प्रा. डॉ. नंदा संतोष हरम
‘‘राजू बेटा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’’ राजू अंथरुणात असतानाच आई-बाबांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्वारी एकदम खूश झाली. वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच!
आई-बाबा म्हणाले, ‘‘बाळा, आज एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुझा सत्कार होणार आहे.’’
‘‘तो कशाबद्दल!’’ त्याला काहीच कळेना.
आई म्हणाली, ‘‘मीच तुझं नाव दिलं होतं स्पर्धेकरिता. ५ ते ८ वर्ष वयोगटामध्ये तुझी पर्यावरण मित्र म्हणून निवड झाली आहे. ६ वर्षांचा चिमुरडा राजू जाम खूश झाला.




बाबा म्हणाले, ‘‘राजू, सत्काराच्या वेळी तुला थोडे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं द्यायची. देशील ना! ‘‘देईन की.. त्यात काय मोठ्ठं?’’, असं म्हणत अंथरुण बाजूला टाकलं आणि उडय़ा मारू लागला. त्याचा तो निव्र्याज आनंद बघून आई-बाबांना बरं वाटलं.
दुपारी आईने त्याच्या आवडीचा बेत केला होता. राजूचे आजी-आजोबा, मावशी, आत्या.. सगळे आले होते. एकतर वाढदिवस आणि संध्याकाळी सत्कार. छोटय़ाचा कौतुक सोहळा अनुभवायचा होता. कारणही नेहमीपेक्षा वेगळं होतं ना! राजूच्या मित्रमंडळींची वाढदिवसाची पार्टी लवकर म्हणजे ४ वाजताच आवरून घेतली. सत्कार समारंभाकरिता वेळेच्याआधीच पावणेसातलाच हॉलवर सारी मंडळी उत्साहाने गेली. राजू आपल्या आई-बाबांबरोबर पहिल्या रांगेत जाऊन बसला. खरं म्हणजे त्या बाल जीवाला सत्कार म्हणजे नेमकं काय, हे कळत नव्हतं. पण आपल्याला बक्षीस मिळणार आहे म्हणून सगळे खूश आहेत, आपलं कौतुक करत आहेत आणि आणखी होणार आहे, एवढंच त्याला कळत होतं.
अखेर कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्पर्धेविषयी सगळी माहिती सांगण्यात आली. ५ ते ८ वर्ष वयोगटात राजूचं ‘पर्यावरण मित्र’ म्हणून नाव घोषित करण्यात आलं. त्याला स्टेजवर बोलावण्यात आलं. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मनोहर साने यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी देण्यात आली. बक्षीस स्वीकारल्यानंतर राजूने सगळय़ांना वाकून नमस्कार केला. त्याला स्टेजवरच थांबवलं. त्याला विचारलं, ‘‘आम्ही तुला थोडे प्रश्न विचारू. चालेल ना?’’
‘‘हो चालेल..’’
‘‘पर्यावरण म्हणजे काय, हे तू सांगू शकशील?’’
‘‘हो.. आपल्या सभोवताली जे दिसतं म्हणजे पशु-पक्षी, डोंगर, माती, नदी, सूर्य, झाडं, आपण.. सगळे मिळून तयार होतं पर्यावरण.
‘‘तू तर तसा लहान आहेस, पण झाडांकरिता तू नेमकं काय करतोस?’’
भाजी चिरून झाल्यावर टाकून द्यायचा जो भाग असतो, तसेच फळं खाल्ल्यावरही त्यांची सालं, ते सगळं मी आमच्या मावशींकडून बारीक चिरून घेतो. ते सगळं झाडांच्या मुळाशी टाकतो. आईने डाळ-तांदूळ किंवा भाजी धुतल्यावर जे पाणी उतरं, ते मी तिला पातेल्यात साठवायला सांगतो. तेच पाणी मी झाडांना घालतो. हे काम मी करू शकतो ना!
‘‘व्वा! ऐकलत ना मंडळी! एवढय़ाशा चिमुरडय़ाला केवढी जाण आहे! आणखी काय करतोस?’’
फळं खाल्ल्यावर सगळय़ा बिया धुऊन वाळवून ठेवतो. नंतर मातीत घालून त्याचे बॉल तयार करतो. आम्ही जेव्हा फिरायला जातो, तेव्हा बागेत, डोंगरात, जंगलात हे बॉल्स टाकतो. बियांचा प्रसार होतो.
हे तुला कसं कळलं?
वर्तमानपत्रात बातमी आली होती. यू – टय़ूबवरही होती. आईने मला सांगितली. मी बिया वापरून ग्रीटिंग कार्ड तयार करतो आणि ते मित्रांना, नातेवाईकांना देतो.
‘‘व्वा! छानच कल्पना आहे तुझी! आणखी काही?’’
‘‘सकाळी बागेत मी पक्ष्यांकरिता पाणी ठेवतो. पक्षी येऊन त्यात अंघोळ करतात. पाणी पितात अन् उडून जातात.’’ त्याचे ते निरागस बोल ऐकून सगळय़ांनी जोरात टाळय़ा वाजवल्या.
निवेदक म्हणाले, ‘‘खरंच राजूला मिळालेला पर्यावरण मित्र पुरस्कार अगदी योग्य आहे. इतरांनीही यातून शिकलं पाहिजे. पर्यावरण सुरक्षित राहिलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील.’’
कार्यक्रम संपल्यावर सगळे जण राजूचं कौतुक करत होते. त्या बालमनाला प्रश्न पडला होता की आपण एवढं मोठ्ठं काय केलं? पण एक खरं, सगळय़ांनी कौतुक केल्याने त्याला एकदम मस्त वाटत होतं. आजचा वाढदिवस त्याला आवडला होता, कायमचा लक्षात राहणार होता..
nandaharam2012 @gmail.com