खाण्याचा फारच विचार करता बाबा तुम्ही! खरं सांगू का? आम्हाला मुळात खायचं म्हटलं कीच कंटाळा येतो. खूप कुरकुर होते ‘खाणे’ या विषयावरून घरात; आणि त्यात खाताना हे करा नि ते करा. सांगायला काय जातंय तुम्हाला? असं आमच्या काही दोस्तांना वाटतंय म्हणे! खरं तर खाणं हे काही कंटाळा करण्याचा विषय नाही, कारण आपण आपल्या भरण नि पोषणासाठीच खात असतो. आणि योग्य ते आणि योग्य त्या प्रकारे खाण्याने आपल्यालाच फायदा होणार असतो. त्यामुळे खाण्यासाठी नाक मुरडत असाल तर ते चुकीचं आहे बरं का! पण मी मात्र आज ‘खाण्यापासून’ पुन्हा ‘ऐकण्यापर्यंत’ परत येतेय. म्हणजे आता एक गोष्ट करू या. ऐकताना थोडा बारकाईने शब्दांचा विचार करू या. टी.व्ही. हा शब्द आपण कित्ती वेळा वापरतो की नाही, मग हा शब्द आला की त्याला मराठी शब्द कोणता तो विचार करू या. हो, हो, आम्हाला माहीत आहे की सगळ्यांना तो शब्द माहीत आहे टीव्ही संच. पण ‘बेडशीट’ला सांगा बरं मराठी शब्द? आठवा, आठवा. नाही आठवत? तो आहे ‘पलंगपोस.’ असे नेहमीच्या वापराच्या  शब्दांना दुसऱ्या भाषेतले प्रतिशब्द शोधणं हे काम तुम्ही एकटय़ाने  डिक्शनरी अर्थात शब्दकोश वापरून करू शकाल. हो, हो, माहीत आहे आम्हाला, ह्या आमच्या कामासाठी मोबाइल वापरायला आई-बाबा नक्कीच नाही म्हणणार नाहीत. तुम्ही जेवढे मोठे असाल, जेवढय़ा वेगवेगळ्या भाषा बोलू शकत असाल; तेवढे वेगवेगळ्या भाषांसाठी हे वापरू शकाल. तुमचे कोणी कोंकणी, कन्नड, गुजराथी असे अन्य भाषक दोस्त असतील तर त्यांनाही फोन करून असे शब्द विचारू शकाल. मग वाट कशाची पाहाताय? ऑन अ मार्क, गेट सेट गो!!!                                 
मेघना जोशी – joshimeghana231@yahoo.in