राधिका विंझे
ईशानं आजोबांना कृष्णाची गोष्ट सांगण्याचा हट्ट केला. आजोबांनी कृष्ण, त्याचे सवंगडी, त्यांचा गोपाळकाला या सगळ्याबद्दल ईशाला सांगितलं. दही, दूध, मध, तूप, इ. अनेक पदार्थ एकत्र करून काला करायचा आणि तो सगळ्यांनी मिळून खायचा हे ऐकून ईशाला गंमत वाटली. तिनं आजोबांना विचारलं, ‘‘आजोबा, हे सगळं एकत्र करून खातात, त्याची चव कशी लागत असेल? दूध, दही, तूप, पोहे सगळं एकत्र खाताना त्यांची आपापली चव लागते की एकत्र केल्यावर काहीतरी वेगळाच पदार्थ बनतो?’’
आजोबा ईशाला म्हणाले, ‘‘हे जरी सगळं एकत्र केलं ना, तरी त्यांची आपापली चव मात्र तशीच राहते. जशी आपण भेळ बनवतो, त्यात फरसाण, चिंच/ तिखट चटणी, कुरमुरे, कांदा-टोमॅटो यांची चव वेगवेगळी लागते, पण तरीही एकत्र भेळ छान लागते तशीच.’’
ईशा विचारात पडली. ‘‘पण आजोबा, ही किती गंमत आहे ना! आपण हे सगळे पदार्थ एकत्र करतो, तरी त्यांची चव एकमेकांत मिसळत नाही. पण मग असेही काही पदार्थ असतात का, की जे अनेक पदार्थांपासून बनतात तेव्हा त्यांची चव बदलते?’’
आजोबा हसून ईशाला म्हणाले, ‘‘बघ, बोलता बोलता आपण तुझ्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातल्या धड्याकडे आलो. तुझ्या पाठ्यपुस्तकात मूलद्रव्य, संयुग, मिश्रण याबद्दल एक धडा आहे. कोणताही पदार्थ हा मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण या तीन प्रकारांत विभागला जातो. मूलद्रव्य म्हणजे ते पदार्थ- ज्यात एकच द्रव्य असतं. कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली तरी मूलद्रव्याचं विभाजन इतर कोणत्या पदार्थांत करता येत नाही. मूलद्रव्यांचे स्वत:चे विशिष्ट गुणधर्म असतात. उदा. आपल्या हवेत असणारे ऑक्सिजन, हायड्रोजन किंवा आपण ज्याची तार बनवतो ते लोखंड, तांबे यांसारखे धातू. दोन किंवा अधिक मूलद्रव्यं एकत्र येऊन जे पदार्थ तयार होतात त्यांना म्हणतात संयुग किंवा मिश्रण. दोन मूलद्रव्यांचं जेव्हा एक संयुग बनतं, तेव्हा ते संयुग हा एक पूर्णत: नवीन पदार्थ असतो. संयुगात त्याच्या घटक मूलद्रव्यांचे कोणतेही गुणधर्म नसतात. उदा. पाणी. हायड्रोजन आणि ऑक्सिजन विशिष्ट प्रमाणात एकत्र येऊन पाणी हे संयुग बनतं. तसंच आपण खातो ते मीठ किंवा आई केक करताना वापरते तो बेकिंग सोडा. मिठात सोडियम आणि क्लोरीन ही दोन मूलद्रव्यं असतात. जर आपण सोडियम या मूलद्रव्याचे गुणधर्म पाहिले तर ते अतिशय क्रियाशील ( reactive) आहे. ते हवेत जळतं. क्लोरीन विषारी आहे. परंतु मिठामध्ये हे दोन्हीही गुणधर्म नाहीत. बेकिंग सोडा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या चार मूलद्रव्यांपासून बनतो. या चारही मूलद्रव्यांपेक्षा बेकिंग सोडा या संयुगाचे गुणधर्म वेगळे आहेत.’’
ईशा अतिशय लक्ष देऊन ऐकत होती. तिने पटकन विचारलं, ‘‘मग आजोबा, मिश्रण म्हणजे काय? त्यातही दोन किंवा अधिक मूलद्रव्यं एकत्र येतात ना?’’
आजोबा म्हणाले, ‘‘अगदी बरोबर. पण मिश्रणामध्ये जी मूलद्रव्यं एकत्र येतात, त्या मूलद्रव्यांचे स्वत:चे गुणधर्म टिकून राहतात.’’ ईशा चक्रावली.
‘‘असं कसं शक्य आहे? म्हणजे नक्की काय होतं आजोबा? उदाहरण द्या.’’
आजोबा म्हणाले, ‘‘आजूबाजूला बघ… मिश्रणाची अनेक उदाहरणं तुला मिळतील. आपली हवा- जी ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइडने बनली आहे, आपण पितो ते चहा, कॉफी. तसंच अनेक खनिजे, सेंद्रिय पदार्थ यांनी बनलेली आपली माती… ही सगळी मिश्रणे आहेत. चहा, कॉफीमध्ये दूध, साखर यांची वेगळी चव लागते. म्हणजेच त्यांचे गुणधर्म टिकून राहतात. मातीत खनिजे, सेंद्रिय घटक आपले गुणधर्म टिकवून असतात त्यानुसार मातीची सुपीकता ठरते.’’
ईशाला आज खूप नवीन माहिती मिळाली. हे सगळं समजल्यानं आता पाठ्यपुस्तकातला धडा शिकायला जास्त मजा येईल म्हणून ईशा खूश झाली.
radhikavinze@gmail.com
