फारुक एस. काझी
आज शाळेला सुट्टी होती. पाचवीत शिकणारी काव्या खाटेवर झोपली होती.




‘‘तू आधी बाहेर ये.’’ काव्या ओरडली तरी तो काही बाहेर यायला तयार नव्हता.
‘‘तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?’’ ती पुन्हा वैतागून म्हणाली. पण तो काही बाहेर यायचं नाव घेईना. काव्यानं दुर्लक्ष करायचं ठरवलं आणि ती उठून बाहेर निघून गेली. आज तिला खूप म्हणजे खूप राग आला होता. तो काहीही ऐकायला तयार नव्हता.
‘‘चूक झाली आणि ते पुस्तक वाचलं. पान काय फाटलं हे मोठ्ठं संकटच आलं.’’ तिचं मनात हज्जारदा हे वाक्य बोलून झालं होतं. चरफडत तिनं आपली सायकल काढली आणि ती बाहेर पडली. गावाबाहेर आता एका नवीन रस्त्याचं काम सुरू झालं होतं. रहदारी बंद होती. बराच रस्ता निर्जन होता. वाहतूक नसल्यानं वर्दळ बरीच कमी होती.
तिनं आपला मोर्चा तिकडे वळवला. अवतीभोवती तुरळक झाडी होती. ती मनातून घाबरली होती. त्यात निर्जन रस्ता. संध्याकाळी बरेच लोक तिकडे फिरायला यायचे, पण आता अशा भर दुपारी कुणीच तिकडे फिरकत नव्हतं. तिनं सायकल वेगानं पळवायला सुरुवात केली, तर तो तिच्या मागे वाऱ्याच्या वेगानं धाऊ लागला. कधी पुढे कधी मागे करू लागला. काव्या वैतागली.
‘‘जा ना रे बाबा! का वैताग देतोय.’’ तिनं सायकल वळवून घराकडे घेतली. तो मागोमाग फडफडत येतच होता.
काव्याला भीती वाटली. अशा निर्जन रस्त्यावर असं त्याचं मागोमाग येणं.. तिच्या अंगावर काटाच फुलला. तिनं वेगात सायकल पळवली. ती धापा टाकत टाकत घराजवळ पोचली.
‘‘कवे, एवढी कसली घाई गं तुला. दहा हाका मारल्या तुला. तर तू आपली पळतच सुटलीय.’’ सुरवंता काकू ठसक्यात बोलल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. काव्याला तर त्यांचा आवाजच ऐकू आला नव्हता. ती घाबरलीच एवढी होती की काय ऐकणार नि काय बोलणार? काकू निघून गेल्या, पण जाताना काहीतरी पुटपुटत गेल्या. काव्या घरात आली. तिची छाती अजूनही जोरजोरात धडधडत होती. घाम फुटला होता.
ती खुर्चीत धप्पकन् बसली. डोळे मिटले, पण डोळय़ांसमोर तोच दिसत होता.
तिनं पटकन् आपले डोळे उघडले. किचनमध्ये पळाली आणि घटाघटा पाणी प्यायली. फॅन लावला. तरीही घाम काही केल्या कमी होईना. काव्याला रडूच येऊ लागलं.
‘‘काय करू मी?’’ तिनं रडकुंडीला येऊन विचारलं.
‘‘हे बघ, मी तुला त्रास द्यायला आलेलो नाही. मला काय पाहिजे हे तुला माहीत आहे. मला माझ्या घरी पाठवून दे. माझं शरीर शोध आणि मला परत पाठव.’’ तो शांतपणे म्हणाला.
काव्यानं खोल श्वास घेतला. तिला थोडा धीर आला. ती पळतच आतल्या खोलीत गेली. तिनं तिचं अख्खं दप्तर खाली ओतलं. खिडकीतलं साहित्य बाहेर काढलं. आणि ती पान अन् पान पाहू लागली. बराच शोध घेतला पण काहीच सापडलं नाही.
‘‘आई, इथं एक कागद होता. मोकळा. एका जुन्या पुस्तकातला. तुला सापडला का?’’ तिनं आपल्या आवाजावर शक्य तितकं नियंत्रण ठेवत विचारलं.
‘‘न्हाई गं. काल गोिवद धडपडत होता तिथं. बघ बरं त्यानं घेतलंय का?’’ आई हात पुसत आत आली.
‘‘का गं? एवढी कशाला घाबरलीस तू?’’
‘‘काही नाही गं. जरा महत्त्वाचा होता कागद.’’
पण कागद काही सापडेना. तिनं गोिवदला, तिच्या धाकटय़ा भावाला विचारलं.
‘‘थांब. आहे एक कागद. मला त्यातलं चित्र जाम आवडलेलं. म्हणून ठेवला जपून.’’ हे ऐकताच काव्याच्या जिवात जीव आला.
गोिवदनं घडी घातलेलं ते एका पुस्तकाचं पान आणून दिलं. जुनं. पिवळसर पडलेलं. काव्यानं अधाशासारखं ते उघडून बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तोही खूश झाला. त्याच्या हसण्याचा आवाज काव्याला ऐकू आला. इतरांना तो ऐकू जाणं तसं शक्यच नव्हतं. घाम पुसत काव्या वाचनालयाकडे पळाली. गोिवद नवलानं पाहू लागला.
‘‘आज हिला झालंय काय? सारखी का पळतीय ही?’’ त्याला प्रश्न पडला.
काव्या धावत-पळत वाचनालयात पोचली. ‘‘का..का..काका, मी मागच्या आठवडय़ात तुमच्याकडून एक पुस्तक नेलेलं बघा. गोष्टींचं. जुनं.’’ धापा टाकत ती म्हणाली.
‘‘कोणतं? तू तर आलीच नाहीस किती दिवस झाले.’’ काकांनी रजिस्टर उघडून शोधायला सुरुवात केली. तिच्या नावावरून शोधल्यावर त्यांना तिचं नाव सापडलं. मागच्या दोन महिन्यांपूर्वी ती दोन पुस्तकं घेऊन गेली होती. त्यातलं एकच पुस्तक तिनं आणून दिलं होतं. दुसरं पुस्तक गायब होतं.
‘‘तू एकच पुस्तक आणून दिलंय. दुसरं पुस्तक कुठं आहे?’’ काकांनी विचारताच काव्या चपापली.
दुसरं पुस्तक? कुठं गेलं ते? आणि हे पान कुठल्या पुस्तकातलं आहे? तिच्या डोक्यात पुन्हा गोंधळ सुरू झाला.
‘‘आधी ते पुस्तक जमा कर आणि मगच नवीन पुस्तक घेऊन जा.’’ काकांनी ताकीद दिली.
काव्यानं जमा केलेलं पुस्तक पाहिलं. काकांना कळणार नाही असं गुपचूपपणे पान पुस्तकाशी जोडून पाहिलं. पण ते पान त्यातलं नव्हतं. ती आणखीनच घाबरली. तिनं मागे वळूनही न पाहता धावायला सुरुवात केली. घरात येऊन सगळय़ा खोल्या धुंडाळून काढल्या, पण पुस्तक सापडलं नाही. ती आठवत होती.. आठवत होती. पण काहीच आठवत नव्हतं.
आणि अचानक तिला काहीतरी आठवलं!
आणि ती कपाटाजवळ गेली. कपाटावर बरंच साहित्य होतं. खुर्ची घेऊन तिनं हातानं काहीतरी चाचपून पाहिलं आणि तिला कोण आनंद झाला. गोिवदबरोबर भांडताना ते
पुस्तक तिनं त्याला फेकून मारलं होतं. त्याचं एक पान फाटून बाहेर पडलं होतं. आता
तिच्या हाती ते पुस्तक लागलं होतं. तिनं ते हातात घेतलं. झटकून काढलं. जाळय़ा-जळमटं आणि धूळ पुसून काढली. अधाशासारखं पुस्तक उघडून पान नंबर
शोधू लागली. पान नंबर ५०. पुस्तकात
५० आणि ५१ नंबरचं पानच नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
तिनं हातातलं पान त्यात चिकटवलं.
‘‘हुश्श! झालं एकदाचं!’’ असं म्हणत तिनं पुस्तक उघडून ठेवलं. तो मोठय़ानं हसला आणि हवेसारखा सुर्रकन् पुस्तकात शिरला.
कोण होता तो?
काय पाहिजे होतं त्याला?
तर तो होता फाटलेल्या पानाचा आत्मा!
पुस्तकात जाण्यासाठी तो सतत धडपडत होता. अखेर तो परत गेला त्याच्या त्याच्या घरी.
काव्यानं शांतपणे पुस्तक मिटलं आणि पुस्तक जमा करायला ती वाचनालयाकडे चालू लागली.