scorecardresearch

बालमैफल: हरवलेलं घर

वसुंधराला खेळायला, भटकायला खूप आवडायचं. वसूच्या शाळेत तिच्या खूप मित्र-मैत्रिणीही होत्या, पण शाळा सुटली की सगळे टीव्ही किंवा मोबाइलला चिकटून बसायचे.

balmaifal marathi news, home of childhood marathi news
बालमैफल: हरवलेलं घर (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

किरण क्षीरसागर

वसुंधराला खेळायला, भटकायला खूप आवडायचं. वसूच्या शाळेत तिच्या खूप मित्र-मैत्रिणीही होत्या, पण शाळा सुटली की सगळे टीव्ही किंवा मोबाइलला चिकटून बसायचे. वसूला संध्याकाळी एकटंच खेळावं लागे. मग ती झाडांवरचे पक्षी पाहत फिरायची. छोटेसे, मऊमऊ पंखांचे, गोड गोड आवाजांचे पक्षी तिला फार आवडायचे. एके रात्री बाबानं तिला पक्ष्यांची छानशी गोष्ट सांगितली.

loksatta, balmaifal, story, kids, joy, fill, mind,
बालमैफल : आनंद तेवढा भरून घेऊ!
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis
“मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?
loksatta balmaifal, balmaifal marathi loksatta
बालमैफल : खजिन्याचा शोध

‘‘बाबा, आपल्या गावात खूपच कमी पक्षी दिसतात. असं का?’’ वसूनं विचारलं.
‘‘अगं मी लहान होतो ना, तेव्हा आपल्या गावात खूप पक्षी यायचे. जंगलातली झाडं म्हणजे पक्ष्यांचं घर. पक्षी झाडावरची फळं, किडे खातात. झाडावर घरटी करून राहतात. पण माणसानं लाकडासाठी, जमिनीसाठी जंगलं तोडली. आपल्या गावातलं मोठं जंगल असंच कापून टाकण्यात आलं. झाडं नष्ट झाली. पक्ष्यांचं घर हरवलं. त्यांना खायलाही मिळेना. म्हणून आता आपल्या गावात पक्षी येतच नाहीत.’’ असं म्हणून बाबानं वसूच्या अंगावर पांघरूण घातलं. वसू विचार करत झोपी गेली. त्या रात्री स्वप्नामध्ये तिला पक्ष्यांच्या किलबिलाटानं भरून गेलेलं गाव दिसलं.
दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत वसूच्या शाळेत तिच्या मित्रांची छोटीशी सभा भरली. तिनं सर्वाना माणसामुळे पक्ष्यांचं घर हरवल्याचं सांगितलं. मुलांना वाईट वाटलं. ‘‘आपण सर्वानी पक्ष्यांसाठी काहीतरी करायला हवं.’’ वसूनं मनातली गोष्ट सांगितली.
‘‘आपण लहान मुलं काय करणार?’’ आरंभनं विचारलं.

हेही वाचा : बालमैफल : खजिन्याचा शोध

‘‘आपण पक्ष्यांसाठी नवं जंगल बांधू या.’’ वसूनं चुटकी वाजवत म्हटलं. त्यावर दीपाली मोठय़ानं हसली. ‘‘अगं, मातीचा किल्लाय का तो? म्हणे जंगल बांधू या! जंगल कसं बांधणार?’’
‘‘येतं गं बांधता!’’ असं म्हणत वसूनं सगळय़ांना फक्कड कल्पना ऐकवली. ती ऐकून सगळय़ांचे डोळे चमकू लागले. मुलांच्या सभेनं एकमतानं पक्ष्यांसाठी जंगल बांधायचं ठरवलं.
वसू घरी आली ती नाचतच. बाबा कामावरून येताच तिनं त्यांना प्यायला पाणी आणून दिलं.
‘‘आज इतकी का सेवा चाललीय आमची? काय हवंय बरं वसूला?’’ बाबानं विचारलं. वसूनं जे मागितलं ते ऐकून बाबाचे डोळे आश्चर्यानं विस्फारले. आईनं तर तोंडावरच हात ठेवला. मग बाबांनी लगेच फोन घेतला. गावातल्या सगळय़ा मोठय़ा माणसांचे फोन वाजू लागले. रात्री गावात मोठय़ा माणसांची मीटिंग भरली. वसू आणि तिचे मित्र-मैत्रिणी आपापल्या आई-बाबांना घेऊन मीटिंगला आले.
‘‘काय? या लहान मुलांना गावचं मैदान हवंय?’’ गावचे सरपंच उडालेच.
‘‘एवढं मोठं मैदान लहान मुलांच्या ताब्यात कसं द्यायचं?’’ एक आजोबा म्हणाले.
मग वसूचे बाबा पुढे आले, ‘‘अहो, ही लहान मुलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांना मदत करायला हवी. आपण विश्वास दाखवला तर खरंच काहीतरी करूनही दाखवतील ही मुलं.’’ वसूचे बाबा खूप वेळ बोलत राहिले. गावकऱ्यांना त्यांचं म्हणणं पटलं. त्यांनी गावाजवळच्या मैदानाचा एक तुकडा मुलांच्या हवाली केला.
दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर वसू आणि तिची मित्रकंपनी मैदानावर पोहोचले. त्यांनी सोबत तुळस, आंबा, लिंबू, गोकर्ण अशा मिळतील त्या फळा-फुलांच्या बिया आणल्या होत्या. वसूचे बाबा आणि त्यांच्या काही मित्रांनी मुलांना खड्डा कसा करायचा, बी कसं पेरायचं, हे शिकवलं. मुलांनी खड्डे करून बिया पेरल्या. दुसऱ्या दिवशी पोरं गावभर फिरली. घराघरांतून खूप बिया गोळा झाल्या. चेंगट आजोबांनी झाडांच्या फांद्या काढून दिल्या. फांद्या जमिनीत रोवल्यानेही झाडं उगवतात हे मुलांना नव्यानेच कळलं.
काही दिवसांत जमिनीतून इवली इवली हिरवीगार रोपं उगवली. बच्चे कंपनीचा उत्साह वाढला. हळूहळू गावातली सगळी मुलं-मुली दररोज शाळा सुटल्यानंतर मैदानात जमू लागली. नवी रोपटी लावणं, पाणी घालणं, आळं तयार करणं, खत घालणं अशी कामं जोमात सुरू होती. बालगोपाळांनी त्या मैदानाचं नाव ठेवलं- ‘छोटं जंगल.’

हेही वाचा : चित्रास कारण की.. : भिंतीचित्र

आता मुलं शाळा सुटल्यावर मोबाइल आणि टीव्ही पाहिनात. त्यांना छोटय़ा जंगलाचं वेड लागलं. मुलं तिथे एकत्र जमायची, गाणी गायची, वेगवेगळे खेळ खेळायची. ते पाहायला गावकरी कौतुकानं जमू लागले. मग भानू आज्जींनी वसूच्या कानात कल्पना सांगितली. दुसऱ्याच दिवशी वसूनं सर्व मुलांना बोलावलं.
‘‘आज आपण एक मोठ्ठी गंमत करायचीय.’’ वसू उंच दगडावर उभी राहून म्हणाली.
‘‘कोणती गंमत?’’ मुलांनी उत्साहानं विचारलं.
‘‘आज आपण सगळय़ा झाडांचं बारसं करून टाकू. म्हणजे आजपासून या डािळबाच्या झाडाचं नाव असेल दीपाली. कारण आजपासून या झाडाची सगळी काळजी दीपाली घेणार. असं प्रत्येकाला एकेक झाड मिळणार.’’ मुलांना ती कल्पना खूपच भावली. प्रत्येक रोपटय़ाला मुला-मुलींची नावं मिळाली. मुलांनी आपापल्या नावांच्या पाटय़ा रोपटय़ांजवळ ठेवल्या. एकेक रोपटं, एकेक झाड मुलांचा मित्र होऊन गेलं.
वर्ष उलटलं!
मुलांच्या प्रयत्नांमुळे छोटं जंगल हिरव्यागार झाडांनी, वेलींनी फुलून गेलं होतं. दुपारच्या वेळेस तिथे छान सावली पडू लागली. मुलं आपापल्या नावाच्या झाडाखाली अभ्यासाला बसू लागली. झाडांवर छान छान फुलं उमलली. त्या फुलांवर फुलपाखरं भिरभिरू लागली. आणि गंमत म्हणजे, आता झाडांवर रंगीबेरंगी पक्षी येऊन बसू लागले. हळूहळू त्यांनी झाडांवर घरटी बांधायला सुरुवात केली. छोटं जंगल पक्ष्यांच्या चिवचिवाटानं आणि मुलांच्या किलबिलीनं प्रसन्न झालं.
वसू आणि तिच्या मित्रांनी गावात खरोखरंच छोटं जंगल निर्माण केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्ष्यांना त्यांचं हरवलेलं घर माघारी मिळालं. आता वसू आणि तिच्या मित्रांना मज्जा करायला त्यांचं हक्काचं छोटं जंगल होतं आणि सोबतीला होते नवे पक्षीमित्र!

kiran2kshirsagar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balmaifal a lost home of childhood css

First published on: 11-02-2024 at 00:06 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×