|| अर्चना जोशी

साहित्य : दोन वेगळ्या आकाराच्या बाटलीची बुचे, स्ट्रॉ, कार्ड पेपर किंवा कॅनव्हास, अ‍ॅक्रॅलिक रंग, रंगकामाचे साहित्य.

आपले सुटीतले उद्योग करता करता बऱ्याच निरुपयोगी वस्तू जमा करून त्यांच्या साहाय्याने टेक्नो पेंटिंग कसे करता येईल? झटपट करता येणाऱ्या काही कल्पना तुम्हाला इथे देत आहे.

कृती : प्रथम साधारण छोटय़ा आकाराची आणि मोठी बुचे वेगळी करा. आयताकृती कार्ड पेपर किंवा कॅनव्हासवर एक तृतीयांश भागात मोठय़ा बुचाचे पाच-सहा गोलाकार हिरवे ठसे मारा. आतील भागात बोटाने गोलाकार रंग पसरवा. वरील बाजूस कोपऱ्यात लहान आकाराच्या बुचाचा ठसा मारा व बोटाने रंग गोलाकारात पसरवा आणि वाळू द्या. नंतर बुंध्याला स्ट्रोक सारख्या स्ट्रॉ चिकटवा. अगदी छोटय़ा बुचाच्या ठशाने फुले बनवा. निळ्या रंगाचे बोट फिरवून आकाशात ढग काढा. पक्षी व गवत रंगवा. झालं तुमचं टेक्नो पेंटिंग तयार!

या टेक्नो पेंटिंगमुळे आपल्या भिंतीची शोभा वाढेल आणि सगळ्यांकडून कौतुकाची थापसुद्धा मिळेल.

apac64kala@gmail.com

*************************************************************************************************************

माझा वाचनकट्टा

चार वर्षांपूर्वी ज्ञानभाषा मराठी समूहाने ऑनलाइन वाचनकट्टा सुरू केला. मला हा काय प्रकार आहे माहीत नव्हतं. पण आई स्वयंपाक करताना मोबाइल बाजूला ठेवून त्यातील ऑडिओ ऐकते, हे कळलं. कधी कधी जेवतानाही हे ऑडिओ माझ्या कानावर पडू लागले म्हणून मी कुतूहलाने आईला विचारलं की, ‘‘हे काय आहे?’’

तिने सांगितलं की, ‘‘समूहातील लोक पुस्तकाचं वाचन रेकॉर्ड करतात आणि पाठवतात.’’

मग मीही ते ऐकू लागले. दर रविवारी आम्ही हे ऐकू लागलो. मग मीही सांगितलं ‘मलाही वाचायचं आहे.’ सुरुवातीला आईने रेकॉर्ड कसं करावं, वाचताना नक्की आवाज कसा हवा, कुठे कसं बोलावं, हे सर्व मला समजावून सांगितलं. मला वाचन रेकॉर्ड केल्यावर स्वत:चा आवाज ऐकायला आवडू लागला आणि मग चुकाही कळू लागल्या. हळूहळू माझ्यात वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी माझं वाचन रेकॉर्डही करू लागले. माझ्या मैत्रिणींसोबत मी ‘चांदोबा’चं वाचनही केलं.

हे करताना मी या ऑनलाइन वाचनकट्टय़ातील पहिली बालवाचक झाले आणि सुचिकांतजींनी तयार केलेल्या लहानग्यांच्या ‘भोलानाथ ग्रुप’ची प्रमुख झाले. माझं आवडतं वाचन म्हणजे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे गाडगेबाबांचं कीर्तन. मी ते हातात टाळ घेऊन वाजवत वाजवत वाचलं होतं. ते वाचताना मला खूप मज्जा आली.

जेव्हा समूहातून, ‘आम्ही कलिकाच्या वाचनाची वाट बघतो.’ अशा प्रतिक्रिया आल्या तेव्हा मला खूपच आनंद झाला. आपल्याला कोणासाठी तरी वाचायचं आहे म्हणून मी दर रविवारी माझं वाचन पाठवू लागले. यात काही कविता तर काही गोष्टी असतात.

एकदा आईने मला एक वेगळीच बोली वाचून दाखवली आणि तिचा अर्थ सांगितला. ते अहिराणी भाषेतील रामायण होतं. त्यातील हा ‘बट्टोड’ हरिण असं सोन्याच्या हरणाला म्हटलं होतं. माझी हसून हसून पुरेवाट लागली. बरेच नवीन शब्द कळले. मला वाचनाचा सराव होता, त्यामुळे ते रामायण छानच झालं. त्याचा व्हिडीओही बनवला आईने आणि YouTube वर टाकला.

वाचनकट्टय़ात मी वऱ्हाडी बोलीही वाचली आहे. अरविंद शिंगाडेसरांनी लिहिलेले ‘ऑफ पीरियड’ हे लेख मी आधी वाचले मला जमेल तसे. मग सरांनी ऑडिओ बनवून नक्की कसं वाचायचं ते सांगितलं. मला अशा विविध बोली वाचायला खूप आवडतात.

मी वाचनकट्टय़ामुळे खूप काही शिकले आणि आईला सांगून YouTube वर माझं अकाऊंट उघडून घेतलं. तिथं मी अहिराणी भाषेतील, वऱ्हाडी भाषेतील बोली सादर करते. YouTubeचं नाव ‘बोली बोलते कलिका’ असं मजेशीर ठेवलं आहे. अजून पुढे खूप वाचन करायचं आहे! खूप खूप वाचेन आणि शहाणी होईन. यात ‘ज्ञानभाषा मराठी’ समूह आणि हा वाचनकट्टा सुरू करणारे सुचिकांत वनारसे यांचे खूप आभार मानावेसे वाटतात.

  • कलिका सुभाष पाटोळे
  • ६ वी, स्वामी विवेकानंद
  • शाळा, डोंबिवली.