तनिष्का संदीप सावंत

शाळेला सुट्टी पडली म्हणून मी गोव्याला माझ्या मामाकडे राहायला गेले होते. मामाच्या घराभोवती मोकळय़ा जागेत आंबा, चिकू आणि नारळाची खूप सारी झाडं आहेत. माझा मामा आणि त्याचं कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्याला असतं. अलीकडे माझ्या मामाच्या मुलाला शाळेला सुट्टी लागली होती आणि मामासुद्धा घरूनच काम करत असल्याकारणानं ते आपल्या गोव्याच्या घरी आले होते. घराच्या सभोवताली असलेल्या झाडांमुळे कंपाऊंडमध्ये कुत्री, मांजरी यांसारख्या प्राण्यांचा सतत वावर असतो.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

मी गोव्याला गेले त्या दिवशी एक कुत्री सतत मामाच्या कंपाऊंडमध्ये इकडून तिकडे फिरत असल्याचं मला दिसलं. मला कुत्र्यांची खूप भीती वाटते, त्यामुळे माझं कंपाऊंडमध्ये फिरणं कठीण झालं होतं. मी मामीला विचारलं, ‘‘मामी, ती कुत्री अशी काय आपल्या कंपाऊंडमध्येच सतत फिरत आहे? ती कधी बाहेर जाईल?’’ त्यावर मामी म्हणाली, ‘‘अगं त्या कुत्रीनं आपल्या घराच्या पाठीमागे सात-आठ पिल्लांना जन्म दिला होता, पण त्यातली सात पिल्लं मरण पावली आणि एक पिल्लू जिवंत आहे.’’ मी कुतूहलानं त्या पिल्लाला पाहायला गेले. तर ते पिल्लू अगदी अशक्त झालेलं मला दिसलं. त्या पिल्लाला उभंसुद्धा राहता येत नव्हतं. मग दोन दिवस मी आणि माझा मामेभाऊ दोघेही त्या पिल्लाला न्याहाळत होतो. त्या पिल्लाला खायला मिळत नव्हतं. ते अगदी मान टाकून पडून राहिलेलं असायचं. मला खूप वाईट वाटत होतं आणि त्या पिल्लाची दयासुद्धा येत होती. मी आणि माझा मामेभाऊ त्या पिल्लाला खाऊ घालायचा प्रयत्न करत होतो, पण ते पिल्लू काही केल्या खाईना. ते खूपच अशक्त झालं होतं.

असेच एके दिवशी सकाळी आम्ही उठलो आणि रोजच्याप्रमाणे त्या पिल्लाला पाहण्यासाठी घराच्या पाठीमागे गेलो. पण त्या ठिकाणी ते पिल्लू दिसलंच नाही. मी मनातून थोडी अस्वस्थ झाले. कुठं बरं गेलं असेल ते पिल्लू? मग मी मामीला विचारलं, ‘‘अगं मामी ते पिल्लू कुठं गेलं?’’ आम्ही घराच्या सभोवताली सगळीकडे त्या पिल्लाला शोधू लागलो. तर ते पिल्लू घराच्या एका बाजूला मरून पडलेलं आम्हाला दिसलं आणि ती कुत्री त्या पिल्लाशेजारी बसून होती. ती कुत्री त्या मृत पिल्लाला तोंडात धरून घराच्या समोरच्या दिशेला आणण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही त्या कुत्रीचं निरीक्षण करत होतो. मध्येच ती कुत्री उठून कंपाऊंडच्या एका कोपऱ्यात गेली आणि त्या ठिकाणची माती काढण्याचा प्रयत्न करू लागली. मी मामीला विचारलं, ‘‘मामी ती कुत्री असं का करते?’’ तेव्हा मामी म्हणाली, ‘‘ती कुत्री आपलं ते मृत पिल्लू सुरक्षित राहावं म्हणून खड्डा खणून त्यात पुरून ठेवायचा प्रयत्न करतेय बहुतेक.’’ पण थोडय़ा वेळानं आम्ही पाहिलं तर ती कुत्री पुन्हा आपल्या पिल्लाच्या शेजारी येऊन बसली. कदाचित त्या कुत्रीला ती जागा सुरक्षित वाटली नसावी. ती पुन्हा त्या पिल्लाला तोंडात धरून दुसऱ्या जागी घेऊन गेली. दिवसभर ती कुत्री त्या मृत पिल्लाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात होती आणि सतत त्या मृत पिल्लाभोवती घुटमळत होती आणि त्याचं रक्षण करत होती. मला खूप नवल वाटलं.

त्या मेलेल्या पिल्लाच्या सुरक्षिततेसाठी ती कुत्री किती धडपडत होती. बघता बघता रात्र झाली आणि आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उठून त्या कुत्रीच्या पिल्लाला शोधू लागलो. पण आम्हाला ते पिल्लू कुठंच दिसलं नाही आणि ती कुत्रीसुद्धा कंपाऊंडमधून बाहेर गेलेली आम्हाला दिसली. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. अशी कोणती सुरक्षित जागा असेल ज्या ठिकाणी त्या कुत्रीनं आपल्या पिल्लाला लपवून ठेवलं असावं? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाहीच. आई आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम करते. सतत आपल्या पिल्लांना सुरक्षित वाटावं, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घेते. माणूस असो किंवा प्राणी आई ही आईच असते. जशा माणसाला सर्व प्रकारच्या भावना असतात तशा प्राण्यांनाही असतात. या एका गोष्टीची मात्र जाणीव झाली..

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली, सिंधुदुर्ग, इयत्ता- ९ वी