18 October 2019

News Flash

चित्रकलेचा छंद जोपासताना..

माय स्पेस

अथर्व प्रशांत निजसुरे इयत्ता- ८ वी ए. जी. हायस्कूल, दापोली.

आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रकारचा छंद असतो. छंदामुळे आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. मला चित्रं काढायला आवडतात. मी खूप लहान असताना गाडय़ा, फुले, झाडे अशी चित्रे काढायचो. शाळेतही मला चित्र काढून रंगवायला खूप आवडतं. मला लहानपणापासूनच फुलपाखरं ओळखण्याची आवड होती. आईच्या मार्गदर्शनामुळे मी अनेक प्रकारची फुलपाखरे ओळखायला शिकलो.

फुलपाखरं बघणं हा एक छंद सुरू होताच. नंतर असाच एकदा माझ्या मनात विचार आला की आपण फुलपाखराचं चित्र काढावं. इयत्ता पाचवीत असताना मी पहिल्यांदा फुलपाखरांची हुबेहूब चित्रे काढण्याचा प्रयत्न केला व ती काढायला मला जमलीसुद्धा. सुरुवातीला पाटीवर काही फुलपाखरं काढली. नंतर वहीत शिसपेन्सिलने काही चित्रं काढली आणि मग हळूहळू काही चित्रं मी रंगवून पूर्णही केली. गेल्या वर्षी सातवीत असताना पक्ष्यांची हुबेहूब चित्रे काढली. मी काढलेली पक्ष्यांची ६ चित्रे २०१७ साली ठाणे येथे झालेल्या पक्षी मित्र संमेलनात मांडली गेली होती. तिथे खूप लोकांनी माझं कौतुक केलं. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका दादाने तर माझ्यासोबत फोटोसुद्धा काढला. हा सर्व अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असा होता. सुरुवातीला मला वाटायचं की, मला पक्षी काढायला जमतील की नाही? पण आईच्या मार्गदर्शनाखाली मी ही चित्रे काढायला सुरुवात केली आणि लक्षात आलं, मला हे पण छान काढता येतं.

मी लहान असताना चित्रकलेचं विशेष असं काही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. पण त्यावेळी आणि आजही चित्रे काढताना माझ्या आईची चित्रकला चांगली असल्याचा फायदा मला तिच्या मार्गदर्शनातून जाणवतो. मी सहावीत असताना डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचा प्रकल्प तयार करताना त्याच्यातील सर्व चित्रे तसेच प्रकल्पाच्या मुखपृष्ठावरील चित्र मी स्वत: काढून रंगवले होते.

आम्हाला शाळेत चित्रकला हा विषय महाजन सर शिकवतात. त्यांची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते. चित्र काढताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे बारकावे ते आम्हाला समजावून सांगतात. त्यामुळे आमची चित्रे छान होतात. या गोष्टींचा फायदा मला अन्य चित्रे काढतानादेखील जाणवतो.

आमच्या घरी येणारे पाहुणे माझी चित्रे बघून ते माझं खूप कौतुक करतात. अशा वेळी मला खूप छान वाटतं आणि नवीन चित्रे काढण्याचा उत्साह येतो. हा छंद जोपासताना मिळणाऱ्या आनंदाबरोबरच माझी निरीक्षणशक्ती वाढायलाही मदत होते, हे मला जाणवतं.

माझ्या आई-बाबांनीदेखील माझ्या या छंदाला चांगले प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी मी काढलेल्या चित्रांचे बुकमार्क तयार केले आहेत. हे बुकमार्कोम्ही अनेक लोकांना भेट देतो. हा छंद असाच जोपासण्याची व वाढवण्याची माझी इच्छा आहे.

balmaifal.lok@gmail.com

First Published on March 23, 2019 2:14 pm

Web Title: the success story of atharva nijsure