-राज्वी चंद्रकांत पवार

ओमकारच्या शाळेत आज मराठीच्या सरांनी सांगितलं की, मी तुम्हाला उद्या ‘मराठी भाषा गौरव दिना’विषयीची माहिती सांगेन. घरी येईपर्यंत त्याच्या डोक्यात तोच विषय सुरू होता. घरी आल्यावर आजीला विचारलं, ‘‘आजी, मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय गं.’’

आजी म्हणाली, ‘‘मराठी भाषा म्हणजे आपली राज्य भाषा. १ मे हा महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो; आणि मराठी भाषा गौरव दिनही साजरा केला जातो.’’
‘‘कधी असतो तो दिवस?’’ ओमकारनं विचारलं.

‘‘२७ फेब्रुवारी.’’ आजी म्हणाली.
‘‘पण मग काय करायचं या दिवशी?’’ ओमकारनं कुतूहलानं विचारलं.

हेही वाचा…बालमैफल : नावात काय आहे

‘‘आपल्या मराठी भाषेवरचे कार्यक्रम करायचे असतात.’’ आजीनं ओमकारचं समाधान केलं. ओमकार पाचवीत होता.
‘‘अगं, २७ फेब्रुवारी म्हणजे माझा वाढदिवस. त्या दिवशीच आहे आजी हा दिवस.’’ ओमकाराची ट्यूबलाइट पेटली.
‘‘हो आणि तो उदयाच आहे.’’ आजीनं उत्तर दिलं.’’

‘‘आपण तुझा वाढदिवस मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करू या का?’’ आजीनं सुचवलं.
‘‘मराठमोळा म्हणजे कसा गं?’’ ओमकारचा प्रश्न.

‘‘अरे, म्हणजे तू बघ नेहमी केक कापतोस. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो. पण माझ्या वेळेस कुठे असायचं केक कटिंग. आम्ही लहान असताना हॉटेलंही नव्हती फारशी.

हेही वाचा…बालमैफल : जलसाक्षरता

त्यापेक्षा आपण तुझ्या आवडीचं जेवण करू, असं मी आईला सांगते. आम्ही औक्षण करू.’’ आजीनं ओमकारला समजावलं.
‘‘चालेल,’’ असं म्हणत ओमकार खुदकन् हसला.

दुसऱ्या दिवशी सगळं ठरल्याप्रमाणे झालं. आईनं ओमकारच्या आवडीची गव्हाची लापशी बनवली. सगळ्यांनी ओमकारला शुभेच्छा देताना ‘तुला वाढविसाच्या खूप खूप शुभेच्छा’ असं म्हटलं.

‘‘शुभेच्छा म्हणजे काय गं आजी?’’ ओमकारनं विचारलं.

‘‘अरे, आम्ही तुला नेहमी HAPPY BIRTHDAY असं म्हणतो यालाच मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणतात.’’ आजी म्हणाली.
‘‘पण आजी, मला मराठी भाषा सुधारायची असेल तर काय करावं लागेल.’’ ओमकारनं आजीला विचारलं.
‘‘अरे, मराठी वर्तमानपत्र वाच. पुस्तकं वाच, मराठी बातम्या पाहा.’’

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!

ओमकार लगेच धावत बाबांकडे गेला आणि म्हणाला, ‘‘बाबा, मी आता रोज मराठी वर्तमानपत्रं, पुस्तकं आवर्जून वाचणार.’’

इयत्ता आठवी