श्रीनिवास बाळकृष्णन

मागील कुठल्या लेखात ‘टेल्सपीन’ या कार्टून मालिकेतील बल्लू आणि शेरखान आठवत असतीलच. त्यातील पात्रांची कल्पना ज्या मुख्य कार्टून मालिकेतून सुचली, ते कार्टून म्हणजे द.. द ग्रेट.. द अफलातून.. द फेमस.. द जंगल बुक! याची सुरुवात होते ती १८९४ पासून. जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिकप्राप्त ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपिलग यांनी ही कादंबरी लिहिली. रुडयार्ड यांचा जन्म मुंबईचा. त्यांचा बंगला मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये, तो तुम्हाला आजही पाहता येईल. ही कादंबरी त्यांनी याच बंगल्यात लिहिली अशी आख्यायिका आहे. परंतु या कादंबरीतील सर्व घटना मात्र भारतीय जंगलामध्ये घडतात. त्यामुळे ही कादंबरी ब्रिटिश लेखकाने लिहिली तरी आपली वाटते.

त्यानंतर ‘द जंगल बुक’ या कादंबरीवर अ‍ॅनिमेशन व वास्तववादी फिल्म बनू लागल्या. अर्थात या सिनेमात बोलणारे प्राणी असल्याने अ‍ॅनिमेशनशिवाय पर्याय नव्हता. वर्ष १९३७- ४२- ६८- ६७- ६८- ६९- ७०- ७१- ७२- ७३- ७६- ८९- ९०- ९२- ९३- ९४- ९५- ९६- ९७- ९८- २००१- ०३- १०- १३- १४- १६- १८ यादरम्यान १९ ते १११ मिनिटांच्या अनेक फिल्म बनल्या. शिवाय कॉमिक पुस्तकं, व्हिडीओ गेम अशा माध्यमांतून मोगली आपल्याला भेटत राहिला. यावरूनच आपल्याला लक्षात येतं की, कादंबरीची मूळ कल्पना किती वेड लावणारी असेल. जणू त्या काळचे हॅरी पॉटरच!

यातील एक फिल्म तरी आपण पाहिली असेलच, यात शंकाच नाही. काय आहे असं वेड लावणारं? नेमकं काय आवडलं आपल्याला? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारले तर नेमकं उत्तर सांगता येणार नाही. कारण प्रत्येक वयाला आवडणारी कल्पना यात रंगवली होती. कथा सुरू होते ती ब्रिटिशकालीन भारतात. जंगलात ब्रिटिश अधिकाऱ्यांचा शिकारीचा ताफा निघालेला असतो. तिथं वाघाच्या येण्यानं गोंधळ उडतो आणि त्या गडबडीत साधारण सात-आठ महिन्यांचं बालक जंगलातच राहून जातं.

त्या मुलाला पुढे लांडग्याचा कळप सांभाळतो. लांडगीचे दूध पिऊन मोठा होणारा मोगली ‘माणूस’पण विसरून जंगली पशूप्रमाणे बनतो. तरीही परप्रांतीय असणाऱ्या मोगलीला अनेकांचा विरोध असतो. मोगलीच्या चांगल्या स्वभावामुळे त्याचे अनेक मित्र होतात. माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ त्याचा मुख्य शत्रू बनतो. थोडय़ा चकमकीदेखील होतात, पण त्यातून तो सहीसलामत वाचतो. तारुण्याच्या उंबरठय़ावर असणारा मोगली पुढे जवळ असणाऱ्या गावातील मुलीच्या प्रेमात पडतो आणि गावकऱ्यांशी संबंध जोडतो.  याच्या शेवटात किंवा कथेत अनेक बदल केलेले आहेत, पण कथा साधरण अशीच.

आपल्याकडे सर्वात जास्त प्रसिद्ध कार्टून मालिका झाली ती ‘जंगल बुक शोनेन मोगली’ (द अ‍ॅडव्हेंचर ऑफ मोगली). ही मालिका ५२ भागांची होती. दर रविवारी ही मालिका लागायची. त्या वेळी कार्टून व इतर मालिकांचा रतीब घातला जात नसे. म्हणून भारतात १९८९ मध्ये प्रसिद्ध झालेले जंगल बुक १९९४ पर्यंत चालू राहिले.

‘जंगल जंगल बात चली है’ हे गुलजार यांनी लिहिलेलं व विशाल भारद्वाज यांनी संगीत दिलेलं शीर्षकगीत इतकं प्रसिद्ध होतं की, मध्ये अनेक वर्षांचा गॅप होऊनही आजही अनेकांना हे गाणं पाठ आहे, तर काहीजण या गाण्याची मोबाइल रिंगटोनही ठेवतात.

यातील मुख्य पात्र म्हणजे, मोगली हा केस वाढलेला काटक मुलगा. दिवसभर उन्हात.. मूळचा गोरा रंग रापलेला असा. झाडाच्या फांद्यांना लटकून लांबचे अंतर क्षणात कापणारा मोगली. बालपणी जे कापड घातलं असेल तीच मोठेपणी त्याची चड्डी झाली. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन बुमरँग होतं. हे त्याचं सर्वात मुख्य हत्यार. जे फेकलं की पुन्हा परत हातात यायचं. या हत्याराने तर बच्चे कंपनीला वेड लावलेलं.

असं असलं तरी त्याला मानवी विचार शिवू न देण्याचे प्रयत्न होत असत. कारण मोगली मेंदूचा वापर करायला शिकला तर जंगल नष्ट होणार ही शक्यता, ही भीती बगिरा आणि काही लांडग्यांना होती. त्यामुळे त्याच्या सवयी लांडग्याप्रमाणेच ठेवण्याकडे त्यांचा कल होता. तो शिकारीतही त्यांना मदत करे. तिथं मात्र मोगली प्लॅनिंग करायचा. मोगलीला जंगलात ठेवण्याच्या विरोधात बगिरा होता. कारण तो माणसांना जवळून ओळखत होता. पण तो मोगलीला मोठय़ा गुरुबंधूप्रमाणे होता. आता मोठे भाऊ किती डोक्यात जाणारे असतात, हे तुम्हाला माहीत आहेच. तसाच बगिरादेखील सतत हे करू नको, ते करू नको अशी किटकिट करायचा. म्हणून मोगली बऱ्यापैकी त्याला टाळायचा. तरी बगिरा हा शेरखानपासून वाचवू शकणारा हिंमतवान काळा बिबळा होता. याउलट बल्लू हा आळशी, मस्तमौजी, धमाल करणारं अस्वल. मोगलीच्या मस्तीतील साथीदार. बगिरा आणि याचे नेहमीच वाकडे.

मोगलीच्या मनाच्या जवळ असणारा पप्पू हा शिकराप्रमाणे असणारा प्राणी. माणूस असल्याने मोगलीचा मेंदू अनेक गोष्टी  अंतर्मनात नोंदवत असे. खूपशा गोष्टी लक्षातही ठेवत असे. अशा उदास क्षणी पप्पू मदतीला धावत असे. यासोबत बापमाणूस म्हणून एक भलामोठा अजगर हाही जुना जंगलवासी होता. या सर्वाना मोगलीचं अप्रूप होतं. (काही कथेत अजगराला मोगलीचा शत्रू दाखवलं आहे.)

या तिघा-चौघांनी मोगलीला खरं जंगल दाखवलं. गुरुस्थानी असल्याने मोगलीही अनेक गोष्टी शिकत गेला. पुढे मोगलीला जंगली माकडांनी फसवून शेरखान या जंगलाचा राजा कम् गुंड वाघासमोर आणलं. हा शेरखान मला सर्वात जास्त डेंजर वाटला, कारण याला आवाज होता तो नाना पाटेकर यांचा. त्यामुळे वाघाचा आवाज हा खरेच धडकी भरवणारा होता.

शेरखानला माणसांवर आधीच राग, कारण त्याच्या चेहऱ्यावर झालेला हल्ला. त्यात मोगलीचे मांस खायची इच्छा असल्याने तो मोठे डाव आखायचा. वाघ तो शेवटी वाघच. अत्यंत क्रूर व प्लॅनिंग करणारा.

कथेच्या शेवटी व्हिलन असणाऱ्या शेरखानचा ‘वध’ होतो. आणि मोगली साऱ्या जंगलासमोर विजेता ठरतो.

यात त्याच्या पाठीशी असतो तो कुटुंबाचा आधार. लीला ही आई, तर अकडू, पकडू हे समवयस्क भाऊ. इतर सर्व लांडगे मित्र. यांच्या एकत्रित राहण्याने मोठय़ा शत्रूवरही विजय मिळवता येऊ शकतो. ही कथा अनेक वेगळ्या रूपात आपण वाचत असतो, पण यातला थरार काही औरच. या कथेत माणूस हा नेहमीच वरचढ दाखवला आहे. कारण पूर्ण जंगल मोगलीची भाषा बोलताना दाखवलं आहे.

मोगलीशी सर्वच चांगले वागतात. का? ते माणूसपण का दाखवतात? त्यांच्यातले जंगलीपण कुठंय? असा प्रश्न काही वेळा पडतो. मोगलीची भाषा आणि प्राण्यांची भाषा ही सारखी होती. म्हणजे प्राण्याच्या प्रजातीप्रमाणे त्यांच्या भाषा वेगळ्या असत, पण या मालिकेत सर्व प्राण्यांना समान भाषा होती. तीच भाषा मोगली गावातल्या माणसांशी बोलतानाही वापरतो. अर्थात काल्पनिक कादंबरी असल्याने आपल्याला या गोष्टी जराही खटकत नाहीत. शेवटी मोगली गंगा या गावकरी मुलीकडे आकर्षति होतो व गावाकडच्या वाऱ्या वाढू लागतात.

हे भारतातलं पहिलं कार्टून आहे, जिथं जापनीज शैलीतील चित्रं पाहायला मिळाली. कॅमेरा अँगल, कलर स्कीम, प्राण्यांचे चित्रण, पोतदेखील वेगळा होता. त्यात गांभीर्य होते. तेच डिस्ने कंपनीतले कार्टून फारच विनोदी अंगाने जाताना वाटते. यूटय़ूबवर या दोन्ही प्रकारच्या मोगलीचे काही भाग पाहायला विसरू नका.

chitrapatang@gmail.com