सध्या सगळीकडे उन्हाची काहिली आहे. अगदी वैशाख वणवा पेटलाय जणू. बालमित्रांनो, आपण सगळेच या उन्हाने त्रस्त होत असतो. या त्रस्ततेमुळेच त्याच्या गुणाकडे डोळेझाक होते म्हणून आज त्याबद्दल थोडंसं. हे चकचकीत ऊन कानाकोपर्यात जाऊन मन प्रसन्न करत असतं. त्याची पिवळी झिलई मनालाही तशीच झालर लावते. निसर्गालाही या दिवसांत बहरण्याची, फुलण्याची, फळण्याची शक्ती मिळते. हीसुद्धा त्याचीच देणगी असावी. हे दिवस मौजमजेचे, भेटीगाठींचे, पर्यटनाचे असतात याला कारण ही प्रसन्नताच असते. जशी प्रसन्नता तसाच एक प्रकारचा निर्धास्तपणा यात जाणवतो.
लवकर येणारा सूर्यनारायण जास्त काळ आपल्या समवेत राहतो, त्यामुळे आपला खेळण्याबागडण्याचा, खाण्यापिण्याचा काळ वाढतो. अरे, तिकडे अंधार असेल. पूर येईल बरं का? वगैरेंसारखी भीती नसतेच मुळी. आपल्यापाशी जे आहे ते भरभरून देत जावं हेही सूर्यनारायण चहूअंगांनी उन्हाची उधळण करत सांगत असतो. आणि महत्त्वाचंं म्हणजे, दिवस बदलत असतात याची जाणीव या काळात होतेच होते. ज्यांना ऊन आवडत नाही, त्याचा त्रास होतो; त्यांच्यासाठी ढगांना आमंत्रण या दिवसांतच पाठवलं जातं. कारण आपण सगळ्यांचे आवडते असणार नाही, त्यामुळे त्यांच्या आवडत्या पावसाच्या ढगांना आमंत्रण देण्याचा मोठेपणा याचाच. आहे की नाही सगळंच अद्भुत!
