scorecardresearch

फुलांच्या विश्वात : काटेसावर

सावरीचे काटे हेदेखील औषधी असून सहाणेवर उगाळले असता चंदनाप्रमाणे लाल रंग येतो

फुलांच्या विश्वात : काटेसावर
भारतीय वनस्पती Bombax Ceiba (बॉम्बक्स सिबा) असं हिचं शास्त्रीय नाव

वसंत ऋ तूच्या स्वागतासाठी सगळं जंगल सज्ज होत असतं. प्रत्येक झाड आपापल्या परीने झाडून तयारीला लागतं. एखाद्या सण, उत्सवाप्रसंगी आपण जसं घर झाडूनपुसून लख्ख करतो त्याप्रमाणे जंगलातील प्रत्येक झाड वसंताच्या स्वागतासाठी सज्ज होत असतं. यात सगळ्यात आघाडीवर कोणता वृक्ष असेल तर- काटेसावर. हिला इतकी घाई की डिसेंबर अखेरीपर्यंतच सगळं झाड स्वच्छ करून म्हणजे सगळी पानं गाळून ही वसंताच्या स्वागतासाठी सज्ज होते. जानेवारीमध्ये हिला कळ्या यायला सुरुवात होते नि वसंत ऋ तू येण्याआधी ही संपूर्ण फुलांनी बहरून जाते. संपूर्ण निष्पर्ण झाडावर ही मोठी मोठी गडद गुलाबी फुले पाहणे हा एक नयनरम्य सोहळाच असतो.

काटेसावर- वर्षांवनातील एक अत्यंत महत्त्वाची भारतीय वनस्पती Bombax Ceiba (बॉम्बक्स सिबा) असं हिचं शास्त्रीय नाव. अत्यंत कमी पाण्यात नि कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये सहज वाढणारी आणि झाडावर नखशिखांत काटे असणारी वनस्पती. उंची साधारण २०-२५ मीटपर्यंत. संपूर्ण काटय़ाने मढलेली असल्याने हिला मराठीत ‘काटेसावर’ म्हणतात; तर संस्कृतात शाल्मली असं सुंदर नाव आहे.

काटेसावरीची फुले मोठी, पाच पाकळ्या, पाकळ्या जाड आणि रंग गडद गुलाबी, खूप सारे पुंकेसर असलेले फूल. या फुलांना खाण्यासाठी खारुताई नि फुलांमधून मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची मांदियाळीच या झाडावर जमा होते. कोतवाल, हळद्या, बुलबुल, तांबट, शिंजीर असे एक ना दोन नव्हे तर अनेक पक्षी फुललेल्या सावरीवर ठाण मांडून असतात. फुलांच्या  पाकळ्या मांसल असतात. फूल देठातून गळून पडते. ही फुले वाळवून त्यांच्यापासून रंग तयार करतात. वाळलेल्या पाकळ्यांची पावडर अनेक औषधंमध्ये वापरली जाते. या फुलांमध्ये खूप मध असतो. त्यामुळे त्यांना गोडसर सुवास येतो. पाण्यात घातल्या असता याच्या पाकळ्या चिकट होतात. याच्या फुलांची भाजी करतात;  कळ्यांमधील कोवळ्या पाकळ्या सलाड / कोशिंबिरीत वापरतात. सावरीची पाने संयुक्त प्रकारची असून एका पानात  ५ ते ७  पर्णिका असतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. पानांचा काढा कुष्ठरोग तसेच विंचू आणि सर्पदंशावर औषध म्हणून दिला जातो. इतरही अनेक रोगविकारांत ही पाने औषध म्हणून वापरली जातात.

दिवाळीनंतर झाडाची सगळी पाने गळून पडतात. सावरीचे काटे हेदेखील औषधी असून सहाणेवर उगाळले असता चंदनाप्रमाणे लाल रंग येतो. हे काटे उगाळून चेहऱ्यावरील मुरुमांवर लावतात. गावाकडे सावरीचा काटा भोकराच्या पानात टाकून खाणे हा लहान मुलांचा आवडता उद्योग. पानात कात घातल्यावर तोंड रंगते तसेच या पानांमुळेदेखील रंगते.

सावरीची साल खूप जाड असते. फ्रॅक्चर झाल्यावर तिचा वापर केला जातो. तसेच दात दुखीवरदेखील याची साल वापरली जाते. सावरीची जाड साल आगीला खूप वेळ प्रतिरोध करू शकते. जंगलात वणवा लागला असता सगळ्यात शेवटी जळणारे झाड म्हणजे काटेसावर. उष्णतारोधक या गुणामुळे वणव्यानंतरदेखील हे झाड लवकर ताजेतवाने होते. त्याला पालवी फुटते;  म्हणून काटेसावरीला भक्त प्रल्हादाचे रूप मानतात. याच गुणामुळे भारतात अनेक ठिकाणी सावरीचे खोड होळीत मुख्य झाड म्हणून वापरले जाते. होळीच्या दिवशी जंगलातून भलेमोठे सावरीचे झाड तोडून आणले जाते नि होळीच्या मध्यभागी लावून त्याची पूजा केली जाते. इतर लाकडे, शेणी लावून नंतर होळी पेटवली जाते. दरवर्षी होळीच्या निमित्ताने हजारो काटेसावरीची भलीमोठी झाडे तोडली जातात. महाराष्ट्रात आणखी एका सणाशी याचा संबंध जोडला आहे तो म्हणजे दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी जंगलातून काटेसावरीचे उंचच्या उंच झाड तोडून आणतात व त्याची साल काढून त्याला तेल लावतात. एक नारळ वरच्या बाजूला बांधून हे खोड मल्लखांबाप्रमाणे उभे केले जाते. प्रत्येकाने या गुळगुळीत खांबावर चढून हा नारळ फोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. जो फोडेल तो विजेता. दहीहंडी झाली की हे लाकूड (खांब) फेकून देतात. सावरीचे लाकूड अशुभ मानतात. त्यामुळे त्याचा सरपणासाठी वापर करीत नाहीत. या सणाच्या निमित्तानेदेखील हजारो मोठी झाडे जंगलातून नष्ट केली जातात.

काटेसावरीच्या झाडाची निर्मिती बियांपासून होते. फुले गळून पडली की झाडाला दोडक्यासारख्या शेंगा येतात. त्या शेंगांमध्ये पिंजलेल्या कापसाप्रमाणे कापूस असतो. त्याला स्पर्श केला असता तो रेशीमसारखा लागतो. म्हणून या झाडाला Indian Silk tree असेही  म्हणतात. या कापसात सावरीचे बी लपलेले असते. साधारण मिरीच्या दाण्यासारखा त्यांचा आकार नि रंग असतो. या बियांपासून तेल काढले जाते. भाजून या बिया खाल्ल्या जातात. या बिया सहज रुजतात. सावरीचा कापूस उशी बनविण्यासाठी वापरतात. तसेच उष्णतारोधक म्हणूनदेखील त्याचा वापर केला जातो. काटेसावरीचे मूळदेखील औषधात वापरले जाते. या मुळांमध्ये कबरेदके मोठय़ा प्रमाणावर असतात. ही मुळे भाजून खाल्ली जातात.

अजून काही दिवसांनी काटेसावरीच्या शेंगा फुटून कापूस उडायला सुरुवात होईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत किमान एक तरी काटेसावरीची बी मिळवा, ती रुजवा नि भारतीय हरित धनातील एक अत्यंत महत्त्वाच्या औषधी वनस्पतीच्या संवर्धनात आपला खारीचा वाटा उचला.

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2017 at 01:32 IST

संबंधित बातम्या