कोडिंगचं कोडं : कोडिंग का शिकायचं?

मागच्या भागात आपण गेम्स, मीडिया प्लेअर, पेंट, वर्ड या सॉफ्टवेअर्सचा उल्लेख केला होता.

मागच्या भागात आपण गेम्स, मीडिया प्लेअर, पेंट, वर्ड या सॉफ्टवेअर्सचा उल्लेख केला होता. कम्प्युटर सॉफ्टवेअर्स म्हणजे एखादं ठरावीक काम करण्याची कम्प्युटरमध्ये असलेली सोय. बाहेरगावच्या ट्रेनचं ऑनलाइन रिझव्‍‌र्हेशन करायला आपण जी वेबसाइट वापरतो, तशा वेबसाइट्स म्हणजे पण एका प्रकारचे सॉफ्टवेअर्स. आणि फक्त कम्प्युटर कशाला, मोबाइल फोनमधली अ‍ॅप्स् म्हणजेसुद्धा आणखी एका प्रकारची सॉफ्टवेअर्सच असतात.

गेम खेळताना अमुक एक बटण दाबलं की अमुक एक अ‍ॅक्शन कर, एखादं टार्गेट पार केलं की स्कोअर वाढवून दाखव. पेंट वापरताना रंग ओतला की कर्सर (cursor), म्हणजेच माऊसचा पॉइंटर ज्या भागात आहे तो भाग निवडलेल्या रंगाने भरून टाक. ट्रेनच्या नंबरवर क्लिक केलं की त्या ट्रेनचं वेळापत्रक दाखव. हे सगळं असं करायचं ते त्या सॉफ्टवेअर्सना कसं कळतं? तर ते काम प्रोग्रामिंगचं- म्हणजेच कोडिंगचं. वेगवेगळ्या कमांड्सपासून हे प्रोग्राम्स बनलेले असतात. या कमांड्ससाठी लागणारं प्रोग्रामिंग कोण्या एखाद्या व्यक्तीने केलेलं असतं. एकदा का प्रोग्राम लिहून झाला की त्यानुसार ते सॉफ्टवेअर वागत असतं नि आपण सांगितलेल्या गोष्टी करतं.

सॉफ्टवेअर्सचा आपल्या भोवती इतका सुळसुळाट असला तरी प्रोग्रामिंगबद्दल आपल्याला विशेष माहिती नसते. कारण आपण तयार सॉफ्टवेअर्स वापरत असतो. मी नववीच्या सुट्टीत जेव्हा पहिल्यांदा कम्प्युटर शिकले ना, तेव्हा काही मोजक्याच कंपन्यांमधे, काही ठरावीक कामांपुरताच कम्प्युटरचा वापर असायचा. त्यामुळे कम्प्युटर शिकायचं म्हणजे प्रोग्रामिंग शिकणंच असायचं.

त्यानंतर कम्प्युटर जसजसे आकाराने छोटे, किमतीने स्वस्त, वापरायला सोपे होत गेले तसा त्यांचा वापर वाढला. आपल्या रोजच्या वापरासाठी, करमणुकीसाठी तसेच वेगवेगळ्या ऑफिसेस मधल्या वेगवेगळ्या कामांसाठी, सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाली. मग कम्प्युटर शिकायचं म्हणजे आपल्या व्यवसायाशी संबंधित सॉफ्टवेअर्स कशी वापरायची हेच शिकलं जाऊ लागलं. उदाहरणार्थ, आर्किटेक्ट्स किंवा सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअर्सनी टेक्निकल ड्रॉइंग्स काढण्यासाठी ऑटोकॅड (AutoCAD) शिकायचं, कॉमर्स स्टुडंट्सनी टॅली (Tally) शिकायचं, इत्यादी. यामुळे प्रोग्रामिंग मागे पडलं. आता कम्प्युटरचं स्वरूप बदलतंय. डेस्कटॉप, लॅपटॉप, याखेरीज स्मार्टफोन्स, टॅबलेट पी. सी., हेसुद्धा कम्प्युटरची काही कामं करायला वापरले जाऊ  शकतात. फोनवरून आपण इमेल / व्हीडिओ कॉल करू शकतो. मी हे लिहिते आहे, तेसुद्धा माझा आयपॅड (iPad) वापरून. टी.व्ही., वॉशिंग मशीनसारखी यंत्रपण आपण काही प्रमाणात प्रोग्राम करू शकतो. प्रोग्राम्स, प्रोग्राम करता येणारी यंत्र नि त्यांचा वापर करणारे, यांची संख्या जशी वाढत जाणार, तशी प्रत्येक यंत्राच्या, प्रत्येक वापरकर्त्यांच्या गरजेनुसार लागणाऱ्या सॉफ्टवेअर्सची संख्या वाढत जाणार.

सॉफ्टवेअर्सच्या या वाढीव गरजेला तोंड द्यायला यापुढे येऊ  घातलेली सॉफ्टवेअर्स ही कस्टमायझेबल (customizable) असतील. कस्टमायझेबल म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअरमधे काही विशिष्ट गोष्टी करण्याची सोय आधीच असेल नि त्याव्यतिरिक्त आणखी काही गोष्टी करण्याची सोय तुम्ही स्वत: तुमच्या गरजेप्रमाणे त्यात करू शकाल. आत्ताही काही सॉफ्टवेअर्स तशीच आहेत. टॅली या सॉफ्टवेअरचं उदाहरण घेतलं, तर अकाऊंटिंगची मूळ कामं करण्याच्या सोयी त्यात आहेत, पण त्या माहितीवर आधारित एखादा रिपोर्ट एखाद्या सी.ए.ला एखाद्या विशिष्ट स्वरूपात पाहिजे असेल, तर तो ते स्वत:च बनवून घेऊ  शकतात. या अशा कस्टमायझेबल सॉफ्टवेअर्सच्या वापरासाठी आपल्याला पुन्हा प्रोग्रामिंग शिकण्याकडे वळावं लागेल. प्रोग्रामिंगमध्ये अगदी तज्ज्ञ नाही, तरी त्यातील जुजबी ज्ञान असणं सगळ्यांनाच पुढे आपापल्या क्षेत्रात फायद्याचं ठरेल.

अपर्णा मोडक sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Benefits of learning coding