14 December 2017

News Flash

फुलांच्या विश्वात : पळस

वसंत ऋतू सुरू झालाय आणि त्यासोबत झाडांची पानगळ- देखील. किंबहुना, काही दिवस आधीच ही

भरत गोडांबे | Updated: February 12, 2017 2:56 AM

वसंत ऋतू सुरू झालाय आणि त्यासोबत झाडांची पानगळ- देखील. किंबहुना, काही दिवस आधीच ही पानगळ सुरू होते. वसंत ऋतू सुरू झाला की जंगलामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुले फुलायला लागतात. जणू रंगांची उधळणच सुरू होते. आपल्या जंगलामध्ये भगव्या रंगाची उधळण करीत पळस फुलायला लागतो. याचे शास्त्रीय नाव Butea monosperma  (बुटिया मोनोस्पर्मा.) आपली भारतीय वनस्पती. झुडूप किंवा वृक्ष वर्गात याचा समावेश होतो. भारतातील सगळ्या वर्षां वनात/ पानझडीच्या वनात सहज आढळणारी वनस्पती. शहरात मात्र फार क्वचित पाहायला मिळते.

पळसाची फुले झाडाच्या शेंडय़ालगत असतात. गडद भगव्या रंगाचे घोस फार सुंदर दिसतात. साधारणपणे पळस जेव्हा फुलतो त्यावेळी पानगळ सुरू असते. उन्हाची लाही लाही होत असताना भगव्या भगव्या ज्वाळा दिसाव्यात तसा पळसाचा फुलोरा दिसतो आणि म्हणूनच ब्रिटिशांनी या फुलांना “Flame of the Forest” असे नाव दिले.

गडद भगव्या रंगाच्या या फुलांचा आकार काहीसा पोपटाच्या चोचीसारखा असतो. फुलाला पाच पाकळ्या असतात. या फुलांना वाळवून त्यापासून नैसर्गिक भगवा रंग तयार करतात. कपडय़ांना रंग देण्यासाठी हा रंग वापरला जातो. तसेच होळीसाठी नैसर्गिक रंग देखील तयार केला जातो. पूर्वापार काळापासून होळी खेळण्यासाठी पळसाच्या फुलांचा रंग वापरला जातो, तोही अगदी भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून. हा रंग थंड असल्याने ज्यांना उष्णतेचा त्रास आहे; अशा व्यक्तींनी हा रंग पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केली असता उष्णतेचा त्रास कमी होतो. पळसाच्या फुलांपासून चहा देखील करतात. मी स्वत: पळसाच्या फुलांपासून बनविलेल्या चहाचा आस्वाद घेतला आहे त्याची चव अजूनही जिभेवर आहे. काही आदिवासी जमाती या फुलांपासून दारूदेखील तयार करतात. पळसाच्या फुलातील पुल्लिंगी दांडा काढून तोंडात विशिष्ट पद्धतीने पकडून त्यातून फुंकर मारली की पुंगीसारखा आवाज येतो. ग्रामीण भागातील मुलांची ही आवडती करमणूक. ही कला अवगत करायला मला मात्र फार कसरत करावी लागली, तरीही मी बनविलेली पळसाच्या फुलाची पुंगी कधी वाजते तर कधी नाही.

पोपट, खारुताई आणि इतर बरेच पक्षी पळसाच्या फुलातील मध खाण्यासाठी येतात. पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा पळस फार दुर्मीळ, फार क्वचित पाहायला मिळतो.

मानवाच्या विकासामध्ये पळसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पत्रावळी बनविण्यासाठी पळसाच्या पानांचा वापर केला जातो. या पत्रावळींचा वापर जेवणासाठी अनादी काळापासून केला जातोय. पळसाची पाने संयुक्त प्रकारची असतात. पळसाच्या एका पानात साधारणपणे तीन पर्णिका असतात व त्या तीन पर्णिका मिळून एक पान तयार होते.

पळसाच्या झाडाला चपलेच्या आकाराच्या चपटय़ा शेंगा येतात; प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या बीपासून पळसाचे नवीन रोप तयार केले जाते. पळसाची बी वाटून त्याची पेस्ट त्वचा- रोगावर वापरली जाते. पोटात होणाऱ्या कृमींवर पळसाच्या बियांचे चूर्ण गुणकारी आहे. पळसाच्या झाडाला लाल रंगाचा डिंक येतो, तो जुलाबावर औषध म्हणून वापरला जातो. लाखेचा किडा पळसाच्या पानावर आपली उपजिविका करतो.

कितीतरी आदिवासी बांधवांचा संसार पळसाची पाने, फुले, डिंक विकून त्यावर चालतो. असा पुरातन काळापासून मानवाच्या विकासात त्याची मदत करणारा, भगव्या सुंदर फुलांची उधळण करणारा पळसाचा वृक्ष आपल्या सोसायटी परिसरात असणे म्हणजे अहो भाग्यच!

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

First Published on February 12, 2017 2:56 am

Web Title: wonderful world of flowers