आई घरी आली तेव्हा चिन्मय जमिनीवर पालथा पडून एकटक काही तरी खेळत होता. एका स्टुलाखाली त्यानं उशी ठेवली होती ज्यावर दोन स्केचपेन्स होते.
‘‘चिनू, काय करतोयेस?’’
‘‘माझ्या पेट्सबरोबर खेळतोय.’’
‘‘पेट्स? कुठाहेत?’’
‘‘हे काय! दोन स्नेक्स- एक ग्रीन आणि एक ब्लॅक.’’ चिन्मयने स्केचपेन्सकडे बोट दाखवलं.
‘‘बापरे! दुसरे कुठलेच पेट्स नाही का मिळाले?’’ आईला हसू आवरेना. पाच वर्षांच्या चिन्मयच्या विचारांची घोडदौड आईला नवीन नव्हती. चिन्मयला त्याच्या विचारांच्या दुनियेत सोडून आई कामाला लागली.
आणखी वाचा-बालमैफल: जागते रहो…
रात्रीचे दहा वाजून गेले होते. चिन्मय बिछान्यावरच बोटांशी खेळत ‘गंभीर’ विचार करत होता. दिवसभर कामामुळे बाबा आल्याक्षणी चिन्मयजवळ पहुडला आणि त्याला गाढ झोप लागली. आई सगळे दिवे मालवून खोलीत आली आणि तिने चिन्मयला कुशीत घेतलं.
‘‘आई, आपण पक्षी पाळायचा का?’’
‘‘का रे?’’
‘‘रोहनच्या घरी डॉग आहे, समायराकडे मनीमाऊ आहे… मलापण कोणतं तरी पेट पाळायचंय. मग मला घरीच एक फ्रेंड मिळेल नं!’’
‘‘कुठला पक्षी पाळायचाय?’’
‘‘क्रो?’’
‘‘ए, कावळा नाही पाळत कुणी घरी.’’
‘‘मग, आऊल?’’
‘‘घुबडसुद्धा नाही रे पाळत.’’
‘‘पोपट? आज आपण आपल्या खिडकीबाहेर पाहिला नं, एका फांदीवर बसून झोके घेत होता तसा.’’
‘‘पण पिंजऱ्यात तो झोके कसा घेईल बरं?’’
‘‘आपण स्विंग लावू त्याच्यासाठी.’’ चिन्मयकडे सगळी उत्तरं होती.
‘‘असं पोपटाला पकडून ठेवलेलं आवडेल तुला?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘आपण पोपटाला पिंजऱ्यात ठेवलं तर तो बाहेर जाऊ शकणार नाही. आज आपण बघितला तो पोपट कसा कुठेही उडत जाऊ शकतो. कुठल्याही झाडावर बसून झोके घेऊ शकतो. पेरूचं झाड दिसलं तर मटामटा पेरू खाऊ शकतो. मिरच्या दिसल्या तर त्या खाऊ शकतो. तुला त्या पोपटासारखं बांधून ठेवलं एका खोलीमध्ये तर आवडेल? ग्राऊंडवर जायचं नाही, शाळेत जायचं नाही, फ्रेंड्सबरोबर खेळायचं नाही… तुला किती बोअर होईल. तसंच त्या पोपटालाही बोअर होईल नं!’’
‘‘त्याला पिंजऱ्यात नाहीच ठेवायचंय. मी त्याच्यासाठी एक लाकडी घर बनवणार.’’
‘‘पण तिथून उडून गेला तर?’’
‘‘त्या घराला दारं-खिडक्या नसणार.’’
‘‘म्हणजे, तो पुन्हा अडकलाच की! त्यापेक्षा आपण त्याला पेट वगैरे नकोच करायला. आपण त्याला लांबूनच बघू. किती छान वाटलं आज त्याला आकाशात उडताना बघून. असू देत की त्याला एकदम फ्री.’’ आईचं म्हणणं ऐकून चिन्मय विचारात पडला.
‘‘आई, बरोबर आहे. तू मला शाळेत सोडतेस तेव्हा शाळा संपेपर्यंत तिथेच थांबून असतेस. मग पोपट एकटा पडेल.’’ चिन्मय थोड्या वेळाने म्हणाला. त्याचा समज होता की आई त्याची शाळा संपेपर्यंत गेटपाशी थांबलेली असते.
‘‘बाबापण ऑफिसला जातो. त्याचं वर्क-फ्रॉम-होम आता संपलंय. मग पोपटाची काळजी आपण कशी घेणार?’’ आईनेही री ओढली.
‘‘करेक्ट. ए, त्यापेक्षा पोपट नकोच.’’ चिन्मयने डिक्लेर केलं आणि आई निर्धास्त झाली.
आणखी वाचा-बालमैफल : ‘सहयोगा’चं नातं
बराच वेळ चिन्मय पुन्हा त्याच्या बोटांशी खेळत बसला. आज शाळेला हाफ-डे असल्यामुळे दुपारी त्याची छान झोप झाली होती. त्यामुळे आता त्याला लवकर झोप येत नव्हती. आईला मात्र झोप अनावर झाली होती. तिचा डोळा लागताच… ‘‘आई!’’ चिन्मयने आईचा चेहरा त्याच्याकडे वळवून घेतला. ‘‘आपण कुत्रा पाळायचा का? जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर… किंवा ते काका सकाळी घेऊन फिरतात तसा व्हाइट आणि ग्रे… कुठला गं?’’
‘‘सायबेर्रीयन…’’ बाबा एकदम म्हणाला. आईने दचकून पाहिलं तर तो झोपेत बोलत होता.
‘‘बघू. आमच्या घरातलीच भूभू इतकी मजा-मजा करतात… अजून कुठलं पेट कशाला पाहिजे,’’ म्हणत आई गाढ झोपी गेली. चिन्मय बराच वेळ त्याच्या बोटांशी खेळत राहिला.
एक दिवस चिन्मय घराच्या टेरेसवर खेळत असताना तिथे एक पोपट आला. आईने एका कुंडीमध्ये लावलेल्या मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या आल्या होत्या. त्या खायला तो आला असावा. पोपट चांगलाच माणसाळला होता. चिन्मयसुद्धा न घाबरता त्याच्याकडे एकटक बघत राहिला. पोपटासाठी आईने स्वयंपाकघरातून थोडे गाजराचे तुकडे आणले आणि तिच्या हातावर ठेवले. तसा तो पोपट टुणकन् उडी मारून आईच्या हातावर बसला आणि गाजर खाऊ लागला. चिन्मयला गंमत वाटली. धीर करून तोही पुढे सरसावला. तसं पोपट चिन्मयच्याही हातावर बसला, गाजर खाल्लं आणि चिन्मयच्या खांद्यापर्यंत चालत गेला. पुढे जवळपास आठवडाभर पोपट घरी येत राहिला- साधारण ठरलेल्या वेळी. मग शाळेत जाण्याआधी पोपटाला खाऊ घालण्याची चिन्मयलाही सवय लागली. चिन्मयला तो पोपट आता त्याचा हक्काचा ‘पेट’ वाटू लागला होता.
पण एकदा चिन्मय पोपटाला भरवत असताना तो पोपट मिरची तोंडात घेऊन टेरेसवर वाळत घातलेल्या चिन्मयच्या आवडत्या शर्टवर उडून बसला. खाता-खाता मिरचीचे कण त्या शर्टावर पडले. चिन्मयला ते फारसं रुचलं नाही. तो पोपटाला दुसरीकडे बसण्याची खूण करू लागला. पण पोपट काही हलेना.
‘‘चिन्मय, त्याला समजत नाहीये तू काय सांगतोयेस ते.’’
‘‘पण रोहनचा डॉग ऐकतो.’’
‘‘त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं.’’
‘‘पण त्या गोष्टीतल्या पोपटाला सगळं कळत होतं.’’
‘‘चिन्मय, तुला एक फ्रेंड म्हणून पेट हवा होता नं? पेट पाळायचा म्हणजे हे सगळं समजून घ्यावं लागतं. समायराच्या मांजरानेही तिचा एक मोजा फाडला होता, आठवतंय? ती कुरकुरली का?’’ आईने समजावलं तसं चिन्मयने मान डोलावली. पण त्याचा पेट पाळण्याचा उत्साह आता संपून गेला होता. तसंही त्यानंतर पोपटाचं चिन्मयच्या घरी येणं बंद झालं. चिन्मयसुद्धा ‘पेट’ पाळण्याचा विषय विसरून गेला…
असाच एकदा चिन्मय खिडकीवर लावलेल्या भिरभिऱ्याकडे एकटक बघत विचार करत होता. वाऱ्याची एखादी झुळूक आली की भिरभिरं छान फिरायचं.
‘‘आई, हे कित्ती फास्ट फिरतंय बघ.’’ आई स्वयंपाकघरातून आली तसं चिन्मयने भिरभिरं दाखवलं.
‘‘त्याचे रंग किती सुंदर दिसताहेत.’’
‘‘आई, आपण घरी ‘विंडमिल’ आणायची का?’’ आजोळी अहमदनगरला जाताना, डोंगरमाथ्यावर फिरताना दिसणाऱ्या पवनचक्क्या पाहायला चिन्मयला खूप आवडायचं.
आणखी वाचा-बालमैफल : एक व्रात्य मुलगा
‘‘पवनचक्की? एवढी मोठाली? आयडिया छान आहे. फक्त आपलं घर डोंगरावर न्यावं लागेल इतकंच.’’
‘‘ईझी-पीझी. अख्खी बिल्डिंगच उचलून न्यायची जेसीबीने.’’ चिन्मयकडे सगळ्याचंच सोल्युशन होतं.
‘‘हा बघ, आला मोठ्ठाल्ला जेसीबी घरी…’’ दोघांचा संवाद ऐकून बाबाने चिन्मयला उंच उचललं. कॉल संपवून तो नुकताच तिथे आला होता. चिन्मयला एकदम मज्जा वाटली.
‘‘येऊ द्या तो जेसीबी एकदाचा खाली आणि विचारांची भरारीसुद्धा. ग्राऊंडवर जायचंय आपल्याला.’’ आई गंमतीने म्हणाली आणि तिघे खळखळून हसले.
mokashiprachi@gmail.com
रंगांचा वाद
एकदा रंगामध्ये झाला वाद श्रेष्ठत्वाचा
जो तो म्हणू लागला मीच महत्त्वाचा
हिरवा म्हणे, धरतीवर मी आहे सगळीकडे
माझ्यामुळे हिरवेगार गवत आणि झाडे
निळा म्हणे, मी आहे शांत आणि सुंदर
समुद्र आणि आकाश माझे आहे मैतर
पिवळा म्हणे, मी आवडता सूर्याचा
अग्नीलाही माझा रंग, मी आहे तेजाचा
केशरी रंग म्हणे, मी प्रतीक त्यागाचे
संन्यासी व हिंदू धर्माच्या अभिमानाचे
गुलाबी रंग म्हणे, मी प्रतीक सौंदर्याचे
गुलाबी ओठ, गाल व सुंदर गुलाबाचे
जांभळा म्हणे, मी राजेशाही आहे माझी शान
जांभळ्या वांग्यावर देठाचा मुकुट दिसे छान
सारे रंग पांढऱ्या रंगावर हसू लागले
रंगहीन म्हणून त्याला हिणवू लागले
पांढरा मात्र होता शांत
म्हणाला, तुम्ही सारे तर माझाच अंश
तुम्ही सारेच महत्त्वाचे निसर्गाने निर्मिलेले
तुम्हा साऱ्यांमुळे धरतीवर सौंदर्य फुले
पांढऱ्या रंगातून जेव्हा सुंदर इंद्रधनू उलगडले
साऱ्याच रंगांना पांढऱ्या रंगाचे महत्त्व समजले.
-ज्योती पुरोहित
© The Indian Express (P) Ltd