|| अलकनंदा पाध्ये

‘‘आजी, झोप येत नाहीये गं. माझा टेडी शोधून दे नं. असा कसा हरवला तो मी मावशीकडे गेल्यावर?’’ जयने बाजूला झोपलेल्या आजीला हलवत पुन्हा टेडीची मागणी सुरू केली. त्यावर आजीने ‘रात्रीचे १२ वाजून गेलेत… उगाच दिवे लावून शोधाशोध सुरू केली तर इतरांची  झोपमोड होईल,’ असं सांगून सकाळी टेडीला नक्की शोधायचं प्रॉमिस देत त्याला हलकेच थोपटायला सुरुवात केली. तरी जयची चुळबुळ थांबत नाहीसे पाहून तिने गोष्ट सांगायला सुरुवात केली. दिवसभर खूप खेळल्यामुळे किंवा आजीच्या गोष्टीमुळे असेल, पण हळूहळू जयचे डोळे पेंगुळले. थोड्या वेळाने जय झोपलासे पाहून आजीला हायसे वाटले. पण टेडी कुठे हरवला असेल, या विचारात आजीची झोप मात्र उडाली.

girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Thane rural police arrested 12 including chandrakant gaware in connection with 5 40 crores robbery
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या टोळीकडून लूट; ५.४० कोटींच्या लूटप्रकरणी १२ जणांना अटक 

जयच्या बारशाच्या वेळी त्याच्या मावशीने अतिशय सुंदरशी दुलई (क्विल्ट) स्वत: शिवून दिली होती. त्यावर मुलांच्या लाडक्या टेडी बेअरचे पॅचवर्क केले होते. जय जसजसा मोठा होऊ लागला तशी ती दुलई त्याला तोकडी पडायला लागली. झोपायला आणि पांघरायलासुद्धा! पण ती दुलई जयची अत्यंत लाडकी होती. तिच्यावरचा टेडी त्याचा लाडका दोस्त झाला होता. पण जय जसजसा उंच होत गेला तशी ती दुलई त्याला अपुरी पडू लागली. पण झोपताना त्यावरच्या टेडीची सोबत हवीच म्हणून तो हट्टाने तीच आखूड दुलई वापरत असे. अखेर दुलईतून पाय बाहेर येऊ लागल्यावर आईने झोपताना त्या दुलईची गुंडाळी करून त्याचा टेडी त्याच्या कुशीत दिल्यावर स्वारी जाम खूश झाली. आपला लाडका दोस्त आपल्याजवळच झोपतोय ही कल्पनाच त्याला भारी वाटली. टेडीचे चित्र असलेल्या त्या दुलईच्या गुंडाळीचेच त्याने ‘टेडी’ असे नामकरण करून टाकले. त्याची ही टेडीची आवड पाहून त्याच्या पुढच्या वाढदिवसाला त्याच्या मावशीने त्याला मॉलमधून एक गुबगुबीत टेडी (सॉफ्ट टॉय) आणून दिला. जय दोन दिवस त्याच्याशी खेळला; पण दुलईच्या टेडीची जागा मात्र नवा टेडी घेऊ शकला नाही. खरं तर आता ती दुलई जुनी झाल्याने कुठं कुठं विरली होती. तिचा रंगही थोडा धुरकट झाला होता. पण जयला यातलं काहीच पटणारं नव्हतं.

सकाळी झोपेतून उठल्यावर अपेक्षेप्रमाणे जयने टेडीचा जप सुरू केलाच. त्यावर ‘‘अरे, तू मावशीकडे गेलास ना, तेव्हाच मी तुझा टेडी धुवायला टाकला. पण आपल्या वंदना मावशींनी तो कुठे वाळत टाकला ते मात्र आठवत नाहीये. त्या आता कामाला आल्या की विचारू या हं…’’ असं आईने त्याला समजवायचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने वंदना मावशी आल्यावर पुन्हा टेडीची चौकशी सुरू झाली. बाल्कनीतल्या कपडे वाळवायच्या स्टँडवर दुलई वाळत घातल्याचे आणि एवढंच नाहीतर वाळल्यानंतर घडी करून ती जयच्या खोलीतच ठेवल्याचे त्या दहा वेळा आपल्या मुलीची शप्पथ घेऊन सांगत होत्या. याचाच अर्थ ती वाऱ्याने कुठे उडून गेल्याची शक्यता नव्हती. तरीही मनाची खात्री करून घ्यायला आजीने खालच्या मजल्यावरच्या देसाई काकूंकडे आणि इमारतीच्या तळात बसणाऱ्या वॉचमन काकांकडेसुद्धा चौकशी केली. पण सगळीकडूनच नकारघंटा मिळाली. घरात आजी आणि आईने कपाटातील सामानाची, पलंगातल्या उशा-चादरींची शोधशोध केली. वंदना मावशी तर बिचाऱ्या जणू काही दुलई आपल्या हातूनच हरवलीय, या भावनेने खजील झाल्या. बिचाऱ्यांनी जयच्या पलंगाखाली अक्षरश: लोळण घेत मोबाइलच्या प्रकाशात केरसुणी फिरवत शोध घ्यायचा प्रयत्न केला. जयनेसुद्धा आपल्या खेळण्यांच्या, कपड्यांच्या कपाटात नजर फिरवली. पण कुणाच्याच मेहनतीला फळ काही आले नाही. घरभर पसारा मात्र खूप झाला. आणि सकाळच्या इतर कामांत तो आवरायचे काम मात्र आणखीन वाढले. कुणी कुठे शोधायचा प्रयत्न करू लागले की जय मोठ्या आशेने बघायचा आणि हाती काही लागले नाही की तोंड इवलंसं करून बसायचा.

‘‘आई खर्र खर्र सांग… माझा टेडी आता जुना झाला होता म्हणून मी मावशीकडे गेल्यावर तू कुणाला देऊन टाकला नाहीस ना?’’ असं जयने हताशपणे आईला विचारल्यावर आई वैतागून म्हणाली, ‘‘असा कुणाला दिला असता तर सकाळपासून गेले चार तास आम्ही शोधत बसलो असतो का? वेडा कुठला!’’ त्यावर जयचे डबडबलेले डोळे पाहून आजीने आईला खुणेने गप्प केले आणि जयला जवळ घेत म्हणाली,

‘‘अरे बाळा, तो टेडी तुझा किती लाडका आहे आम्हाला माहिती नाही का? असा कसा आम्ही तो कुणाला देऊन टाकू? आणि तेही तुला विचारल्याशिवाय? हे बघ आता जेवणाची वेळ उलटून चाललीय. तुला भूकही लागली असेल. चल, आज तुझ्या आवडीची मटार उसळ केलीय बघ. आणि पोळीबरोबर श्रीखंडपण आहे थोडंसं. आपण सगळे जेऊन घेऊ आणि नंतर पुन्हा शांतपणे शोधायला सुरुवात करू. आणि समजा… अगदीच नाही सापडला ना तुझा टेडी, तर तू मावशीने दिलेल्या टेडीला घेऊन झोपत जा. नाहीतर तिला नवीन करायला सांगू. अगदी तस्साच… सेम टू सेम… चालेल?’’ आजी बेताबेताने त्याला समजावत म्हणाली. पण ‘‘मुळ्ळीच नाही चालणार मला दुसरा टेडी. तो म्हणजे तोच हवा.’’ पाय आपटत जयने रडका सूर लावला. आई आणि आजी हताशपणे एकमेकींकडे बघत बसल्या.

आजवर कापडाची एक चिंधीही गहाळ न झालेल्या घरातून पलंगावर घडी करून ठेवलेली   फक्त दुलई- तीसुद्धा थोडी जुनाट, विरलेली कोणी आणि का नेली असेल, हे खरोखरच न उलगडणारं कोडं होतं.

इतक्यात समोरच्या स्वराने- जयच्या मैत्रिणीने- धावतच घरात शिरून जयच्या कानात काहीतरी सांगितलं. त्याबरोबर जयचे डोळे चमकले आणि तो तिच्यापाठोपाठ तिच्या घरी पळाला. काहीच न समजून आई, आजीपण त्यांच्यामागे गेल्या. बघतात तर काय, स्वराच्या बाल्कनीतल्या कोपऱ्यात एका खोक्यात सोनेरी रंगाची अत्यंत गोजिरवाणी अशी दोन माऊची पिल्लं अंगाला आळोखेपिळोखे देत, मिचमिच्या डोळ्यांची उघडझाप करत आपल्या नाजूक आवाजात ‘म्यँव म्यँव’ करत होती. जणू आपल्या आईला- चेरीला ती बोलावीत होती.

‘‘जय बाळा, त्या पिल्लांचे अंथरूण पाहिलेस का? सकाळपासून आपण शोधतोय ती तुझी गोधडी या चेरीलापण आवडली बरं का, म्हणून गुपचुप ती इथं घेऊन आली असणार. परवाच्या दिवशी तुझ्या खोलीत कचरा काढताना सारखी इथं तिथं घोटाळत होती. माझ्या नकळत तिनं हे काम केलं असणार. प्राण्यांमधल्या आयांनापण आपल्या बाळांची केवढी काळजी असते ना!’’

वंदना मावशीच्या खुलाशानंतर सगळ्यांचे लक्ष नीटपणे पिलांखालच्या जयच्या दुलईकडे गेले. दुलई पाहून जय खूश झाल्याचं जाणवून ‘‘चला, सुटलो एकदाचे! तुझा तो टेडी सापडला बाबा. जय आता काय करू या? एका जुन्या चादरीवर या पिलांना ठेवून टेडी घरी नेऊ या ना? तू सांगशील तसं…’’ मिश्कील हसत आईने विचारले. त्यावर ‘‘नको. मुळीच नको. चेरीची ही पिल्लं खूप छोटी आहेत गं आई, त्यांना आपण नको हलवू या. त्यांना त्रास होईल. आणि चेरीलापण खूप वाईट वाटेल. राहू दे माझा हा टेडी त्यांच्यासोबत. मी घेईन आजपासून दुसरा टेडी झोपताना.’’ जयचं हे शहाणपणाचं बोलणं ऐकून कौतुकाने आजीने त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

alaknanda263 @yahoo.com