|| श्रीनिवास बाळकृष्णन

आजपासून ७७ वर्षांपूर्वी.. बॉब क्लम्प्टन याने १९४२ साली बॅबीट आणि कॅटसेलो या दोन खोडकर मांजराच्या समोर ‘ओर्सन’ नावाच्या एका जंगली कॅनॉरी पक्ष्याच्या पिल्लाला उभं केलं. खरा कॅनॉरी पक्षी कसा दिसतो यासाठी तुम्हाला गुगलमामाला विचारावे लागेल.

१९४२ च्या पहिल्या कार्टून फिल्ममध्ये (फोटोत असल्याप्रमाणे) गुलाबीसर, झोपाळू डोळ्यांचं, पिसं नसलेलं नागडं पिलू होतं! खूपसं खऱ्या पक्षी पिलूप्रमाणे! मग मात्र ओर्सनच्या कार्टूनमधल्या नागडेपणाला सेन्सॉर लागू नये म्हणून त्याला पंख दिले, पिसं दिली. असा तयार झाला पिवळाधमक छोटा पक्षी व घारे, निळे डोळे असणारा तरुण ट्विटी! आधीपेक्षा वेगळा.

ट्विटीने आपल्यातली हिंसा पहिल्याच कार्टूनमध्ये दाखवली. हा पक्षी भारतात आढळत नाही. केवळ अमेरिकेतील काही प्रांतांत आढळतो. त्यामुळे आपल्याला सर्व छोटे पक्षी गरीब बिचारे वाटतात. पण हा ट्विटी अजिबात तसा नाही. त्यात दिसायला जाम क्यूट असल्याने त्याच्या मनातल्या आक्रमकतेचा काहीच थांगपत्ता लागत नाही.  हा इतर पक्ष्यांसारखा नाही. सोनेरी पिंजऱ्यात स्वखुशीने राहणारा! जसं की.. पिंजरा नसून ते घरच! कारण त्यात तो कधीही आत- बाहेर करू शकतो, पण बाहेरचे कोणी आत येऊ शकत नाही. हे बाहेरचे कोण? असे जर का ट्विटीला विचारले तर ते सांगतील की, छोटय़ा पक्ष्याचे हजार शत्रू!

बॉब क्लम्प्टनने १९४२ साली सिल्व्हेस्टर या काळ्या पांढऱ्या मांजराला ट्विटीसंगे भिडवलं. आपला थॉमस टॉम (टॉम अँड जेरीमधला) आणि विली इ. केयोट (रोड रनरमधला) प्रमाणेच हा मांजरूदेखील ट्विटीला खाण्यासाठी म्हणून पकडू लागला. त्यासाठी योजना आखू लागला. त्यात दरवेळी अपयशी होऊ लागला. असे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी कुणी अपयशी होऊ लागला तर आपल्याला अजिबातच आवडत नाही.

त्या वैतागात तो नवी उपकरणे (अकमे) मागवू लागला. काही स्वत:ही बनवली. आणि अर्थातच ती फेल गेली. टोट्टल फेल! आणि सिल्व्हेस्टर उपाशीच राहिले. त्यात ग्रॅनी आज्जीचा ओरडा आणि हेक्टरचा (बुलडॉग कुत्रा) मार खावा लागत होता. हेक्टरदेखील ट्विटीच्या मागे होताच. या साऱ्यांना पुरून उरला इवलासा ट्विटी. या सगळ्या गोंधळाला जागेचे बंधन नव्हते. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही ही पकडापकडी सुरू व्हायची!

ट्विटीला पहिला आवाज दिला तो मेल ब्लँक यांनी. कार्टूनला आवाज देणाऱ्या या कलाकाराचे नाव आपण याआधीही ऐकले आहे. ही बरीच पात्रे बोलण्यातील अडचणींसाठी ओळखली जातात. ट्विटी ‘स’, ‘क’आणि ‘ज’ ऐवजी ‘ट’, ‘ड’ बोलायचा. उदाहरणार्थ, ‘पुस्सी कॅट’ ऐवजी ‘पुट्टी टाट’ असे आणि त्याचेही पुढे अपभ्रंश होत ‘पुडकी टाट’ म्हणून बोलले गेले. याच न्यायाने ‘स्वीटी’चे ‘ट्विटी’ झाले, म्हणूनच त्याचे नाव ट्विटी असे पडले. आपल्याकडे मर्फीचा ‘बर्फी’ झाला तसा!

१९९० च्या दशकात ट्विटी, ग्रॅनी, हेक्टर, सिल्व्हेस्टर यांनी एक डिटेक्टिव्ह एजन्सी चालवली होती. १९९६ मध्ये ट्विटी हा प्रसिद्ध खेळाडू मायकल जॉर्डनसोबत ‘स्पेस जॅम’ या सिनेमात दिसला. २००१ साली ट्विटीची छोटी आवृत्ती बेबी लुनी टय़ूनवर आली. २०१० मध्ये कार्टून नेटवर्कचा द लुनी टय़ुन्स, न्यू लुनी टय़ुन्स शो आले. ज्यात ट्विटी अधिक आक्रमक व हिंसक होता. ग्रॅनी आजीला भेटल्यानंतर  त्याच्यातील आक्रमकपणा आणखीच वाढला. थंड डोक्याचा आक्रमक म्हणून ट्विटी त्याच्या शत्रूमध्ये ओळखला जातो.

ब्रिटिश कलाकार बँकसी याने २००८ ‘न्यूयॉर्क आर्ट इंस्टॉलेशन’ मध्ये ट्विटीचे शिल्प केले. ट्विटी आणि सिल्व्हेस्टर लहान मुलांसाठीच्या अनेक वस्तूंवर अजूनही दिसतात. आपल्या भारतीय बाजारात कंपास, बॅग, मोबाइल कव्हर, स्टिकर, उशी, गादीचे सॉफ्ट टॉय, अंथरून-पांघरूण, ब्रश, फ्रॉक, जॅकेट, बाहुल्या, व्हिडीओ गेम असे काहीही बनत गेले. कारण एकच ट्विटीचा क्युट चेहरा व पिवळ्या रंगाला ग्राहक जास्त आकर्षति होतात, हा विक्री सिद्धांत!

अ‍ॅनिमेशन इतिहासामध्ये सिल्वेस्टर आणि ट्विटी ही सर्वात उल्लेखनीय जोडी असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या बऱ्याच कार्टूनने प्रमाणित सूत्राचे अनुसरण केले. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात ट्विटी प्रसिद्ध होत गेला.  खुद्द अमेरिकन प्रशासनाला ट्विटीने मोहित केले. या दोघांवर एक टपाल तिकीटही होते. ज्यामुळे वॉर्नर ब्रदर्सला सर्वोत्कृष्ट शॉर्ट सब्जेक्टसाठी पहिला अकादमी पुरस्कार मिळवून दिला.

chitrapatang@gmail.com