खरं तर जगातील सर्वात मोठी भयंकर युद्धे कागदाच्या एका छोट्या तुकड्यावर सह्या करून थांबत असतात. या कागदाच्या तुकड्यात तशी खूप शक्ती असते. कागद शांतीही आणू शकतात आणि भांडणंही लावू शकतात. कागदावरची अशी युद्धे आपणही करून पाहू या का?
यासाठी तुला महागडी विनाशक शस्त्रे-अस्त्रे नको, की काही हजार सैनिकही नकोत. आपण हे काम रंगांना देऊ या. त्यांना भांडताना किंवा मैत्री करताना पाहू या. कदाचित ते हसतील, कदाचित रडतील… तुझ्या हातात सगळं आहे. यात आणखी गंमत आणायला प्रत्येक रंगाला एकेक व्यक्तिमत्त्व देऊ या. कसं? सांगतो.

तुझ्या वर्गातल्या मुलांना डोळ्यासमोर आण. प्रत्येकजण एकमेकांपासून वेगळा आहे. आणि प्रत्येकाचं तुझ्यासोबतचं वागणंही वेगळं आहे. बरोबर? सुरुवातीला त्यातल्या १२ किंवा मित्र/ मैत्रिणींची नावं वहीमध्ये लिही. आता एकेकाच्या स्वभावाप्रमाणे तू तुझ्या रंगपेटीतले रंग निवड आणि त्या त्या मुलांच्या नावापुढे ठेव. तुझ्याकडे रंगाच्या ट्यूब किंवा बाटल्या असतील तर त्या ठेव. रंगाच्या वड्या (केक) असतील तर मित्रांच्या नावापुढे रंगाची नावे लिही.

लाल रंग म्हणजे तो एकदम ‘मीच शहाणा!’ म्हणणारा. ज्याच्यात ऊर्जा, धाडस, थोडीशी खोडकर छटा असते. तो/ ती पिवळा! जो तर विनाकारण सतत हसणारा त्याला कुठला रंग देशील? ते तू ठरव.

आता कुठलेही दोन वर्गमित्र/ मैत्रिणींना एकत्र कर. जसे की माझ्या कागदावर मी लाल आणि निळा यांना भेटवलं. मला वाटलं, लालभडक रंग आता मोठ्ठं भांडण काढणार. पण दोघं भेटले आणि अचानक तिथे जांभळा तयार झाला! कदाचित दोघांनी एकमेकांचं थोडंसं ऐकलं. स्वत:ला थोडंसं बदललं आणि तिथं एक नवीन मित्र तयार झाला.

तुझ्या वर्गात असंच होतं का? दोन वेगळे स्वभाव भेटले की भांडणे होतीलच असे नाही. आता मी पिवळा आणि निळा एकत्र आणले. मस्त हिरवा रंग तयार झाला. थोडी गंमत म्हणून पिवळ्याचे तिन्ही भाऊ म्हणजे क्रोम, ऑकर आणि लेमन यालाही आणलं. पुढे निळ्याचे भाऊ अल्ट्रामरिन, कोबाल्ट आणि पर्शियन यांनाही ठेवलं. सहा जणांनी सहा वेगळे हिरवट शेवाळी रंग दिले. असं वाटलं की, पावसात डोंगरावर विविध छटांची झाडी दिसतात तीच माझ्या कागदावर उगवली. रंग जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा स्वत:ची एक गोष्ट तयार करतात ती अशी.

पण सगळ्या गोष्टी गोड असतात असं नाही. दोन सुंदर रंग एकमेकांना भेटल्यावर हळूहळू चिखलासारखे तपकिरी वगैरे होतात. काळपट पडतात. आता नसतात काहींचे स्वभाव पटत, त्याला आपण काय करणार.

तुझ्या कागदावर हे १२ मित्र तू ज्या प्रमाणात वापरशील तसे वेगवेगळ्या तर्‍हेने भेटतील, बोलतील, हसतील, भांडतील, मध्यस्थी करतील, काही आगीत तेल टाकून भांडणे वाढवतील तर काही एकमेकांना सहकार्य करतील. कागदावर रंगांचे महायुद्ध सुरू ठेव. एका कागदावरून दुसर्‍या कागदावर वाढू देत. युद्धविश्रांती घेतली तरी पुन्हा सुरू कर. हे चालू असताना तू मात्र त्यांच्या त्यांच्यात होणारे परिणाम नीट पाहून ठेव. जमल्यास नोंद करून ठेव. तुझ्या रंगाचे महायुद्ध मला ई-मेलवर पाठव.

तुझा चित्रमित्र,

श्रीबा
ushriba29@gmail.com

शिक्षक आणि पालकांसाठी सूचना…
१.
रंगांशी नुसतंच खेळताना मुले नुसते रंग लावायला शिकत नसतात. ती संवादही साधत असतात.
२. कुठे थांबायचं, कुठे मिसळायचं, कुठे दुसर्‍याला जागा द्यायची- हे रंग त्यांना शांतपणे सांगत असतात. त्यामुळे मुलांना विनाउद्देश रंगात खेळू द्या.