आपण उन्हाळ्याकडून पावसाळ्याकडे जात आहोत. पावसाळा म्हणजे पाण्याचा लोंढा आणि त्या लोंढ्यातून वाहत जाण्याची शक्यता. हे झालं उदाहरणादाखल. आपणही एखाद्या विचारांमध्ये, कृतीमागे काही वेळा असेच वाहत जातो. अशा वेळी आपल्या आसपास असणार्‍या किंवा आपण पाहिलेल्या वडाच्या झाडाला डोळ्यासमोर आणून तर बघा! वडाचं झाड म्हटलं की त्याला फुटलेल्या असंख्य पारंब्या आणि त्या पारंब्यांमुळे त्याचा झालेला प्रचंड विस्तार हे सहजच डोळ्यांसमोर येतं. बालमित्रांनो, आजकाल आपण प्रत्येक जण आपापल्या स्पेसला महत्त्व देतो. इतरांचा आधार जास्तीत जास्त न घेता कसं जगता येईल यावर भर देतो. यावेळी आपण सर्वांनी मुद्दामच वडाच्या झाडाकडे निरखून पाहावं. खरं तर त्याच्या पारंब्या ही त्याची हवाई मुळं. पुढे ती जमिनीत जातात, रुजतात आणि वडाच्या झाडाचा आधार बनतात. अशा पारंब्यांनी मिळून झाडाचा परीघ दिवसेंदिवस वाढत जातो. झाडाला बळकटी येते आणि तो एक प्रचंड असा वटवृक्ष बनतो- ज्याची आयुष्यमर्यादा शेकडो वर्षं असू शकते. अनेक पक्षी, प्राणी यांचा तो तारणहार बनू शकतो. पारंब्यांकडून मिळालेला आधार स्वीकारल्यानेच त्या वटवृक्षाला एवढा विस्तार आणि ताकद प्राप्त होते. म्हणजेच आधार नाकारण्यापेक्षा आपली ताकद वाढवणारा आणि आपल्याला विस्तृत करणारा आधार इतरांकडून घेणं यातच खरं शहाणपण असतं.

joshimeghana.23@gmail.com