scorecardresearch

बालमैफल: बिनायाका-तेन

‘‘नमास्ते! हाय, आदि-गोरी..’’ एमादीदीने वाडय़ाच्या दारातूनच जपानी पद्धतीनं सगळय़ांना कमरेत वाकून नमस्कार केला.

Balmaifal
बालमैफल: बिनायाका-तेन

प्राची मोकाशी

‘‘नमास्ते! हाय, आदि-गोरी..’’ एमादीदीने वाडय़ाच्या दारातूनच जपानी पद्धतीनं सगळय़ांना कमरेत वाकून नमस्कार केला.
एमादीदी ही आदि आणि गौरीच्या चुलतभावाची- कौशलदादाची ‘ओकूसान’! जपानी भाषेमध्ये बायको. दोघं अमेरिकेत भेटले. त्यांचं लग्न करोनाकाळात तिथेच झाल्यानं घरचे ऑनलाइन सहभागी झाले. जिचा ऑनलाइन इतका लळा लागला अशा गोड स्वभावाची एमा आदि-गौरीसाठी एमादीदी झाली. गेल्या वर्षी ती भारतात दिवाळीत आली तेव्हा सगळेच तिचे फॅन झाले. वेगळय़ा देशाची असल्यानं तिच्याबद्दल खूप कुतूहल होतं. पण ती भेटली आणि सगळय़ांमध्ये छान रमली. आदि-गौरी त्यांच्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीमधून जे तिला शिकवायचं ते ती शिकायची. सारखं नवीन आणि कुणाकडूनही शिकण्याचा तिचा हा गुण सगळय़ांनाच भावला.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान

‘‘वुई हेव कम तू सी ‘बिनायाका-तेन’.’’ दीदी हात जोडून म्हणाली.
जपानमध्ये गणपतीची अनेक मंदिरं आहेत. तिथे त्यांच्या गणपतीसदृश देवाला ‘बिनायाका-तेन’ किंवा ‘कांगी-तेन’ म्हणतात. ‘तेन’ म्हणजे ‘देव’. कौशलदादाला बाप्पाचं भारी वेड. त्याच्याकडे अमेरिकेला गणपतीच्या असंख्य मूर्तीचं कलेक्शन आहे. मोरपिसातला, पिंपळाच्या पानावरचा, सुपारीत आकारलेला, तांदळाच्या दाण्यावर कोरलेला.. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची चांदीची मूर्ती देवघरात विराजमान आहे आणि त्यातून एमादीदीला दादानं दाखवलेले घरच्या गणपतीचे फोटो आणि व्हिडीयो! साहजिकच एमादीदीची गणपती आणि त्याच्यासाठी होणाऱ्या दहा दिवसांच्या उत्सवाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिला इथला गणेशोत्सव बघायचाच होता. मग काय? दोघांनी यावर्षी गणपतीच्या दिवसांमध्ये पुण्याची ट्रिप करायचं ठरवलं.
शेजारच्या वाडय़ातले लेलेकाका दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांसाठी गणपती बनवण्याचं वर्कशॉप घेणार होते. ते त्यांचा घरचा गणपती स्वत:च बनवायचे. त्यात वेळात वेळ काढून मुलांसाठी गणपती बनवण्याचं वर्कशॉपही घ्यायचे.
‘‘ईव्हन आय वोन्ट तू नो ‘बाप्पा-मेकिंग.’’’ तिला समजल्यावर एमादीदीने हट्टच धरला. तिला कौशलदादासाठी खास गणपती बनवायचा होता.
‘‘आम्ही देऊ दीदीला कंपनी.’’ गौरी म्हणाली तसा आदिनेही दुजोरा दिला. मग कौशलदादाही तयार झाला.
गणपती बसण्याच्या आदल्या शनिवार-रविवारी काकांनी वर्कशॉप ठेवलं. दहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी नियोजित वर्कशॉपमध्ये एमादीदी सगळय़ांत मोठी होती. तसं मुलांबरोबर कुणाचे बाबा, कुणाची आई, कुणाचे आजी-आजोबाही होतेच. पण भाग घेणारी प्रामुख्यानं मुलंच होती. तरीही एमादीदीनं न लाजता उत्साहात भाग घेतला. आदि-गौरीही तिच्याबरोबर बसले. त्यांनी हे वर्कशॉप यापूर्वी केलं होतं, त्यामुळे त्यांच्या कलाकुसरीचा आवाका त्यांना माहीत होता. त्यांचं सगळं लक्ष एमादीदीच्या बाप्पाकडे होतं.
काकांनी सांगितल्याप्रमाणे दीदीनं आधी आसन बनवलं. मातीचे दोन गोळे लांबट करून त्यांना मांडय़ांचा आकार दिला. त्यावर मातीचे अजून दोन गोळे एकावर एक ठेवले. काकांच्या सगळय़ा सूचना एमादीदी लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्यासाठी ते इंग्लिशमधूनही सांगत होते. मग तिनं हात बनवले- एक मोदकासाठी आणि दुसरा वरदहस्त- आशीर्वादासाठी. त्यानंतर गणपतीची सोंड केली, कान बनवले, डोळे कोरले. तिचे सगळे प्रपोर्शन्स एकदम परफेक्ट होते. वरदहस्त तर सुरेखच जमून आला होता. तिच्या कलाकारीत एकप्रकारची शिस्त होती. किंबहुना ती काय बनवणार होती याचा पूर्ण अभ्यास करून ती आली होती. आदि आणि गौरी तिचं काम निरखून बघत होते आणि मोबाइलवर रेकॉर्ड करत होते.
गणपतीचा बेसिक आकार बनल्यानंतर एमादीदीनं त्यावर दागिने बनवले. सोंडेवर कोरीव काम केलं. दात लावले- एक अख्खा आणि एक अर्धा. चौरंग, दागिने, सोंडेची सजावट तिनं तिच्या मनानेच केली. काकांनी त्यातलं काही वर्कशॉपमध्ये शिकवलेलं नसूनही केवळ तिच्या वाचनातून, निरीक्षणातून तिनं ते बनवलं. तरी दीदी खूश नव्हती.
‘‘व्हॉट हॅपन्ड?’’ आदिनं विचारलं.
‘‘यू वॉन्ट मोअर क्ले?’’ गौरीचा प्रश्न.
‘‘नो. बट समिथग इज मिसिंग.’’ दीदी म्हणाली आणि एकदम तिला सुचलं. तिनं उरलेल्या मातीच्या गोळय़ातून उंदीरमामा बनवला आणि तो मूर्तीपुढे ठेवला. हा संपूर्णपणे तिचा विचार होता. बाप्पा आता तयार झाला होता.
‘‘वॉव! विल यू कलर द बाप्पा?’’ आदिचा प्रश्न. एमादीदीनं होकारार्थी मान डोलावली.
दोन-तीन दिवसांनी दीदीनं बाप्पा विटकरी लाल रंगात रंगवला. डोळे काळे रंगवले अन् दात पांढरे. तिचं काम पूर्ण होतानाच तिला लेलेकाका वाडय़ात शिरताना दिसले.
‘‘रेरेखाका ऽऽऽ..’’ तिनं एकदम हाक मारली. जपानी भाषेमध्ये ‘ल’ हा उच्चारच नसल्यामुळे लेलेकाकांचे ‘रेरेकाका’ झाले होते. त्यांच्या नावाचा असा उच्चार ऐकून काकांनाही हसू आलं.
‘‘वा! सुरेख बनलाय गणपती’’ काका मूर्ती चारीबाजूंनी न्याहाळत म्हणाले.
‘‘पण मोदक राहिलाच बनवायचा.’’ कौशलदादाला आठवलं.
‘‘यू मीन.. ‘कांगीदान’?’’ एमादीदी पटकन म्हणाली.
‘‘कांगीदान?’’ काकांना समजेना. आदि आणि गौरीच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह.
‘‘जपानच्या बिनायाका-तेनला आपल्या बाप्पासारखाच मोदक आवडतो. तिथे त्याला कांगीदान म्हणतात. फक्त तो बनवण्याची रेसिपी थोडी वेगळी असते.’’ कौशलदादानं माहिती दिली.
‘‘तर काय झालं? घरचा खराखुरा उकडीचा मोदक ठेवू की गणपतीच्या हातावर.’’ आदिनं सुचवलं.
‘‘बेस्ट आयडिया. आणि मस्त फुलांनी सजवूया मूर्तीला.’’ गौरी म्हणाली.
‘‘पण मूर्ती गंमत म्हणून बनवलीये आपण. तिची प्राणप्रतिष्ठा कशी करणार?’’ कौशलदादाची शंका.
‘‘अथर्वशीर्ष तर म्हणूच शकता! किती बरं वाटेल पोरीला. न आपल्या देशाची, न तिला काही आपल्या प्रथा-पद्धती माहीत. पण किती प्रेमानं बनवलाय गणपती. शिकण्याचा खूप चांगला गुण आहे तिच्यात. त्याचा तो सन्मान. शेवटी गणपती ज्ञानाची देवता आहे!’’ काका म्हणाले.
‘‘खरंय काका. लहानपणापासून आम्ही घरात गणपती दरवर्षी येताना बघतोय. आम्हालाही नाही जमला कधी बनवायला, पण दीदीनं पहिल्याच प्रयत्नात किती सुंदर गणपती बनवला..’’ इति आदि.
‘‘आमचा तर यावेळचाही फ्लॉपच झाला.’’ गौरीनं ओठांचा चंबू केला.
‘‘बेटा, प्रयत्नांती परमेश्वर.. म्हणजेच तर गणपती! करत राहा. नक्की जमेल. तुमच्या एमादीदीकडून शिका.’’ काकांनी प्रोत्साहन दिलं.
‘‘हो नं. तिचा उत्साह बघता एमादीदी आता मोदकही बनवायला शिकेल.’’ आदि हसला.
‘‘तुम्ही सगळे नका अजून काहीतरी सुचवू एमाला.’’ कौशलदादा टाळी देत म्हणाला.
आणि खरोखरच त्या रात्री यू-टय़ूबचे व्हिडीयो बघत, आई-काकूबरोबर चर्चा करत, सगळय़ाचे अर्थ समजून घेत, एमादीदी उकडीचे मोदक शिकण्याच्या तयारीत सगळय़ांना दिसली. यावर्षी ‘बिनायाका-तेन’ला नक्कीच एमादीदीच्या हातचे स्पेशल ‘कांगीदान’ खायला मिळणार होते!
mokashiprachi@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×