News Flash

शिकवण गणेशाची!

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सर्वत्र गणेशस्थापना झाली. सार्वजनिक गणेशोत्सवही सुरू झाला. शास्त्रात गणेशमूर्ती ‘पार्थिव’ असे सांगण्यात आले आहे.

| August 31, 2014 01:02 am

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सर्वत्र गणेशस्थापना झाली. सार्वजनिक गणेशोत्सवही सुरू झाला. शास्त्रात गणेशमूर्ती ‘पार्थिव’ असे सांगण्यात आले आहे. ‘पार्थिव’ हा शब्द ‘पृथिवी’ या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. पृथिवी म्हणजे माती-जमीन! जी जमीन आपल्याला आधार देते, जी आपल्याला अन्नधान्य, फुले-फळे देते त्या जमिनीविषयी आपण नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे, असा त्यामागचा उद्देश आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते. पार्थिव गणेशपूजनाने धरतीचे हे ऋण मान्य केले जाते. त्याचे स्मरण केले जाते.
पूर्वाचार्यानी ऋतू आणि सण उत्सवांची योग्य सांगड घातली आहे. म्हणून शेतात धान्य तयार होत असतानाचा हा पहिला उत्सव. त्यामुळेच गणेशाला अग्रपूजेचा मान मिळालेला आहे. खरं म्हटलं तर या दिवशी नदीवर जाऊन नदीकाठची माती घेऊन त्याची गणेशमूर्ती करून तेथेच पूजन आणि लगेच विसर्जन करण्यास सांगितले आहे. परंतु नंतर ही दीड-पाच-दहा दिवस गणेशपूजनाची प्रथा सुरू झाली.
गणेशाची पूजा म्हणजे चराचर सृष्टीतील चैतन्याची पूजा असते. मातीत निर्मितीशक्ती असते. बी जेव्हा मातीत मिसळते तेव्हा त्याचे रोपटे तयार होऊन धनधान्य निर्माण होते.
गणेशमूर्ती आपणास अनेक संदेश देत असते. त्याचे मोठे डोके अचाट बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचे दर्शन घडविते. बारीक डोळे सूक्ष्म निरीक्षण करण्याचे सूचित करीत असते. मोठे सुपासारखे कान सर्व ऐकून घ्या आणि अनावश्यक गोष्टी सोडून द्या, असे सांगत असते. सूपदेखील टरफले बाहेर फेकून देऊन धान्य स्वच्छ करीत असते. गणेशाची लांब सोंड दूरवरच्या वस्तूंचा वास घेत असते. पुढे घडणाऱ्या गोष्टींचा विचार करा असा संदेश ती देत असते. गणेशाचे मोठे पोट सर्वाचे अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करा अशी शिकवण देत असते. गणेशाच्या एका हातात पाश असतो, दुसऱ्या हातात परशू असतो; ही दोन्ही शस्त्रे अन्यायाविरुद्ध प्रतिकार करा, त्यासाठी सामथ्र्यवान व्हा असा संदेश देत असतात. तिसरा हात सर्वाना अभय देण्यासाठी सज्ज असतो आणि चौथ्या हातात गोड मोदकाचा किंवा लाडवाचा प्रसाद असतो. चारही हात क्रियाशील होण्यासाठी शिकवण देत असतात. गणपतीचे वाहन उंदीर-मूषक! शेतातील धान्याची नासाडी करणाऱ्या उंदराला, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे दमन करून त्यावर आरूढ होऊन विजयी व्हा, असे सांगत असतात.
गणपतीपूजनात गणपतीला एकवीस पत्री वाहिल्या जातात. या सर्व औषधी वनस्पती आहेत. त्यांची लागवड सदैव गावात केली जावी हा त्यामागचा उद्देश आहे. दूर्वादेखील महान औषधी वनस्पती आहे.
गणपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. माणसाचे जीवन सुखी व सुंदर होण्याकरता यांची मोठी आवश्यकता आहे. गणेश नटेश्वर आहे. तो सामथ्र्यवान सेनापती आहे. तो विघ्नहर्ता आहे. तो दु:खहर्ता आहे. तो सुखकर्ता आहे. गणेशाचे गुण आपणही आपल्या अंगी बाणविले तर आपणासही हे सामथ्र्य लाभू शकते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्ट मित्रमंडळी एकत्र येतात. घरात आनंदमय वातावरण तयार होते. सर्व माणसे दैनंदिन जीवनातील चिंता, दु:ख विसरून जातात. आबालवृद्ध स्त्रीपुरुष या उत्सवात सामील होत असतात. पावसाळा संपत आलेला असतो. सारी निसर्गसृष्टीही या आनंदोत्सवात सामील होत असते.
काही पथ्ये
गणेशोत्सव हा पर्यावरणाचे रक्षण करून निसर्गऋण मानण्यासाठी साजरा केला जात असतो. म्हणून हा उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यावयास हवी.
सजावट आरास करताना थर्मोकोल, प्लॅस्टिक यांचा वापर टाळावयास हवा. त्यासाठी कागद, फुले यांचा वापर करावा. उत्सवात ध्वनिवर्धक वापरताना नियम पाळावेत. संयम ठेवावा. म्हणजे मोठय़ा आवाजाचा त्रास लहान मुले, वृद्ध यांना होणार नाही. आरती म्हणताना त्या मोठय़ा कर्कश आवाजात न म्हणता मंगल गोड आवाजात आर्त स्वरात म्हणाव्यात. म्हणजे ध्वनिप्रदूषण न होता वातावरण प्रसन्न राहील. हल्ली अगरबत्ती, कापूर यात केमिकल्स वापरतात. त्या धुराचा डोळ्यांना व घशाला त्रास होत असतो. गुलालाचा वापरही संयमाने करावा म्हणजे वायुप्रदूषण होणार नाही. प्रसादासाठी रंगीत मावा, मिठाईचा वापर न करता फळांचा वापर करावा म्हणजे शरीराचे आरोग्य चांगले राहील. गणेशपूजेचे निर्माल्य पाण्यात टाकू नये. खड्डा खणून त्यात निर्माल्य टाकून खत करावे. तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे म्हणजे जलप्रदूषण होणार नाही.
मुलांनो, आपण आनंदोत्सव साजरा करीत असताना निसर्गाला आणि इतर माणसांना त्रास होणार नाही यासाठी जपले पाहिजे, तरच श्रीगणेश आपणा सर्वावर प्रसन्न राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:02 am

Web Title: teachings of lord ganesha
Next Stories
1 ताटाभोवती इकोफ्रेंडली रांगोळी
2 येतो भेटाया!
3 छोटय़ा चिपळ्या
Just Now!
X