News Flash

दात पळून न जाण्याची गोष्ट

तोंडावरून रजई काढली. डोळे झोपेने अजूनही जडशीळ झालेले होते. तिने अम्मीकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे झाकून झोपून गेली.

(संग्रहित छायाचित्र)

फारूक एस. काझी

farukskazi82@gmail.com

‘‘गज्जो, उठो बेटा. स्कूलबस येईल इतक्यात.’’ अम्मीच्या आवाजाने चार वर्षांची गजल अंथरुणात चुळबुळली. तोंडावरून रजई काढली. डोळे झोपेने अजूनही जडशीळ झालेले होते. तिने अम्मीकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे झाकून झोपून गेली.

‘‘उठ लवकर. ड्रायव्हर चाचू ओरडतील. तुझ्यामुळे त्यांना रोज रोज उशीर होतो.’’

अम्मी आत आली. तिच्या येण्याचा आवाज आला तशी गजलने रजई आणखी गुंडाळून घेतली.

‘‘या पोरीला सकाळी उठायचा भारी कंटाळा. उठो बेटा. देर हो रही है.’’ अम्मीने रजई खस्सकन ओढून घेतली. गजलने जोरजोरात पाय आपटायला सुरुवात केली.

अम्मीने तिला उचलून घेतलं आणि बाथरूममध्ये नेलं. तिच्या हातात तिचावाला हिप्पोचं तोंड जोडलेला ब्रश दिला. त्यावर पेस्ट लावली.

‘‘चलो, शुरू करो. वन, टू, थ्री स्टार्ट!’’ अम्मीला वाटले, आता ही ब्रश सुरू करेल. पण गजल महावस्ताद. तिने ब्रश हातात घेतला आणि तोंडासमोर धरून आडवा-उभा फिरवू लागली. अम्मीकडे रागाने पाहत हे हवेतलं दात घासणं सुरू होतं. अम्मीने कपाळाला हात लावला. अम्मीने स्वत: हातात ब्रश घेऊन तिचे दात घासून दिले. त्यालाही गजल तयार होईना.

गजल कशीबशी तयार झाली. इतक्यात खाली रस्त्यावर बसच्या हॉर्नचा आवाज झाला. अम्मीने गडबडीने तिला बाहेर आणलं. ड्रायव्हर रागाने पाहत होता.

‘‘भाभी, जरा जल्दी तय्यार किया करो इसको. लेट हो जाता है.’’

‘‘हा, भाई. पोट्टी जल्दी उठती नही. पुढे असं होणार नाही.’’ बस निघून गेली.

गजलचा उतरलेला चेहरा तिलाही पाहवत नव्हता. तिने एकदाचं हुश्श केलं आणि घरात आली. ‘‘आता तिच्या बाई आणि ती!’’

बस सुरू झाली आणि गजल खिडकीतून बाहेर पाहू लागली. काल रस्त्यावर एक नवीन तंबू लावलेला दिसला होता. रंगीबेरंगी तुकडे जोडलेला. तो आजही दिसतो का हे पाहण्यात ती गुंतली होती. तोवर तिच्या कानावर सावलीचं एक वाक्य पडलं.

‘‘आमच्या ना, दीदीचे ना.. दातच पलून गेले.’’

‘‘दात पळून जातात. पडतात हे माहीत होतं. भय्याचे पण पडले. आता नवीन येतील. पण पळून कसे काय जातात दात? आणि जातात ती कुठं?’’ गजल विचारात पडली. आता ती तंबू कुठल्या कुठं विसरून गेली.

‘‘सावली, दात पडले की पळून गेले गं? सापडले का?’’ गजलने एकदम गंभीर मुलासारखं शांतपणे विचारलं.

‘‘पलून गेले. छोदले. नाय सापल्ले. दीदी लय लल्ली.’’ आता गजलला जाम टेंशन आलं.

‘‘दात पडले तर उगवून येतात, पण पळून गेले तर सापडतच नाहीत.’’ गजल आता खूपच गंभीर झाली होती.

‘‘कशाने पळून गेले गं दात?’’ गजलचा पुढचा एकदम गंभीर प्रश्न.

शाळा जवळ आल्याने ड्रायव्हर काकांनी हॉर्न वाजवला. आता उतरायचं या घाईत सावली घाईतच म्हणाली, ‘‘दात घासत नव्हती. मम्मी लोज वलडायची. आता कलेल तिला मजा.’’ असं म्हणून सावली खाली उतरून निघून गेली.

गजलने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर तिला आपले दात पळून गेलेत आणि सगळे आपल्याला हसत आहेत असं वाटलं. ती घाबरली. जड पावलांनी शाळेकडे गेली. घरी आल्यावरही ती गुपचूपच होती. रात्री झोपण्याआधी तिने अम्मीकडे ब्रश मागितला. अम्मीला धक्काच बसला! आज काय झालंय हिला? सकाळी एकदा ब्रश करायला नको म्हणणारी पोरगी आज रात्री ब्रश करायचं म्हणतेय. अम्मीने ब्रश दिला.

‘‘उठ लवकर, नाहीतर माझे दात पळून जातील.’’ अम्मीला काही उलगडा होईना. तिने गजलला जवळ घेऊन प्रेमाने विचारलं तेव्हा तिने सकाळची सावलीवाली सगळी स्टोरी सांगितली. अम्मीला खरं तर हसू आलं होतं, पण ती हसली नाही.

रात्री गजल झोपेत काहीतरी बडबडत होती. तिला एक स्वप्न पडलं होतं. गजल सकाळी जेव्हा उठून बसली आणि अम्मीने तिला ब्रश कर असं सांगितलं, तिने नेहमीप्रमाणे तोंडासमोर ब्रश धरून दात घासल्याचं नाटक सुरू केलं.

‘‘झाली बघा हिची नाटकं सुरू. आता ही हवेत ब्रश करणार आणि आपण घाणेरडं होणार.’’ एक दात वैतागून इतर दातांना बोलला.

‘‘हो नं, ही पोरगी कमालीची आळशी आणि घाणेरडी आहे. मला कंटाळा आलाय आता. तोंडाचा वास मला आता सहन होत नाहीये.’’ कोपऱ्यातला एक छोटुसा दात चिडून बोलला.

‘‘काय करायचे? आता काही उपाय नाही. आपल्याला पडायला अजून खूप दिवस लागतील.’’

‘‘आहे उपाय. आपण सगळेजण पळून जाऊ. सावलीच्या बहिणीचे सगळे दात पळून गेले, तसेच.’’

‘‘काय सांगतोस! चला मग, आपण आता पळायची तयारी करू या. असल्या घाणीत नाही राहायचं आता.’’ सगळ्यांनी सुरात सूर मिसळला.

‘‘आता ही चूळ भरेल आणि आपण पाण्यातून पळून जाऊ. सापडायचं नाही अजिबात! सगळे तयार राहा.’’ सगळे दात तयार झाले.

गजल तोंड धुवायला बाथरूममध्ये गेली. तोंड धुता धुता जेव्हा तिने चूळ भरली तेव्हा तिच्या तोंडातून सगळे दात बाहेर पडले आणि पळून गेले. गजल खूप जोराची घाबरली. ‘‘आले, कुटं चाल्लाय?’’ दात नसल्याने तिला बोलताच येईना. तिला रडू यायला लागलं. घरातले सगळे तिच्यावर हसले. मत्रिणींनी टिंगलटवाळी केली. गजलला रडू आलं. गजल झोपेत रडते आहे असं पाहिल्यावर अम्मी तिच्याजवळ आली.

‘‘गज्जो, क्या हुवा सोनी? क्यूं रो रही है’ गजलने अम्मीला मिठी मारली.

‘‘अम्मी, माझे दात पळून तर नाही ना जाणार? मला सगळे हसतील.’’ अम्मीने तिला कवटाळलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत तिला सांगू लागली.

‘‘गज्जो, दात पडतात बाळा. पळून जात नाहीत. पण आपण जर दात नाही घासले, स्वच्छ नाही केले तर मात्र ते पळून जातात. तू जर दातांशी मत्री केली तर ते अजिबात पळून जाणार नाहीत. दोस्त कभी भी भागते न. साथ साथ रहते हैं.’’

गजलला बरं वाटलं. दातांशी मत्री केली तर ते पळून जाणार नाहीत असा तिला विश्वास वाटला. अम्मीने तिला थोपटून झोपवलं. सावलीच्या बोबडय़ा बोलांनी गजलला जाम भीती घातली होती! अम्मीने असा विचार केला आणि तिला हसूच आलं.

‘‘गज्जो, उठो बेटा. बस आयेगी अभी.’’ अम्मीने गजलला नेहमीप्रमाणे उचलून बाथरूममध्ये नेऊन बसवलं आणि तिचं नवीन दाताच्या आकाराचं टोपण असणारा ब्रश हातात दिला. अम्मी किचनमध्ये निघून गेली. गजलने दात घासून चूळ भरली. आपले दात पळून तर जात नाहीत ना, हे तिने आरशात पाहून घेतलं आणि छानसं गालातल्या गालात हसली. अम्मी दाराआडून हे सर्व पाहत होती. गजलची दातांशी मत्री झाली होती. आता सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावं असा विचार करत करत ती किचनमध्ये गेली. गजल अजूनही आपल्या दातांनाच पाहत होती. ती आज सावलीला एक गोष्ट सांगणार होती- आपले दात पळून न जाण्याची गोष्ट!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:04 am

Web Title: thing about teeth balmaifal article abn 97
Next Stories
1 चित्रांगण : पतंग
2 उंच माझा झोका
3 मनमैत्र : सत्य आणि मत
Just Now!
X