-मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा

पावसाळा सुरू झाल्यापासून रोहन आणि चिंगी एकच गाणं गुणगुणत होते-
‘भोलानाथ, भोलानाथ पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
भोलानाथ.. भोलानाथ..’ आणि देवान्ं चक्क त्यांची प्रार्थना ऐकली. जोराचा पाऊस झाला आणि शाळेला सुट्टी मिळाली.

‘‘हे.. हे आज सुट्टी.. आज सुट्टी..’’ दोघेजण आनंदानं नाचत होते. आईनंही मग स्वयंपाकाचा खास बेत केला. संध्याकाळी बटाटेवडे आणि कांदाभजी खाऊन सगळयांची मनं तृप्त झाली. दुसऱ्या दिवशी पहाटेच दोघेही शाळेत जायला उठले, पण आईनं परत झोपायला पाठवलं.

हेही वाचा…बालमैफल : ‘अपोफिस’

‘‘का गं आई? आजपण सुट्टी आहे का शाळेला?’’ रोहनने विचारलं.
‘‘अरे हो.. तुमच्या शाळेत जायच्या रस्त्यावर मोठं झाड पडलं आहे. त्यामुळे स्कूल बस जाऊ शकत नाही. तुमच्या मॅडमचा मेसेज आला होता.’’ आईनं सांगितलं. रोहन आणि चिंगीला दुसऱ्या दिवशीही सुट्टी मिळाली. दोघंही खूश झाले, पण थोडा वेळच. कालपासून घरातल्या घरात बसून कंटाळा आला होता. पाऊस असल्यामुळे बाहेर खेळायला जाऊ शकत नव्हते. दुसऱ्या शाळेत शिकणारे त्यांचे मित्र शाळेत गेले होते.

‘‘बाबा, कंटाळा आला हो घरात बसून.’’ रोहन तक्रार करीत म्हणाला. रोहनचे बाबा वर्क फ्रॉम होम करत होते म्हणून ते घरी असत. पण आता दोन्ही मुलांचे चेहरे पाहून त्यांना वाईट वाटलं. आपल्या लहानपणी आपण केलेल्या गमतीजमती त्यांना आठवल्या. त्यांनी आपल्या मनात काहीतरी ठरवलं. त्यांच्या घरापासून जरा दूर त्यांची शेती होती. रोहनचे आजोबा सकाळीच उठून तेथे जायचे. कारण सध्या भातशेती लावायचं काम चालू होतं.
‘‘चला, रोहन, चिंगी.. तुमचे रेनकोट आणि गमबूट घाला बघू. आपण आज आपल्या शेतावर जाऊ.’’ बाबांनी ऑर्डर सोडली.

हेही वाचा…चित्रास कारण की… : कांचीवरम

‘‘हे.. हे.. शेतावर? मज्जाच मज्जा.’’ चिंगी ओरडत म्हणाली. तयारी करून दोघेही बाबांबरोबर शेतावर जायला निघाले. आईनं बरोबर थोडा खाऊ बांधून दिला. मुख्य डांबरी रस्ता संपला आणि शेताचा रस्ता लागला.

‘‘चिंगी, सांभाळून हं. चिखल आहे.’’ बाबांनी सांगितलं. तरी चिंगी पाय घसरून पडता पडता वाचली. मग बाबांचा हात धरूनच ती चालू लागली. रोहन मात्र एकटा धडपडत, पण मजेत चालला होता. आजुबाजूला बऱ्याच लोकांची शेती होती. चांगला पाऊस झाल्याने सगळयांची भातशेती लावायची धावपळ चालू होती. कोणाच्या शेतात कामगार रोप लावत होते; तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने जमीन नांगरून मऊ (चिखल) करायला घेतली होती. रोहनच्या शेतातदेखील लावणी (भाताची रोपे जमिनीत लावणे) चालू होती. आजोबा कामगारांबरोबर शेतात काम करीत होते.

हेही वाचा…बालमैफल : चिन्मयची दुनिया

‘‘आजोबा! आम्ही आलो!!’’ चिंगीनं जोरात आजोबांना आवाज दिला.
‘‘अरे रोहन, चिंगी, तुम्ही? या या.’’ आजोबा त्यांना पाहून खूश झाले.
‘‘आजोबा, तुम्ही तेथे चिखलात काय करता? घसरून पडले म्हणजे?’’ चिंगीला काळजी वाटली.
‘‘काही पडत नाही मी. तुम्हीपण या इथे. आपण रोपे लावू.’’ आजोबा हसत म्हणाले.

शेताच्या कडेला बसण्यासाठी एक तात्पुरती सोय केली होती. रोहनच्या बाबांनी दोघांना तेथे बसवलं. पण रोहन चुळबूळ करू लागला. त्याला आजोबांबरोबर शेतात जायचं होतं.
‘‘बाबा मी जाऊ का शेतात?’’ रोहननं विचारलं.
‘‘बरं जा, पण सांभाळून.’’ बाबांनी परवानगी दिली.
आजोबांनी हात देऊन रोहनला शेतात नेलं. हातातल्या रोपांच्या मोठया जुडीतून थोडी थोडी रोपं काढून त्या काकू पटापट जमिनीत रोवत होत्या. ते पाहून आपणही तसं करावं असं रोहनला वाटलं. म्हणून त्या काकूंनी त्याच्या हातात थोडी रोपं दिली. मग रोहनही आजोबांबरोबर शेतात लावणी करू लागला. चिखलात हात घालायचा एक नवीन अनुभव घेऊन रोहनला मज्जा आली.

हेही वाचा…बालमैफल: जागते रहो…

‘‘रोहन, आता पुरे झालं. इकडे ये बरं. चिंगी एकटी कंटाळली बसून.’’ बाबांनी रोहनला बाहेर बोलावलं.
‘‘हो बाबा आलोच.’’ रोहननं बाहेर येऊन स्वच्छ हातपाय धुऊन घेतले.
‘‘चला आता दुसरी गंमत दाखवतो तुम्हाला.’’ बाबा म्हणाले.

मग बाबांनी हातात एक काठी घेतली. शेताच्या बांधावरून ते चालत निघाले. त्यांच्या मागोमाग रोहन आणि चिंगी चालत होते. थोडया पुढे गेल्यावर बाबांना कडेला एक बिळासारखं काही दिसलं.

‘‘आता बघ हं चिंगी.’’ बाबा म्हणाले.
बाबांनी ती काठी हळूच त्या बिळात घातली. तर काय आश्चर्य! बिळातून एक खेकडा निघाला. पण परत तुरूतुरू जाऊन दुसऱ्या बिळात शिरला.
‘‘आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ते खेकडे पकडायचो. त्याला दोरी बांधून आम्ही गाडी गाडी खेळायचो. पण आता तुम्ही पकडायला जाऊ नका हं.. व्यवस्थित पकडला नाही तर कडकडून चावतो तो.’’ बाबा हसत म्हणाले.

‘‘रोहन दादा, चल ना आपण कागदाच्या होडया बनवू. तो ओहोळ बघ कसा छान वाहतोय.’’ चिंगीनं दादाला गळ घातली.
दोघेही मग होडया बनवून पाण्यात सोडू लागले. कधी कुणाची भरभर निघून जायची, तर कुणाची तेथेच पलटी व्हायची. चिंगीला या खेळात खूप मजा आली.

हेही वाचा…बालमैफल : ‘सहयोगा’चं नातं

‘‘चला चिंगी आणि रोहन, भूक लागली असेल थोडं खाऊन घ्या.’’ बाबांनी हाक दिली. आईनं दिलेल्या सॅन्डविचवर दोघांनी ताव मारला.
‘‘आता घरी जायच्या आधी अजून एक खेळ.’’ बाबा म्हणाले.
‘‘काय? कोणता खेळ?’’ रोहनला उत्सुकता लागली होती. बाबांनी आपल्यासोबत मासे पकडायचा छोटा गळ आणला होता. आणि गळाला खाणे लावण्यासाठी आई सकाळी पोळया करताना कणकेचा छोटा गोळा बाबांनी पळवला होता. बाबांनी गळाच्या टोकाला कणीक लावली आणि गळ पाण्यात सोडला. लगेचच छोटे छोटे मासे त्या गळाभोवती जमा झाले. चुबचुब आवाज काढत कणीक खाऊ लागले. चिंगीला ते पाहून खूप मजा वाटली. ती टाळया पिटत ओरडू लागली. पण तिच्या आवाजाने मासे घाबरून परत पाण्यात खाली गेले.

‘‘ए चिंगी, थांब ना जरा. ओरडू नकोस. मासे पळाले बघ.’’ रोहन जरा चिडला.
‘‘असू दे रोहन, आपल्याला आता मासे पकडायचे नाहीत. छोटे आहेत ते. फक्त कसे पकडतात ते दाखवले तुम्हाला.’’ बाबा म्हणाले. तेवढयात आजोबाही शेतातून बाहेर आले.
‘‘चला मुलांनो, आटोपला की नाही तुमचा खेळ? दुपारची जेवणाची सुट्टी झाली. त्या काका काकूंना जेऊ दे. आपणही जाऊ या घरी जेवायला. काय गं चिंगे?’’ आजोबांनी म्हणाले.

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग : अंदाजपंचे…

‘‘हो आजोबा.’’ चिंगी नाचत म्हणाली. मग बाबांनी सामान गोळा केलं नि सगळे घरी जायला निघाले.
‘‘मज्जा आली की नाही रोहन?’’ बाबांनी विचारलं.
‘‘हो. खूप. पण आता आम्ही सुट्टी असली की नेहमी येथे येणार.’’ रोहन उत्साहानं म्हणाला ‘‘चालेल ना आजोबा?’’
‘‘अरे, बेशक, कधीपण या. शेत आपलंच आहे.’’ आजोबा हसत म्हणाले.
‘‘ये हे.’’ पोरांनी गिल्ला केला.

matildadsilva50@yahoo.co.in