डॉ. तेजस्विनी कुलकर्णी

dr.tejaswinikulkarni@gmail.com

क्रीडास्पर्धा म्हटलं की एकच जल्लोश असायचा माझ्या लहानपणी. कोण जास्तीतजास्त बक्षिसं पटकावणार याची चुरस माझ्या शाळेच्या क्रीडा सप्ताहाचं वैशिष्टय़च होतं जणू. नव्या खेळातील कौशल्य, खिलाडूवृत्ती, एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे अनुभव अशा अनेक गोष्टी क्रीडा स्पर्धानी शिकवल्या. मात्र, माझ्या ९वीच्या स्पर्धाच्या वेळेस घडलेला एक किस्सा मला एक वेगळीच शिकवण देऊन गेला.

माझा एक वर्गमित्र कबीर. खूप चांगला खेळाडू. आमच्या खो-खोच्या संघाचा कर्णधार तर तो होताच, पण धावण्यातसुद्धा कायम पहिला यायचा. मात्र या वर्षी क्रीडा स्पर्धाच्या तीन-चार महिने आगोदर तो सायकलवरून पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हापासूनच त्याने क्रीडा स्पर्धाचा धसका घेतला.

‘‘कबीर, तू या वेळी अजिबातच उत्साही दिसत नाहीस. एका महिन्यावर आल्यात आपल्या स्पर्धा. काय, जिंकायचं आहे ना नेहमीप्रमाणे आपल्या वर्गाला!’’ आमच्या वर्गशिक्षिका काटेबाईंनी कबीरला पाठ थोपटत विचारले. त्यांना काहीतरी गडबड जाणवली असावी.

‘‘बाई, मला नाही जमणार या वर्षी खेळायला. माझा पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे माझं खेळातलं कसब कमी झालं आता. मी नाही जिंकू शकणार!’’ कबीरने प्रामाणिकपणे त्याची शंका काटेबाईंना बोलून दाखवली.

बाईंच्या लक्षात आलं काय गडबड झाली ती. खरं तर कबीरचा पाय आता एकदम बरा झाला होता. डॉक्टरांनी त्याला खेळायची परवानगीसुद्धा दिली होती. बाईंनी यावर उपाय म्हणून संपूर्ण वर्गाला एक वेगळाच धडा शिकवण्याचं ठरवलं. फक्त खेळातीलच नव्हे, तर अक्षरश: कुठेही वापरता येईल अशी एक शिकवण होती ती.

‘‘सुप्रभात मुलांनो! बसले का सगळे जागेवर?’’ दुसऱ्या दिवशी आल्या आल्या काटेबाईंनी उत्साहाने सुरुवात केली. ‘‘आज आपण सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल बोलणार आहोत. ऐकला आहे का हा शब्द कोणी?’’

‘‘म्हणजे अर्ध्या भरलेल्या पेल्याची गोष्ट ना?’’ गीताने बरोबर ओळखलं.

‘‘शाब्बास गीता! त्या पेल्याला जसं आपण अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा, या दोन्ही प्रकारे पाहू शकतो, तसंच आपल्या आसपासच्या परिस्थितीमध्येसुद्धा काही चांगल्या आणि काही वाईट अशा दोन्ही गोष्टी किंवा शक्यता असतात. आपण विचार करताना त्यातील चांगल्या, सकारात्मक गोष्टींवर भर देणे म्हणजेच सकारात्मक विचार.’’

‘‘पण बाई, सकारात्मक की नकारात्मक हे ओळखायचं कसं? आणि नकारात्मक विचार करणं का चुकीचं असतं?’’ कबीरला आता या संकल्पनेत रस वाटू लागला होता.

‘‘त्यातलं चूक वा बरोबर असं काहीच नसतं कबीर. जो विचार आपल्याला उपयोगी असतो तो सकारात्मक विचार. आणि ज्या विचारांमुळे आपले काही नुकसान होते वा फारसं काही भलं होत नाही ते नकारात्मक विचार.

ते ओळखायची एक सोपी युक्ती म्हणजे, ज्या विचाराने आपण आनंदी होतो, आपला आत्मविशवास वाढतो तो विचार सकारात्मक असतो. ज्या विचारांनी आपल्याला कमीपणा, भीती, उदासी येते, ते विचार म्हणजे नकारात्मक. तुम्हीच सांगा, आपला फायदा हा चांगले विचार करण्यात आहे का नकोसे  वाटणारे विचार करण्यात आहे?’’

‘‘चांगले विचार करण्यात. पण बाई, हे चांगले विचार करून आपला कसा काय फायदा होतो ते नाही कळालं मला.’’ विशालच्या सुपीक डोक्यातून एक तर्कशुद्ध शंका आली.

‘‘सांगते हं. कबीर, पुढे ये पाहू.’’ बाई आता चांगल्याच रंगात आल्या. कबीर लगेच पुढे गेला. ‘‘मला सांग कबीर, तू काल क्रीडा स्पर्धाबद्दल काय म्हणालास?’’

‘‘मला या वेळी खेळायला जमणार नाही. मी जिंकू शकणार नाही,’’ कबीरचं तडक उत्तर आलं.

‘‘मुलांनो, विचार करा, पुढे दोन्ही शक्यता आहेत खेळ जमण्याची व न जमण्याची. आपल्याला काय निकाल मिळणार हे आपल्या कृतीवर ठरते. योग्य दिशेने कृती केली तर यश आणि कृतीमध्ये उणिवा असतील तर अपयश. बरोबर? आपल्या मनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा, की आपली कृती ही  आपल्या मनातल्या विचारांशी जुळणारी असते. त्यामुळे आपण केलेले सकारात्मक विचार हे कृतीच्या मार्गाने आपल्याला यशापर्यंत पोहोचवतात. हेच उलट चक्र नकारात्मकतेसाठी काम करतं. कबीरने आत्ता केलेल्या नकारात्मक विचारांचा परिणाम त्याच्या कृतीवर होऊ शकतो. म्हणजेच हरण्याच्या विचारांतून केलेला सराव वा प्रयत्न कमी पडून अपयश येण्याची शक्यता जास्त असते. हे नक्कीच आपल्या तोटय़ाचं आहे. हो ना?’’

‘‘हो बाई! पण मी जर यातल्या चांगल्या, सकारात्मक शक्यतेवर लक्ष केंद्रित केलं, मी नक्की जिंकू शकतो, असा विचार करण्यावर भर दिला तर माझे प्रयत्नही उत्तम होतील, माझा आत्मविशवासही वाढेल, त्यामुळे मला निकालही चांगला मिळेल. असंच काम करतं ना पॉझिटिव्ह थिंकिंग?’’ कबीरला आता नवी उमेद मिळाली.

‘‘अगदी बरोबर. ही विचार करायची पद्धत तुम्हाला पुढे मोठे झाल्यावरपण उपयोगी पडेल बरं का!’’ काटेबाई आनंदाने वर्गाला सांगत होत्या.

एवढय़ात तास संपल्याची घंटा झाली. या तासाने जणू मला कठीण परिस्थितीला सामोरे जाताना वापरायचा एक मूलमंत्रच दिला.