03 June 2020

News Flash

आमची झोप उडाली

‘‘सई तर झोपेत उठून बसते. काहीतरी पुटपुटते. पुन्हा आडवी होते आणि जागा बदलून कुठेतरी जाऊन झोपते.’’ रतीच्या शब्दांतून आश्चर्य व्यक्त होत होतं.

| December 14, 2014 03:54 am

कडकडां जांभया येती।
चटचटां चटक्या वाजती।
डकडकां डुकल्या देती। सावकास।।
आजी जाणीवपूर्वक मोठय़ा आवाजात दासबोधातील ओवी परत परत वाचत होती.
‘‘अगं, हे तू काय म्हणते आहेस? काहीतरी गमतीशीर शब्द दिसताहेत!’’
bal06इतका वेळ चित्र काढण्यात दंग असलेल्या रतीची समाधी भंग पावली. आजीला मनातून हेच हवे होते.
‘‘समर्थ रामदासस्वामींची भाषा आहे ही. निद्रानिरूपण म्हणजे झोपेवरचा समास आहे हा. झोपेमध्ये काय काय गोष्टी घडतात त्याचे चटपटीत वर्णन समर्थानी केले आहे. तुमच्या रोजच्या झोपेच्या गमती सांगा बघू.’’ – आजी.
सगळ्यांच्या डोळ्यावरची दुपारची झापड क्षणार्धात पळून गेली आणि आजीभोवती गराडा पडला.
‘‘हा अथर्व लोळत लोळत इतका मला चिकटतो, की मी सारखा त्याला बाजूला ढकलत असतो. माझ्या अंगाखाली तो लुकडय़ा चिरडला जाईल अशी मला नेहमी भीती वाटते ना!’’  
खेळकर स्वभावाच्या आदित्यने छोटय़ा अथर्वला हाताने घुसळत आपल्या सशक्तपणावर विनोद केला. हे डोक्यात शिरण्याचे अथर्वचे वय नसल्यामुळे त्याने ‘लोळण’ शब्दाची ओळख कृतीतून दाखवली.
‘‘ही सावनी इतके कराकरा दात खात असते की माझी अगदी झोपमोड होते. किती हलवून सांगितलं तरी काही फरक पडत नाही..’’ सोनलदीदी कुरकुरल्या.
‘‘सई तर झोपेत उठून बसते. काहीतरी पुटपुटते. पुन्हा आडवी होते आणि जागा बदलून कुठेतरी जाऊन झोपते.’’ रतीच्या शब्दांतून आश्चर्य व्यक्त होत होतं.
‘‘परंतु समर्थाना वेगळ्याच झोपेविषयी सांगायचंय..’’ आजीने सूतोवाच केलं.
‘‘झोप.. आणि वेगळी? ती कशी असते बुवा?’’ आदित्यला प्रश्न पडला.
‘‘असं बघा- तुम्ही झोपलात की आजूबाजूला काही चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. तुम्हाला त्या कळतात का?’’ – आजी.
‘‘झोपलो असताना आम्हाला कसं कळेल गं आजी?’’ – रती.
‘‘त्या गोष्टी वाईट असल्या तर तुमचा प्रतिसाद कसा असतो? त्यावर काही उपाययोजना करता का?’’
– आजी.
‘‘नाऽऽही. अगं, आम्ही झोपलेलो नसतो का?’’ सर्वानी एकच सूर लावला.
‘‘याचा अर्थ जेव्हा तुम्ही प्रतिसाद देत नाही, उपाययोजना करत नाही, तेव्हा तुम्ही झोपेत असता. बरोबर?’’
सगळ्या माना नुसत्याच हलल्या.
‘‘समजा, एखाद्या घरात नळ टपटप गळतोय, पण तो दुरूस्त केला जात नाही. पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. ‘पाणी वाचवा, पाणी वाचवा’ असं कानीकपाळी सगळे ओरडत आहेत, तरी पाणी असं फुकट घालवलं जातंय. म्हणजे ते झोपेत आहेत, जागे नाहीत. खरं ना!’’ मुलांच्या कितपत डोक्यात शिरलंय याची आजी चाचपणी करत होती.
‘‘आजी, आमच्या बाईंनी सांगितलंय- पाणी पिताना किंवा कोणाला पाणी देताना भांडं अगदी काठोकाठ भरून देऊ नका. काहीजण एक घोट पितात आणि मग उरलेलं उष्ट पाणी टाकून द्यावं लागतं. म्हणजे पाण्याचा अपव्ययच नाही का?’’
‘‘अरे वा! रती, तू खूपच शहाणी झालीस की! आता आणखी काही ‘अशा’ झोपेची उदाहरणं आठवा बघू.’’
‘‘आजी, मी किती मोटू झालोय. सगळे चिडवतात. खरं तर मी नियमित जिमला जायला हवं. बाबांनी तर पैसेसुद्धा भरले आहेत माझ्यासाठी. पण मीच आळशीपणा करतो. एक दिवस जातो, एक दिवस नाही. घरी अथर्वबरोबर टिवल्याबावल्या करतो, नाहीतर लोळत टीव्ही बघतो. बाबांना यायला खूप उशीर होतो. ते ओरडतील म्हणून ते यायच्या आत झोपून जातो. मला कळतं, पण वळत नाही. म्हणजे मीही झोपेतच आहे ना गं.’’ आदित्यने मोकळेपणी मान्य केलं.
‘‘आता मी आहे ना इथे.. बघते कसा खडबडून जागा होत नाहीस ते. तुला मनापासून पटलंय ना? मग झालं तर..!’’ आजीने आदित्यच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं. छोटय़ा अथर्वने संधी साधून गुद्दाच घातला.
‘‘सोनलताई, आपण गप्प गप्प का?’’ – इति आजी.
‘‘अगं, खिडकीतून सहज खाली पाहिलं तर कितीतरी प्लॅस्टिक कचरा- म्हणजे कुरकुरे, कॅडबरीची वेष्टनं, प्लॅस्टिकच्या पिशव्या खालच्या मोकळ्या अंगणात विखुरलेल्या आहेत. खरं तर घरातल्या कचऱ्याच्या डब्यातच हे टाकायला हवं ना!’’ – सोनल.
‘‘केव्हाही. पण होतं काय, शाळा सुटल्यावर भूक लागली म्हणून हट्ट करून आईकडून पेप्सीकोला आणि काहीतरी वसूल करायचं, खात खात घरी यायचं, संपलं की वेष्टन तिथेच रस्त्यात टाकून द्यायचं. मग वारा आपल्या कामाला लागतो आणि इतस्तत: कचरा पसरवून टाकतो. असं होऊ नये, सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरू नये असं वाटत असेल तर ते प्लॅस्टिकचं वेष्टन आपल्या दप्तराच्या खिशात ठेवायचं आणि घरी आल्यावर डस्टबिनमध्ये किंवा रस्त्यातील कचराकुंडीत टाकायचं. असं करणं म्हणजे आपण झोपेतून जागे झालो आहोत असं समजणं- बरं का!’’
‘‘रेल्वेतून किंवा बसमधून प्रवास करतानाही खिडकीतून काही फेकायचं नाही हे लक्षात ठेवायला हवं गं.’’ सोनलला विषय पूर्ण कळला.
‘‘शिवाय प्रत्येक गोष्ट करताना ‘मी एकटय़ाने करून काय होणार?’ हे पालुपद लावायचं नाही. कळलं?’’ आजीने खुंटा बळकट केला.
‘‘आम्ही आता टक्क जागे झालो आहोत.’’ डोळ्यांची उघडझाप करत सगळे कौतुकाने एकमेकांकडे बघत होते.
‘‘अजून दोन महत्त्वाच्या बाबतीत तुम्हा सर्वाची झोप उडत नाहीये. रती सांगणार का कोणत्या गोष्टी ते?’’
– आजी.
‘‘आजी, तू नेहमी सांगतेस, पावभाजी, पिझ्झा, चायनीज, फास्टफूड सतत खाऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नाही. बाहेर जाताना लेज्, कुरकुरे तू घेऊ देत नाहीस. मला थोडा राग येतो, पण यावर्षी माझ्या वाढदिवसाला तुला आवडेल असा मेनू ठरवून मी सरप्राइज देणार आहे..’’ रतीने जाहीर केलं.
‘‘पण तो एकच दिवस. नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.. असंच ना?’ आदित्यने चिडवायची संधी सोडली नाही.
‘‘नाही गं आजी, प्रॉमिस! आम्ही सगळेजण तुझं ऐकू. मग कधीतरी खायला तू परवानगी देशील. बरोबर ना?’’ रती खुशीत आली.
‘‘आता पाढय़ांचा विषय निघालाच आहे म्हणून सांगते. तुम्ही पेपरात वाचलं असेलच, की शाळेत मुलं वरच्या इयत्तेत जातात, पण त्यांना बेरजा- वजाबाक्या, तोंडी हिशोब फटाफट येत नाहीत. कॅल्क्युलेटर लागतो. पण तो वापरणं चांगलं का?’’
‘‘नाही..’’ मनापासून पटल्यामुळे सगळ्यांच्या माना हलल्या.
‘‘मला खात्री आहे- एवढं सांगितल्यावर माझी नातवंडं झोपेत राहणार नाहीत. ती नक्कीच पाढे पाठ करतील. गरज नसताना घरातल्या सगळ्या खोल्यांमधील दिवे, पंखे चालू ठेवणं, डोळ्यांना जाड चष्मा लागला तरी नुसतं कार्टून चॅनेलला चिकटून बसणं, आपल्या हिताच्या गोष्टी न कळणं म्हणजे झोपेत असल्यासारखंच आहे. आता नवीन वर्ष उजाडणार. मग असं झोपून चालेल का?’’
‘‘आमची झोप उडाली..’’ सर्वानी उडय़ा मारून जाहीर केलं.
‘मागे निद्रा संपली। पुढे जागृति प्राप्त जाली।’ समर्थानी हेच तर सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2014 3:54 am

Web Title: we left sleepless
टॅग Balmaifil,Story
Next Stories
1 सामाजिक संवेदनांचं भान देणारी पुस्तकं
2 डोकॅलिटी
3 मैत्रीने मैत्री जोडे
Just Now!
X