‘ए गाढवाच्या लेका’ असं रागाऊन म्हणत सौरभच्या आईने त्याच्या पाठीत एक धपाटा दिला. सौरभ त्या धपाट्यामुळे अजिबात रागावला नाही, उलट टाळ्या पिटत हसू लागला.

‘‘हसतोस काय! कोडगा झाला आहेस नुसता!’’ आई रागातच सौरभला म्हणाली.

‘‘अगं आई, तू मला गाढवाच्या लेका म्हणालीस म्हणजे…’’ असं म्हणत सौरभने तेथून पळ काढला. आईला तिची चूक लक्षात आली आणि तीही हसू लागली.

सौरभला नंतर ती म्हणाली, ‘‘अरे, माझं चुकलंच बरं का! गाढव किती गरीब असतं, गुणी असतं, किती सामान पाठीवरून नेतं आणि त्याच्या नावाचा मी उद्धार केला, हे मी बरोबर केलं नाही. सॉरी! आणि तुला गाढव म्हटल्यामुळे आम्ही गाढव होतोच नाही का? आईने आणि सौरभने एकमेकांना हसत टाळ्या दिल्या.

सौरभ तसा मस्तीखोर मुलगा. सारख्या इतरांच्या खोड्या काढायचं त्याचं काम असायचं. तसाच अतिशय चंचल. त्याच्या चंचलपणाकडे बघून त्याची मावशी एकदा त्याला म्हणालीही, ‘‘काय हे सौरभ, नुसता माकडासारखा उड्या काय मारतोस? माकड दिसतोस!’’

सौरभ हे ऐकून लगेच मावशीला म्हणाला, ‘‘काल मी गाढव होतो, आज मी माकड झालो,’’ असे म्हणत माकडचेष्टा करत, गाढवासारखा पायाने हवेत लाथ झाडत पळून गेला. आई आणि मावशी कपाळाला हात लावून हसत बसल्या. थोड्याच वेळात टीव्हीवर हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध डायलॉग सौरभच्या कानावर पडला.

सिनेमातला एक दुष्ट माणूस दुसर्‍या एका बिचार्‍या माणसाला ‘‘कुत्ता कहीं का,’’ म्हणत होता.

सौरभ विचार करू लागला. ‘काल मी गाढव होतो, नंतर मला माकड म्हणून हिणवलं गेलं. आणि आता हा गरीब बिचारा माणूस कुत्ता झाला.’ त्याच्या मनात आलं, ‘हे प्राणी किती गोड, मजेशीर, काही गरीब, काही तिखट! त्यांना देवाने जसे बनवले आहेत तसे ते आहेत आणि त्यांचा आपण असा वापर करतो.’

तो विचार करू लागला, ‘लोक म्हैस आहे नुसती, डुक्कर कुठला, वेडा राघूच आहे,’ असं किती सहज म्हणत असतात. ‘मांजर कसं लबाड असतं, तशी आहे ही.’ शेजारची अनघा उड्या मारत मारत निघाली की सगळे तिला ‘फुलपाखरासारखी’ आहे असं म्हणतात. म्हणजे कशी? तर स्वच्छंदी. पण कधी कधी त्या स्वछंदीपणाला हिणवल्याची झाक असते. ‘त्याच्याशी फार जवळीक नको हां, केव्हा डंक मारेल सांगता येत नाही. नाग आहे नाग!’ असंही म्हटलं जातं. सौरभ त्याच्या माकडचेष्टा थोडा वेळ थांबवून विचार करू लागला. त्याला त्याच्या नुकत्याच केलेल्या दक्षिण भारताच्या सहलीची आठवण झाली.

सौरभच्या घरचे सगळे कुर्गला सहलीसाठी गेले होते. छान छान कॉफीच्या बागा बघत डोंगरात झाडावर लोंबणारे मोठ मोठे फणस, वेलींवर लगडलेले मिरीचे झुपके, दालचिनीची झाडं, असंख्य पक्षी, जवळपास ४०० जातींचे, (अर्थात सगळेच्या सगळे ४०० जातींचे नाही पाहायला मिळाले) पाहात पाहात डोंगरातून फिरायला मजा येत होती. कॉफीच्या झाडांवर प्रत्येक देठागणिक मोगर्‍यासारखी आणि तितकीच सुवासिक फुले पाहून सर्वांनाच खूप आनंद वाटला होता. दुरून त्या झाडांवर जणू स्नोच पडला असावा असं वाटेल! कॉफीच्या उन्हात सुकवत ठेवलेल्या बियाही कुडुम कुडुम करत चावायला मजा आली होती. फुलांना मात्र कॉफीचा सुगंध नव्हता.

डोंगरात फिरताना अचानक एका शेकरूने ( Giant Indian Squirrel) दर्शन दिलं होतं ते सौरभ अजूनही विसरला नव्हता. हत्तींचा कळपही पाहायला मिळाला होता. हळूच एक सर्प मातीचा रस्ता क्रॉस करून वळवळत झाडीत जातानाही दिसला होता. ते दृश्य सौरभला सर्वोत्तम आनंद देऊन गेलं होतं. घरी परतल्यावर त्याच्या माकडचेष्टांमध्ये तो त्या सर्पासारखा वळवळत घरभर फिरायचा. घरातले ते पाहून कपाळाला हात लावायचे. या सर्व गमतीजमती जरी सौरभने अनुभवल्या होत्या तरी एक गोष्ट त्याला खटकली होती त्याची त्याला आठवण झाली.

कुर्गला सगळे कुठेतरी धबधबा पाहायला गेले होते. बर्‍याच पायर्‍या उतरत उतरत जाताना सौरभने टिपलेलं दृश्य तो कधी विसरला नव्हता. तिथे दर चार पायर्‍यागणिक कचरा टाकण्यासाठी प्राणी व पक्ष्यांच्या तोंडं वासून केलेल्या फायबरग्लासमध्ये बनवलेल्या कचराकुंड्या होत्या. त्या प्राण्यांचा असा वापर झालेला पाहून सौरभचं मन विषण्ण झालं. कचराकुंड्या पेंग्विनच्या नेहमीच असतात. इथे अगदी हत्ती, ससा, पोपट, कुत्रा, वाघ, माकड सगळेच माणसांचा कचरा पोटात घ्यायला उन्हातान्हात, पावसापाण्यात सदैव उभे होते आणि बेपर्वाईने कचरा टाकल्यामुळे गलिच्छ दिसत होते.

सौरभला, त्याला गाढव-माकड म्हणून संबोधल्याचं आठवलं आणि तो त्याच्या सर्व माकडचेष्टा विसरून गंभीर झाला. त्याच्या मनात आलं, सर्व वाईट गोष्टींसाठीच या प्राण्यांचा वापर का बरं करतात माणसं?

सौरभला तो प्रश्न सतावत राहिला. त्याच्या माकडचेष्टा आणि गाढवपणा या गोष्टी त्यामुळे कमी झाल्या नाहीत, पण तो विचारी नक्कीच झाला. प्राण्यांचा असा हीनपणे वापर करणे त्याला योग्य वाटले नाही. त्या विचाराच्या अस्वस्थतेतून तो उठला आणि त्याने त्यावर चित्र रूपाने प्रोजेक्ट तयार केला. घाबरतच त्याने शाळेत मॅमना तो दाखवला. तो अर्थातच शाळेत नावाजला गेला हे सांगायला नकोच. शाळेत शिरल्याबरोबर समोरच त्याचा प्रोजेक्ट बोर्डावर लावला होता. सर्वत्र सौरभच्या संवेदनशील मनाची स्तुती होत होती. त्यापुढे सौरभच्या माकडचेष्टांना ‘मस्तवाल’ आणि त्याने गाढवपणा केल्यास ‘मूर्ख’ असं त्याचे शिक्षक आणि आसपासचे संबोधू लागले. सौरभचे माकडचेष्टा आणि गाढवपणा करणे जरी पुढे टिकून राहिले, तरी प्राण्यांच्या नावाचा असा वापर करताना आसपासचे जीभ चावू लागले.
vidyadengle@gmail.com