हॅलो, छोट्या चित्रकारा,
तू कधी विचार केलाय का, संगीताला रंग आणि चित्राला सूर मिळाला असता तर? …तर आपल्या कानाने पाहिलं असतं, डोळ्यांनी ऐकलं असतं. (आणि नाकाने कांदे सोलले असते) असं कधी झालं आहे का? कुठे होऊ शकतं का?
तर उत्तर आहे…, उत्तर आहे… ‘‘मला माहीत नाही.’’ मात्र आज आपण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. शास्त्रीय संगीत आणि अमूर्त चित्रकला हे दोघे जुळी भावंडं आहेत. दोन्हीही ‘न कळता’ अनुभवत असतो.
काहींना काहीच न समजणारा तो अनुभव आवडतो तर काहींना आयुष्यात सर्वच्या सर्व कळणारंच हवं असतं.
आता आपल्याला कोकिळेच्या गाण्यातून, किनार्यावर येणार्या लाटांना पाहून तसं काहीही ‘कळत, समजत’ नसतं, पण आपण तो अनुभव घेतच राहावा, असं मात्र वाटतं. असंच थोडंफार शास्त्रीय संगीताचं किंवा अमूर्त चित्रांचं असतं. संगीताच्या भाषेचं आणि चित्राच्या भाषेचं व्याकरण जवळपास सारखं असतं. जसं की लय, पुनरावृत्ती, विरोधाभास, समतोल. असं बरंच.
माझ्या कानांना ऐकू येणारी एक शांत लय डोळ्यांना आपोआप पाण्याचे संथ तरंग दाखवू लागते. हातही तसेच आल्हाद कागदावरून फिरतात. जेव्हा एखादा ढोल वेगात वाजू लागतो, तेव्हा ब्रश रंगांचे ठसे उमटवत कागदावर नाचू लागतो. चल तर मग, आज तूही हे करून पाहा.
तुझ्या घरातला सर्वात मोठा कागद समोर घे. रंग, ब्रश घे. तू आजवर न ऐकलेलं, न कळणार्या भाषेतील गाणं मोबाइलवर शोधून ठेव. गाण्यात शब्द नसले तर उत्तमच. संथ बासरीची धून असेल किंवा मिरवणुकीतला ढोल-ताशांचा दणका!
दक्षिण भारत, कोरिया, आफ्रिका, तुर्की असे तुला वाट्टेल त्या देशांतील स्थानिक गाणं सुरू झालं की डोळे मीट. थोडं ऐक. मग हातातील ब्रश कागदावर टेकव. आणि डोळे उघडून चित्र सुरू कर. आता नियम एकच. गाणं संपेपर्यंत तुझा ब्रश कागदावर थांबवायचा नाही. कुठलाही माहीत असलेला आकार कागदावर आणायचा नाही. गाण्यातल्या शब्दांचा अर्थ काढायचाही प्रयत्न करायचा नाही. आता चित्र कर सुरू.
जिथे गाण्यातला वेग वाढतोय, तिथे तुझ्या रेषा जाड आणि गडद येत आहेत का? त्यासाठी तू ब्रश बदलत आहेस का? जिथे एखादे कोमल वाद्य सुरू होईल, तिथे तुझा ब्रश अगदी हलका होऊन सावकाश वळणदार फिरवावासा वाटतोय का तुला?
तबल्याच्या किंवा ड्रम्सच्या प्रत्येक ठोक्याला एक नवा जाडसर ठिपका उमटवावा वाटतोय की, फराटा मारावा वाटतोय? तसं होत असेल तर ते संगीत तुझ्या काना-मनात, डोळ्यांत आणि कागदात पूर्ण उतरलेलं आहे. तू एकच कागदावर आणि गाण्यावर थांबू नकोस.
थोडं वेगळं गाणं, वेगळं वाद्य, वेगळ्या संस्कृतीचं गाणं कागदावर आणून पाहा. यात गाण्यानुसार बदल झाला असेल तर तू प्रयोगात पहिल्याच फटक्यात यशस्वी झाला आहेस आणि वेगवेगळ्या गाण्यांचे एकसारखेच कागद झाले असतील तर चित्र काढायला स्वत:ला आणखी चार कागद गिफ्ट कर.
संगीताच्या शैली किंवा बाजानुसार तू वाट्टेल ते रंग निवडण्यापेक्षा तुला योग्य वाटेल तेच रंग निवड. जगातल्या कोणाकडेही यासाठी कुठलेही नियम नाहीत. त्यामुळे बिनधास्त काम कर. संगीत थांबल्याबरोबर तू थांबण्याची गरज नाहीये. तुझ्या मनाला काम पूर्ण झालंय असं वाटल्यावरच थांब. थोडा ब्रेक घेऊन पुन्हा येऊन चित्र कानानं पाहा आणि डोळ्यांनी ऐक.
तुझ्या लक्षात येईल की, या कागदावर आता फक्त रंग राहिलेला नाहीये, तर त्यात तुझ्या गाण्याचा एक ‘आकार’ उमटला आहे. हा आकार मला खालील ईमेलवर पाठव.
तुझा चित्रमित्र
श्रीबा

