तुला माहित्येय की आपला मेंदू आपल्याला बंद डोळ्यांनीसुद्धा जग ‘दाखवत’ असतो. अगदी तू झोपला असतानाही रंगीत स्वप्न दाखवण्याचे काम तोच करतो म्हणे. आपण पाहू की तुझा हात तुझ्या मेंदूचे किती ऐकतो ते.
करू या चेक?
पटकन एक कागद घे. मोठा, खूप मोठा… तुझ्या मनाच्या आकाराचा. तू जमिनीवर खाली बस. तुझ्यासमोर कागद पसरून ठेव. तो हलू नये म्हणून त्याच्या चारही बाजू क्लिप किंवा सिलोटेपने पॅडला चिटकवून ठेव. ब्रश, सर्व रंग आणि पाण्याचा एक वाडगा तुझ्या पाठीमागे ठेव.
बाटलीतले रंग वापरत असशील तर झाकणे आधीच उघडून ठेव. ट्यूबचे रंग वापरत असतील तर ताटात किंवा पॅलेटमध्ये पिळून ठेव. खडूचे रंग बॉक्समधून काढ. सगळी तयारी झाली की आता समोर पसरलेल्या कोर्या कागदाला डोळे उघडे ठेवून पाहा. पूर्ण एक मिनिट आणि एकसष्ट सेकंद नीट पाहा. हा कागद म्हणजे तुझ्या एकट्याच्या मालकीचे मैदान आहे.
आता डोळे बंद कर. (अरे आता म्हणजे आत्ताच नाही, चित्र काढतेवेळी बंद कर. आता वाचताना चालूच ठेव.) तुझे दोन्ही डोळे बंद कर. चार मोठे श्वास घे आणि पाचव्या श्वासासोबत डोळे मिटूनच कागदावर रंगाची रेषा फिरवत जा. ही रेषा कशीही फिरू दे. रेषा नाचेल, उडेल, वळेल, पळेल, अडखळेल, थांबेल, कदाचित रेषा कागदाच्या बाहेरही जाईल. पण तुला त्याची आत्ता फिकीर करायची गरज नाही. यातून कुठलाही आकार बनवायचा प्रयत्न करायचा नाही.
डोळे बंद असले तरी तुझा मेंदू अजूनही कागद पाहत आहेच. त्यामुळे तो अंदाजाने तुझ्या हाताचे (ब्रशचे) मार्गदर्शन करेल. रंग संपला की पाठीमागे वळून, (डोळे उघडून) तू हवा तो ब्रश, रंग घेऊ शकतो. आता पुन्हा कागदाकडे पाहताना… नाही पाहायचं- डोळे बंद आणि रेषा चालू.
कागदावर जे घडतंय यात काही चूक नसणार, काही बरोबर नसणार… फक्त मेंदूने ठरवलेल्या मार्गावरून तुझा ब्रश फिरणार. पण तू प्रामाणिकपणे मात्र डोळे बंदच ठेवायचे. मध्येच अर्धवट चित्र चालू असताना डोळे उघडायचे नाहीत. चित्र काढून झाले आहे असे वाटल्यावरच डोळे उघड.
आता मेंदूने रंगवलेल्या कागदाकडे पाहा. कागद उलट पुलट फिरवून पाहा. काय दिसतेय? कशासारखे दिसतेय? काहीच विचार न करता बनलेले… कशाची तरी आठवण करून देतेय का?
तयार झालेल्या चित्राचा तू आधी काहीच विचार केला नव्हतास, डोळ्यांनीही काही पाहिले नाहीस. तुझी रेषा स्वत:च स्वत:चीच दुनिया तयार करत गेली. कारण तुझ्या मेंदूत नेहमीच नवीन काही तरी घडत असते. फक्त पद्धत बदलायचा अवकाश.
हे जसे घडले आहे तसे तुला आवडले का? आवडले असेल तर फारच उत्तम. मग असे प्रयोग करत राहा. पण तुलाच नाही आवडले तर… हरकत नाही. काही जणांना ‘सगळ्या गोष्टी कळतील’ अशा स्वरूपात पाहायला आवडतात.
या रेषांच्या गोंधळात घाटातून एक रस्ता गेलेला दिसेल, तर त्यावर छोट्या गाड्या काढ. समुद्रातल्या लाटा दिसत असतील तर लाटेवर स्वार झालेली होडी काढ किंवा पोहणारे दाखव. आकाशातले ढग दिसले तर त्यात लपलेला चंद्र, तारे, विमान काढ… तुला वाट्टेल ते काढ.
तुझा चित्र मित्र,श्रीबा
ushriba29@gmail.com
