहिजे. आता सलादकरिता केलेल्या तुकडय़ांच्या भांडय़ामध्ये ड्रेसिंगचं मिश्रण ओता. सलाद चांगलं ढवळून एकत्र करा आणि वाढून खायला घ्या. कोणतंही सलाद साधारणत: तयार झालं म्हणजे पटकन् खाऊन टाकायचं. वरण-भात, भाजी-आमटीसारखं ते ठेवून आरामात खायचं नाही. तेव्हा तुम्हाला एक गंमत सांगतो- सलादकरिता भाज्यांचे तुकडे आणि ड्रेसिंग तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि तीन-चार तासांनंतर जेवणाच्या वेळेला किंवा दुपारच्या खाण्याच्या वेळी हे सलाद मिसळून न्याहारीकरिता खा. खूप छान वाटतं. हे थंड सलाद खाल्लय़ाने दुपारच्या न्याहारीच्या वेळेची भूक भागते. पुन्हा संध्याकाळी खेळायला, मजा-मस्ती करायला उत्साह येतो. जेवणाआधी खाल्लंत तर भूक लागायला, जेवण पचायला मदत होते.

उन्हाळ्याला राम राम करत निरोप देताना या दिवसांमध्ये मिळणाऱ्या फळांचा आस्वाद घेत त्यांची चव जिभेवर रेंगाळत असताना पावसाळ्याचं स्वागत करायचं. या फळांचा स्वाद घेण्याकरिता पुढच्या उन्हाळ्याची वाट पाहायची, ही कल्पनाच मला भारी आवडते. अननसाची आंबट-गोड चव, द्राक्षांचा गोडवा, टोमॅटोच्या आंबटगोडाची वेगळी चव आणि पेरूची किंचित आंबट-तुरट मिठ्ठास अशा निरनिराळ्या आंबटगोड चवींचं हे सलाद म्हणजे एकाच प्रकारच्या चवीच्या विविध छटांचा एक सुरेख नजराणा आहे. मला खात्री आहे की, हे सलाद तुम्हाला नक्की करता येईल आणि आवडेलही. तेव्हा लागा तयारीला आणि लवकरात लवकर या सलादचा बेत करा पाहू!

contact@ascharya.co.in