बालमित्रांनो, आपल्या जीवनात चंद्राला एक विशेष स्थान आहे. पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह म्हणून चंद्र अद्वितीय आहेच. शिवाय त्याच्या शीतल किरणांमुळे तो सर्वाचा आवडता आहे. विज्ञान, काव्य, खेळ, अभिनय, नृत्य यांसारख्या सर्वच क्षेत्रांत त्याचा मुक्त संचार कसा आहे यावर आपले आजचे कोडे आधारीत आहे. ज्या प्रसिद्ध व्यक्तींच्या संपूर्ण नावात ‘चंद्र’ हा शब्द आला आहे अशा व्यक्तींची नावे तुम्हाला ओळखायची आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती सोबत दिलेली आहे.  
१) वनस्पतींना भावना असतात, असे सिद्ध करणारा भारतीय शास्त्रज्ञ.
२) ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजमदी दूँगा।’ अशी घोषणा देऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी यांनी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली.
३) भारताच्या स्वातंत्र्य लढय़ातील काकोरी कटात भाग घेतलेले क्रांतिकारक. हे भगतसिंगाचे गुरू मानले जातात.
४) आर्य चाणक्यांच्या या शिष्याने इसवी सन पूर्व काळात मगध देशाचे सम्राटपद भूषवले.
५) भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारताचे पहिले शास्त्रज्ञ.
६) हातातील किंचितशा अपंगत्वाचा वापर फिरकी गोलंदाजीसाठी करून या क्रिकेटरने भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवले.
७) लाल-बाल-पाल या त्रयीत लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि तिसरे —- होत.
८) ‘अनारकली’, ‘अलबेला’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील सदाबहार गाण्यांचे संगीतकार.
९) अपंगत्वावर मात करून कृत्रिम पायाने उत्कृष्ट नृत्यासाठी गौरवली गेलेली अभिनेत्री.
१०) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख मंत्री.
११) ‘कोसला’ या कादंबरीने इतिहास निर्माण करणारे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते असे मराठीतील श्रेष्ठ लेखक.  
१२) सत्यनिष्ठेसाठी प्रसिद्ध असलेला, प्रभू रामचंद्रांचा पूर्वज असलेला अयोध्येचा राजा.
१३) सर्वाधिक कालावधीसाठी भारताचे सरन्यायाधीशपद भूषविलेले मराठी व्यक्तिमत्त्व.
१४) यांचे ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदेमातरम्’ हे गीत भारताचा मानबिंदू आहे.
१५) ज्ञानाचा सागर असलेले थोर समाजसुधारक. विधवा विवाहाला कायेदशीर मान्यता मिळवून देण्याचे श्रेय यांना दिले जाते.
१६) ‘बंगाल केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स’ ही भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी या प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञाने स्थापली.

उत्तरे :
१) जगदीशचंद्र बोस २) सुभाषचंद्र बोस ३) चंद्रशेखर आझाद ४)
 चंद्रगुप्त मौर्य ५) चंद्रशेखर व्यंकट रामन ६) भागवत चंद्रशेखर ७) बिपिनचंद्र पाल ८) सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर) ९) सुधा चंद्रन १०) रामचंद्रपंत अमात्य ११) भालचंद्र नेमाडे १२) राजा हरिश्चंद्र १३) यशवंत विष्णू चंद्रचूड १४) बंकिमचंद्र चटर्जी १५) ईश्वरचंद्र विद्यासागर १६) प्रफुल्लचंद्र रे.