न्यायनिष्ठ भरत

रफार वर्षांपूर्वीची गोष्ट! रानात काही मुलं खेळत होती. त्यांचा चोर-शिपाई हा खेळ सुरू झाला. त्यातील एक मुलगा चोर झाला.

रफार वर्षांपूर्वीची गोष्ट! रानात काही मुलं खेळत होती. त्यांचा चोर-शिपाई हा खेळ सुरू झाला. त्यातील एक मुलगा चोर झाला. दुसरा मुलगा कोतवाल बनला. चोराला पकडण्याचं काम कोतवालावर आलं. एका मोठय़ा शिळेवर एक मुलगा न्यायाधीश म्हणून बसला.
lr31चोर निघाला, त्यानं लुटुपुटुची चोरी केली. कोतवालानं त्याला पकडून आणलं आणि न्यायाधीशासमोर उभं केलं.
न्यायाधीश झालेल्या मुलानं त्यांना दोन बाजूंना उभं केलं. खटला सुरू झाला.
‘‘काय रे, तू कसली चोरी केलीस?’’ न्यायाधीशानं चोराला विचारलं.
‘‘न्यायाधीश महाराज, मी एक गरीब मुलगा आहे. माझ्या घरी खायला काही नव्हतं. भुकेनं जीव कासावीस होत होता. तेव्हा मी फक्त एका सांजेला पुरेल इतकंच भिक्षान्न चोरलं.’’
‘‘पण, तू चोरी केलीस हे खरं ना?’’
‘‘हो.’’
‘‘मग तुला शिक्षा व्हायलाच हवी.’’
‘‘द्या, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या.’’
‘‘कोतवाल, तुमचं काय म्हणणं आहे?’’
‘‘याला शिक्षा व्हायलाच हवी.’’
‘‘कारण?’’
‘‘हेतू काहीही असो; पण यानं गुन्हा केलेला आहे आणि गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे.’’
‘‘ठीक आहे. पण याला शिक्षा घडण्यापूर्वी आपण सगळेच शिक्षा भोगू या.’’ न्यायाधीश झालेला मुलगा म्हणाला.
‘‘का म्हणून?’’ कोतवालानं विचारलं.
‘‘कारण या मुलानं भुकेसाठी चोरी केली. हा उपाशी आहे. आणि एक मुलगा भुकेला असताना इतरांनी पोटभर जेवणं हासुद्धा गुन्हाच आहे. म्हणून आपण सगळेच गुन्हेगार आहोत. हा गुन्हा करायला प्रवृत्त झाला याला कारण आपण आहोत. हा त्याच्यावर अन्याय आहे. प्रथम आपण शिक्षा भोगू, तीसुद्धा कडक; आणि नंतरच त्याला शिक्षा देऊ.’’
‘‘वा! उत्तम! सुंदर न्याय!’’
सगळ्या मुलांनी वळून पाहिलं. समोरच्या व्यक्तीकडे बघितलं आणि त्या मुलांच्या लक्षात आलं की, ते अवंती नरेश श्रीचक्रधर महाराज आहेत. त्यांनी महाराजांना आधी बघितलेलं होतं. मुलांनी महाराजांना पटापटा मुजरे केले.
‘‘बाळ, समोर ये. काय नाव तुझं?’’ त्यांनी न्यायाधीश झालेल्या मुलाला विचारलं.
‘‘माझं नाव भरत. मी पुष्करच्या रत्नाप्पा रंगाऱ्याचा मुलगा.’’
‘‘बाळ, तुमचा चोर-शिपायाचा खेळ पाहिला मी. तू न्यायाधीशाचं काम फार सुरेख केलंस. तू माझ्याबरोबर राजधानीला चलतोस का?’’
‘‘नको महाराज. माझं गरीबाचं पुष्करच बरं. बाबाला कामाला मदत करतो. दुपारी गुरंढोरं घेऊन रानात येतो. इथे झऱ्यात मनसोक्त डुंबतो. आणि आम्ही सारे झाडामाडांवर चढतो. सोबती जमून न्याहारी करतो. झऱ्याचं गोड पाणी पितो. झाडाची पिकली फळं तोडून खातो. इथे खूप मजेत आहे मी.’’
‘‘अरे, पण राजधानीत गंमत नाही हे कोणी सांगितलं तुला?’’
‘‘राजधानीत मोठय़ा हवेल्या आहेत. हवेल्यांमध्ये श्रीमंत माणसं राहतात. राजवाडय़ामध्ये राजपुत्र, राजकन्यांना काही कामच नसतं. नुसतं खायचं, प्यायचं. अशी रानातली मजा काही तुमच्या राजधानीला नाही की तुमच्या वाडय़ात नाही. नको रे बाबा ती राजधानी. आमचं आपलं लहान गाव बरं.’’
‘‘ठीक आहे, नको येऊस,’’ असं म्हणून महाराज घोडय़ाला टाच मारून निघून गेले.
भरतच्या भोवती त्याचे सवंगडी गोळा झाले.
‘‘भरत, तू महाराजांना असं उत्तर द्यायला नको होतं.’’ एकजण म्हणाला.
‘‘चांगली संधी आली होती राजधानीला जायची, हुकवलीस तू.’’ दुसरा म्हणाला.
‘‘चला रे, सायंकाळ झाली, परतूया घराला.’’ सगळे म्हणाले. त्यांनी शीळ घालून आपली गुरं गोळा केली आणि टेकडी उतरून ते आपापल्या घरांकडे परतले.
अवंती नरेश राजधानीत आले. त्यांना सतत त्या न्याय देणाऱ्या मुलाचा चेहरा दिसत होता. किती सुंदर न्याय दिला होता त्यानं! आजवर कोणी दिला नसेल असा न्याय! त्या मुलाला आणावा राजधानीत. इतकं लहान त्याचं वय; पण बुद्धिमत्ता केवढी! थोरामोठय़ांना सुचणार नाहीत इतके प्रगल्भ त्याचे विचार!
आणि महाराजांनी आपल्या सेवकांना भरतला बोलावून आणण्यासाठी त्याच्या गावी धाडलं. राजसेवक पुष्कर गावी आले. सकाळची शांत वेळ! घोडय़ांच्या टापांचा आवाज ऐकून घराघरांतून लोक डोकावू लागले. राजसेवक रत्नाप्पाच्या घराशी येऊन थांबले. रत्नाप्पाचं कुटुंब भयभीत झालं. काय झालं? राजसेवक का आले असतील? आपल्या हातून काय गुन्हा घडला? साऱ्यांच्या मनात हेच प्रश्न!
‘‘रत्नाप्पा रंगारी कोण आहे?’’ एका राजसेवकानं विचारलं.
‘‘मी.’’ रत्नाप्पा पुढे आला.
‘‘आम्ही राजधानीहून आलो आहोत. महाराजांनी आपल्यासाठी खलिता पाठवला आहे.’’
रत्नाप्पानं भीत भीत खलिता उघडला आणि.. आणि वाचता वाचता त्याचा चेहरा आनंदानं फुलून गेला. खलित्यात महाराजांनी लिहिलं होतं. ‘‘आपला मुलगा भरत यास राजधानीला पाठवावे.. त्याच्या न्यायपद्धतीवर आम्ही खूश आहोत. त्याला मुख्य न्यायाधीशांसोबत ठेवण्याचा आमचा मानस आहे.’’
खलिता वाचून रत्नाप्पाला फार आनंद झाला. राजदरबारी आपल्या मुलाला आमंत्रण आलं म्हणून तो खूप आनंदला. त्यानं आपल्या घरात ती आनंदवार्ता सांगितली. सगळे जण खूश झाले, पण खूश नव्हता एकटा भरत. त्याला आपलं सुखी, समाधानी जीवन सोडून जाण्याचं जिवावर आलं होतं. पण पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी त्याला राजसेवकांबरोबर जाणं भाग होतं.
तो राजधानीत येऊन पोहोचला. राजानं त्याला मुख्य न्यायाधीश विश्वकेतू यांच्याकडे सुपूर्द करून सांगितलं, ‘‘तुमच्या पश्चात हा भरत राज्याचा न्यायाधीश होईल. त्याला तुमच्या हाताखाली धडे द्या.’’
न्यायाधीशाला मनातून राजाचा राग आला. कारण त्याला त्याच्या पश्चात स्वत:च्या मुलाला न्यायाधीश बनवायचं होतं. पण राजाज्ञेपुढे त्याला काही बोलता आलं नाही. प्रथमदर्शनीच त्याला भरताचा संताप आला अन् त्याच क्षणापासून तो त्याचा द्वेष करू लागला. पण त्यानं तसं दर्शविलं नाही.
भरत राजधानीत राहिला. हळूहळू तो तेथील जीवनाशी एकरूप होऊ लागला. काही काही प्रसंगी राजा त्याला न्यायदानाचं काम देई. कधी कधी तर मुख्य न्यायाधीशाच्या न्यायनिवाडय़ापेक्षा भरतचा निवाडा श्रेष्ठ ठरे. मुख्य न्यायाधीशाचा मनातल्या मनात जळफळाट होई, पण हात चोळत बसण्यापलीकडे तो काही करू शकत नसे. हळूहळू ही गोष्ट भरतच्या लक्षात येऊ लागली. न्यायाधीश आपल्याला पाण्यात पाहतो, आपल्यावर जळफळतो असं त्याच्या लक्षात आलं.
बरीच र्वष निघून गेली. एकदा एका खटल्यात न्यायाधीशाचा मुलगा प्रभंजन अडकला. गोष्ट अशी घडली.. न्यायाधीशाच्या शेजारी हिरामण नावाचा गृहस्थ राहत होता. त्याचं बरंच खिल्लार होतं. तसंच त्याचा एक तबेला होता. त्याच्या तबेल्यात बरेच घोडे होते.
एकदा प्रभंजनला काही महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या नगराला जायचं होतं. नगर लांब होतं. संध्याकाळची वेळ झालेली होती. हाताशी वाहन नव्हतं. त्यानं ठरवलं, की हिरामणचा एक घोडा रात्रीपुरता भाडय़ानं मागावा. पण त्याच्या लक्षात आलं की, हिरामण आपला घोडा आपल्याला भाडय़ानं देणार नाही; कारण चार दिवसांपूर्वीच त्याच्या पित्याचं हिरामणशी कडाक्याचं भांडण झालं होतं. आता काय करावं? प्रभंजननं ठरवलं, रात्री सामसूम झाली की हिरामणच्या तबेल्यात जायचं, घोडा घ्यायचा, दौड मारायची अन् काम झाल्यावर पहाटेला घोडा पुन्हा तबेल्यात आणून ठेवायचा. एक वेळ त्याला वाटलं, ही चोरी होईल का? पण आपण तर घोडा आणून ठेवणार आहोत. पळवून, विकून थोडीच टाकणार आहोत? मनाशी असा निश्चय करून प्रभंजन रात्री उठला. हिरामणच्या तबेल्यात गेला. त्यानं घोडा घेतला. घोडय़ानं थोडी धुसफुस केली, पण प्रभंजनची मांड पक्की होती. प्रभंजननं घोडय़ाला टाच दिली. घोडा वायूच्या गतीनं पळू लागला. प्रभंजन आपल्या नियोजित स्थळी पोहोचला. त्याला आपल्या एका गरीब नातलगाला पैशाची मदत करावयाची होती. त्यानं स्वत: जमविलेले पैसे घेतले होते. काम झाल्यावर तो हिरामणच्या तबेल्याशी आला. घोडा आता तबेल्यात बांधणार, तोच त्याला हातात दिवटी घेतलेला हिरामण दिसला. हिरामणनं प्रभंजनला पाहिलं आणि त्यानं त्याच्यावर चित्त्यासारखी झेप घेतली. प्रभंजनवर त्यानं घोडा चोरल्याचा आरोप ठेवला. प्रभंजननं त्याला परोपरीनं समजावून सांगितलं की आपण घोडा चोरलेला नाही. काल न विचारता नेलेला घोडा बांधून ठेवायला आल्याचं त्यानं हिरामणला विनयानं सांगितलं. पण हिरामणनं त्यावर विश्वास ठेवला नाही. हिरामणनं प्रभंजनला न्यायालयात खेचलं. न्यायदानाचं काम सुरू झालं.
न्यायालयात खूप गर्दी जमली होती. प्रत्यक्ष मुख्य न्यायाधीशाचा मुलगा आरोपी होता. न्यायाधीश महाराज काय न्याय देणार याची लोकांना उत्सुकता होती. पण राजानं आज न्यायदानाचं काम भरतवर सोपवलं. न्यायाधीश विश्वकेतू मनात समजून चुकला, की फासे आज विरुद्ध पडणार! भरत आपल्या मुलाला कठोर शिक्षा देणार! कारण आजपर्यंत आपण त्याच्याशी जे वर्तन केलं ते दुष्टबुद्धीचं होतं. तो आज बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्यक्ष न्यायदानाच्या कामाला सुरुवात झाली. भरतनं आरोपी, फिर्यादी दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि न्याय दिला की, प्रभंजन निर्दोष आहे. त्यानं घोडा चोरलेला नाही. लोकांनी खटल्याचा निकाल ऐकला. न्यायदरबार बरखास्त झाला.
न्यायाधीश महाराज आश्चर्यचकित झाले. त्यांचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसेना. हे अघटित झालंच कसं? बदला घेण्याची एवढी मोठी संधी भरतनं सोडलीच कशी? ते भरतजवळ गेले आणि म्हणाले, ‘भरत, मला वाटलं होतं, तू माझ्या मुलाला कठोर शिक्षा ठोठावणार! पण तू त्याला निर्दोष सोडलंस, हे कसं काय?’
भरत नम्रपणे म्हणाला, ‘न्यायाधीश महाराज, मी आरोपी, फिर्यादीचा निर्णय करण्याकरिता न्यायासनावर बसलो होतो, माझ्या स्वत:च्या न्यायाचा विचार करण्याकरिता नव्हे.’
न्यायाधीशानं भरतला पोटाशी धरलं. म्हणाले, ‘बाळ, तुझी न्यायबुद्धी खरंच थोर आहे. महाराजांची तुझ्याबद्दलची निवड खरोखरच योग्य आहे. मी महाराजांना सांगून या न्यायदानाच्या कार्यातून आता मुक्त होणार आहे! तुझ्यासारख्या न्यायाधीशाची जनतेला गरज आहे.’
..आणि भरत अवंतीचा मुख्य न्यायाधीश झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bharat fond of justice

Next Story
मोर
ताज्या बातम्या