|| श्रीनिवास बाळकृष्णन

तुम्हाला अमेरिकन, चायनीज आणि भारतीय अशा तीन मित्रांचा एक किस्सा महित्येय का? सांगतो- हे तिघे एकाच ऑफिसात पुरातत्व विभागात असतात. कामानिमित्त देशोदेशी पडीक जमिनी खोदत संशोधन करतात.

चिनी ‘फुंग’ला त्याच्या ह्युनानमध्ये १०० फूट खोदल्यावर एक यंत्र सापडतं आणि तो दोघांना मोठय़ा फुशारकीने म्हणतो, ‘पाहा, आमच्या देशाची प्रगती! किती पूर्वीपासून आमच्याकडे ट्रँकॉलचा शोध लागलेला हे ऐकून टेंशनमध्ये येऊन शिकागोत २०० फूट खोदल्यावर अमेरिकन ड्रम्पला एक फोनची तार मिळते आणि तो फुशारकी मारत सांगतो, ‘पाहा आमच्याकडे कित्येक वर्षे आधी फोनचा शोध लागलेला.’ आता भारतीय संशोधकांना काहीतरी सिद्ध करून दाखवणं भाग पडतं. तो पुण्यात १००.. २००.. ३००.. ४०० फूट खोदूनही काहीच न सापडल्याने वैतागतो. त्याला सर्व हसणार तितक्यात तो मोठय़ा आवाजात गर्जतो.. ‘‘त्याकाळी आमच्याकडे वायरलेस मोबाइल होते.’’

पण हा विनोद नव्हे तर किस्सा आहे बरं! कारण त्याकाळी खरेच भारतात मोबाइल फोनपेक्षाही भारी अशी वायरलेस संदेशवहन करण्याची पद्धत होती. आकाशात उडणारी विमाने होती. गाडय़ा होत्या. बोटी होत्या. टीव्ही होता, वर्तमानपत्रे होती, मेट्रो होती, रेल्वे, बस होती, पूल होते, हॉटेल्स होती. पण इतकं सांगूनही मोठे लोक जुन्या कशा कशावर विश्वास म्हणून ठेवत नाहीत. सतत पुरावा मागतात हो. कुठून आणायचे पुरावे?

हा जुना काळ म्हणजे कौरव-पांडव किंवा हरप्पाचा काळ नाही हा! ते आत्ताचेच आहे. त्याहून फार फार फार वर्षांपूर्वीचा काळ..

थेट अश्मयुगात गुहेत राहणारा आदिमानव असायचा ना तेव्हाही हे सर्व होतं, असा शोधच लागला आहे. आणि तो अमेरिकेत लागला असल्याने खराही आहे. १९५९ साली या इतिहासावर, नव्हे प्रागतिहासावर प्रकाश टाकला तो विल्यम हॅना आणि जोसेफ बार्बरा या महान कार्टून संशोधकांनी! १९५९ ते १९८८ पर्यंतच्या अफाट अभ्यासात आपल्याला अश्मयुगातील घडामोडी पाहता आल्या. पुढे २०१५ पर्यंत अनेकांनी हा अभ्यास पुढे चालवला.

पाहूयात नेमकं होतं काय त्या काळात!

‘द फ्लागस्टोन’ या कार्टून फिल्ममध्ये आदिमानव फ्लिनस्टोन कुटुंबीय दाखवले आहे. ते आर्क्‍सस्टोनच्या प्रागतिहासिक प्रदेशांतून आलेत. फ्रेड आणि त्याचा मित्र बार्णी यांचा एक छोटुला प्रसंग दाखवला आहे. या दोन फ्रेंड फॉरेव्हर मित्रांचे आई-वडील, सासू-सासरे आहेत, काका-काकी आहेत. पण ते क्वचित भेटायला येतात. मात्र सर्व मालिकांमध्ये सोबत करणाऱ्या विल्मा आणि बेट्टी या त्यांच्या बायका आहेत. मुलं आहेत. प्राणी आहेत. हा सर्व परिवार – परिसर गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कारण शाळा, टय़ुशन-फ्युशन नाही.  ९ ते ५ नोकरी नाही. बस, रेल्वेचा गर्दीतला प्रवास नाही.

एलिझाबेथ एकादशी सिनेमातलं ‘दगड दगड’ हे गाणं ऐकलंय का? हे गाणं बहुधा याच कार्टूनला पाहून सुचलं असावं इतक्या दगडी वस्तू इथं आहेत. चित्रकाराला जे जे म्हणून दगडाचे करता येईल ते ते त्याने केले आहे. त्याच्या विश्वात कपडय़ांचा शोध लागलेला, नाहीतर दगडाचाच ड्रेस घातला असता. खऱ्या अश्मयुगात असे नसेल, पण आपल्या कार्टूनयुगात मात्र हे खरं मानून चालायचं. कार्टूनमधली जी काही आधुनिकता आहे ती दगडधोंडे वापरून केलेली आहे. सोबतीला प्राणी व पक्षी. म्हणजे विमान आहे, पण ते जड दगडाचे. आणि केवळ चार पक्षी ते उचलून उडणार! इजिनिबजिन काही नाही. या अशा कल्पक वस्तू सुचण्यात व बघण्यात खूप मजा येते. धातू, प्लास्टिकचा शोध लागण्याआधी त्याच वस्तू कशा होत असतील याचा विचार कार्टून स्वरूपात पाहता येतो. या मालिकेतील पाळीव प्राणी म्हणजे क्यूट डायनासोरचं पिलू! इथं आपल्याला कुत्रा-मांजर पाळायला परवानगी नाही आणि इथं ही फॅमिली अख्खा डायनासोर पाळते आणि तोही कुत्र्यासारखाच मालकाशी इमानी, घरच्यांशी प्रेमळ आणि धसमुसळा! डायनासोर आणि माणूस एकत्र आले की न घाबरता प्रेमाने राहू शकतील असा विश्वास त्या भूमीने दिला.

डायनासोर आणि कल्पक दगडी वस्तू या दोन गोष्टी सोडल्या तर कार्टूनचा मूळ विषय (कंटेंट) हा मोठय़ांसाठीचा आहे. भारतीय मुलांना तर संवादातले बारकावे डोक्यावरून जातील. फक्त वरवरच्या गमती कळतील. कार्टून हे लहनांनीच पाहायचं असतं असा गैरसमज पालक गटात असल्याने याला आपण काही करू शकत नाही. असो.

यातील मुख्य पात्र (फोटोत दिसणारं) फ्रेड फ्लिन्स्टन हा सध्या ब्रेडॉक गावी राहतो. मध्यमवर्गीय, कामगारवर्गीय, कुटुंबवत्सल, काळजीवाहू सामान्य माणूस! त्याच्या आवडीनिवडी, समस्या, समाधानदेखील शहरीच! मिस्टर कूल ही उपाधी त्याला शोभेल असा. कधी कुणाचे वाईट चिंतणार नाही. आणि स्वत:लाही त्रास होईल अशी परिस्थिती आणणार नाही. वागण्यात वेंधळेपणाची झाक असल्याने पत्नी विल्माला मनस्ताप होतोच. बार्णीलादेखील त्रास होत असला तरी तो नेहमीच साथ देत आला आहे. फ्रेडला बेसबॉलमध्ये बॉलिंग करणं खूप आवडतं व त्यात तो माहीर आहे. चांगला गोल्फर आहे, फुटबॉल, पोकर, स्विमिंग पूलमध्ये आराम करणं जाम आवडतं. त्याला वेगात गाडी चालवायला आवडतं. त्याने एका रेसमध्येही प्रवेश घेतला होता. (यातील सर्व गोष्टी दगडाच्या हे नेहमी लक्षात असू देत.)

मला वाटतं, फ्रेडची करिअरची सुरुवात साधा क्रेन ऑपरेटर म्हणून झालेली. मग तो पार्टटाइम पोलीस म्हणून काम करू लागला. पैसे येत गेले तसा तो स्थिरावला असेल. त्यांच्यातील छंद जोपासायला वेळ मिळाला असणार. त्याला भसाडय़ा आवाजात गायनाची, नाचण्याचीपण आवड!  आपल्या फ्रेडला जुगाराचा वाईट नादही लागला. यापुढं मी तुम्हाला काही सांगत नाही. त्या सर्व मोठय़ांच्या गोष्टी आहेत.

१९९४ साली फ्लिनस्टोनवर निघालेल्या खराखुऱ्या सिनेमाच्या शिर्षकगीतात ‘यब्बा डब्बा डय़ू’ हे वापरलं आहे. २७ फिल्म्स, अनेक संगीत व्हिडीओ, ६ व्हिडीओ गेम,  खाण्यापासून सिगारेटपर्यंतच्या जाहिराती, मोठय़ा तसेच मुलांसाठीच्या वापरातील वस्तूंवर फ्रेड येत गेला. नव्हे, आपण फ्रेडच्या कुटुंबात रमलो गेलो. त्याचा ‘असावा सुंदर दगडांचा बंगला..’ आजही आहे. अश्मयुगातील जगण्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. फोन नंबर नाही, पण त्याला तुम्ही भेटू शकता किंवा पत्र पाठवू शकता.

पत्ता आहे- ‘फ्लिनस्टोन रेसिडेन्सी’, ३४५/केव्हरोड स्टोन, १३१३ कॉब्रेलस्टोन मार्ग!

chitrapatang@gmail.com