झेलम

सकाळ आता प्रसन्न हसत होती आणि झिलीने पाडसाला जन्म दिला.

|| फारूक एस. काझी 

आजचा दिवस एका वेगळ्याच आनंदात बागडत होता. कारणही तसंच होतं. आज झिलीला पाडस होणार होतं. झिलीची इतर पाडसंही आपल्या भावंडाची वाट पाहत होती. ते कसं असेल? आपल्यासारखं देखणं असेल का? आपण खूप खेळू त्याच्यासोबत…

सकाळ आता प्रसन्न हसत होती आणि झिलीने पाडसाला जन्म दिला. पाडसाला पाहताच झूमिसचा चेहरा पडला. उत्सुकतेनं जवळ आलेली भावंडं एकदम मागे सरकली.

हे काय जन्माला आलंय? काय हे?

झिली अजूनही थकलेली होती. तिने थकलेल्या डोळ्यांनी पाडसाकडे पाहिलं आणि तिला धक्काच बसला. झालं होतं तरी काय? सगळेच का असे धक्का बसल्यासारखे स्तब्ध झाले होते?

पाडस जन्माला आलं खरं, परंतु त्याला कानच नव्हते. कानाच्या ठिकाणी दोन छोटे छोटे खुंट दिसत होते. कानांची छिद्रं होती.

आणि हे काय? त्याचा रंग?

सोनेरी रंगावर पांढरे ठिपकेच नव्हते!

असं कुरूप पाडस जन्माला कसं आलं? झूमिस काळजीत पडला.

झिली क्षणभर बिथरली होती. पण लगेच स्वत:ला सावरत तिने पाडसाला चाटायला सुरुवात केली. त्याला स्वच्छ केलं. पाडस उठून उभं राहायला धडपडत होतं.

झूमिस अजूनही भांबावला होता. झिलीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. झूमिसला बरं वाटलं. त्याने पाडसाला चाटून घेतलं. बाबाचा पहिला स्पर्श होता तो.

‘‘नाव काय ठेवू या हिचं?’’ झिली उत्साहाने म्हणाली.

‘‘झेलम.’’ झूमिस शांत आवाजात म्हणाला.

झिलीने झेलमच्या कपाळाला जिभेनं चाटून घेतलं.

‘‘झेलम… माझी झेलम. अवखळ आणि जगावेगळी!’’

***

भावंडांना झेलम अजिबात आवडली नव्हती. ते तिला कधीच जवळ घेत नसत. ना तिच्याशी बोलत, ना तिच्यासोबत खेळत. झेलमला आपली भावंडं अशी का वागताहेत हेच कळत नव्हतं. ती खूप प्रयत्न करायची त्यांच्या जवळ जाण्याचा; पण भावंडं जमवून घेत नसत. त्यामुळे झेलम दु:खी व्हायची आणि एकटीच जंगलात भटकायला जायची. तिला झाडांशी, पक्ष्यांशी बोलायला छान वाटायचं.

झिली तिला काही गोष्टी शिकवायची. धोका कसा ओळखायचा? सावध राहून काय काय करायचं? झेलम सगळं शिकून घेत होती, पण एक अडचण होती. तिला बाहेरचे लांब कान नव्हते. त्यामुळे कान देऊन ऐकणं तिला जमत नव्हतं. इतर हरणं कान इकडे तिकडे फिरवून धोक्याचा अंदाज बांधू शकत होती, पण झेलमला ते जमत नव्हतं. म्हणून तिने प्रयत्न करून, लक्ष देऊन ऐकण्याची कला शिकून घेतली.  खेळायला सोबत कुणीच नसायचं. मग ती असे आवाज ऐकत राहायची. धावायची. जंगलभर फिरायची.

आता तिला अगदी हळुवार आवाजही ऐकू येऊ लागले होते. पक्ष्यांचा हळुवार आवाज ऐकून ती तो पक्षी कोणता हे ओळखू लागली होती. धोका आहे का? असेल तर किती अंतरावर? याचाही अंदाज ती बांधू लागली होती. तिलाच नवल वाटत होतं. इतरांपेक्षा आपण जास्त कसं काय ऐकू शकतो याचं.

पण तिला खूप मजा येत होती. दूरदूरचे आवाज ऐकून त्यांचा नेमका अर्थ लावायला ती चांगलंच शिकली होती. पक्ष्यांचा आवाज. माकडांचा आवाज. हरणांचा आवाज. वाघ, सिंह यांचे आवाज. सापांच्या सरपटण्याचा आवाज. इतरही अनेक आवाज…

आवाजातील बदल ओळखून ती इतरांना सावध करत होती. धोका ओळखून इतरांचा जीव वाचवत होती. सगळे तिचे खूप लाड करायचे. तिच्यावर प्रेम करायचे. पण तिची भावंडं तिला अजूनही आपलं मानायला तयार नव्हती. झेलम उदास व्हायची. तिचे डोळे भरून यायचे. पण ती आपल्या कळपाचा हिस्सा होऊ शकली नाही.  इतरांना मदत करत करत ती आपलं दु:ख विसरून जायची.

***

असेच दिवस जात होते. झेलम मोठी होत होती. नवनवीन गोष्टी शिकत होती. अशीच एके दिवशी ती भटकत असताना तिला वाघाच्या फुरफुरण्याचा आवाज आला. ती सावध झाली.  पायांचा आवाज जवळ येत होता तशी ती जास्तच सावध झाली. वाघ कुणावर तरी झडप घालण्याच्या तयारीत होता. तिने डोळे बंद करून गंध घेण्याचा प्रयत्न केला.

सुं… सुं… सुं…

 कुणी हरीण होतं ते. हो… हरीणच…

तिने अंदाज घेतला आणि क्षणात आपल्या पायांना ताण देऊन ती उसळली. वाऱ्याच्या वेगाने ती धावत होती. वाघ जवळ होता. आता आणखी जवळ आला. अगदी जवळ. खूप जवळ. वाघ झडप घालणार इतक्यात झेलमने मधे उडी घेतली. वाघ एकदम गडबडला. कारण समोर आलेली शिकार त्याची नव्हती. ‘मधेच कोण कडमडलं?’ असा विचार करेपर्यंत ते घाबरलेलं हरीण सटकलं. झाडीत पसार झालं. जाताना त्याने झेलमकडे एक नजर टाकली. झेलमने त्याला ओळखलं.

वाघ सावध झाला होता. त्याने झेलमवर झडप घालण्याची तयारी केली आणि त्याला फसवत झेलमने एक उंच उडी घेतली. उंच उड्या घेत ती वाऱ्यासारखी तिथून निघून गेली. बिचारा वाघ पस्तावू लागला. दोन्ही शिकार निसटल्या. आता दुसरी शिकार शोधावी म्हणून तो परत फिरला.

***

दमलेली झेलम ओढ्यावर पाणी पीत होती. इतक्यात तिची आई आणि भावंडं तिथं आली.  ‘‘झेलम, तुझी भावंडं तुला न्यायला आलीत. आज तू तुझ्या भावाचा जीव वाचवलास. त्यांना त्यांची चूक उमजलीय.’’

झेलमच्या डोळ्यांत चमक आली. तिने हसून सगळ्यांकडे पाहिलं. आईच्या मानेवर मान ठेवून घासली. आईने तिच्या मस्तकावर जिभेनं चाटलं. झेलमच्या डोळ्यात पाणी आलं. तिने एकदा आईकडे आणि एकदा आपल्या भावंडांकडे पाहून घेतलं आणि ती वाऱ्याच्या वेगाने जंगलात दिसेनाशी झाली.  दूर जातानाही तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. त्याची चमक मात्र कायम होती.

farukskazi82@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author farooq s qazi zelam article new things the roar of a tiger akp

Next Story
नवीन वर्ष, नवा सूर्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी