कर्कश्श आवाज, काळाकुट्ट रंग, सहज नजरेला पडणारा, माणसाला न घाबरणारा किंवा ना घाबरवून टाकणारा, त्यामुळे रोजचाच झालेला आणि कोणतीही अप्रूपता नसल्याने फारसा महत्त्वाचा न वाटणारा असा हा पक्षी. बालमित्रांनो, वर्णनावरून तुम्ही नक्की ओळखलं असेल की मी कावळ्याबद्दल बोलते आहे. आपल्या आसपास रोज दिसणार्‍या या पक्ष्याबद्दल आपल्याला विशेष कुतूहल वाटण्याचं कारणच वाटत नाही, पण आजपासून तुम्ही त्याच्याकडे थोडंसं कुतूहलाने पाहावं यासाठीच हा माझा प्रयत्न आहे.

आजकाल सगळेजण स्वकेंद्रित झाले आहेत, पण कावळा मात्र आपल्या सर्वांपेक्षा वेगळा असल्याचं सहज दिसतं. कोणताही खायचा पदार्थ दिसू दे हा कधीही एकट्याने खाणार नाही. खायची वस्तू दिसल्यावर कावकाव असा हाकारा करत आपल्या बांधवांना बोलावणार आणि त्यांच्याबरोबर खाऊ वाटून घेत तो सगळे मिळून फस्त करणार. कृतीतून खूप मोठी गोष्ट दाखवत असतो तो आपल्याला. तो कोकिळेची अंडी उबवतो म्हणून अनेकजण त्याला वेड्यात काढतात. मात्र, मला त्याचं कौतुक वाटतं. दुसर्‍याचं मूल आपल्या मुलासारखं वाढवणं, त्याला अंड्यातून बाहेर काढत जग दाखवणं यासाठी विशाल हृदय असावं लागतं. परिसर स्वच्छतेचा डंका आपण सारे शब्दांमधून आणि फोटोंमधून दाखवत असतो, मात्र हा सतत त्याचा ध्यास घेतल्यासारखा परिसराची स्वच्छता करत सुटतो. ही फक्त झलक झाली, अशा अनेक गोष्टी तुम्हाला कावळेदादाच्या निरीक्षणातून दिसतील. त्या आम्हाला लिहून किंवा ई-मेल करून पाठवाल ना?
joshimeghana.23 @gmail.com