संघचारी टिटवी अर्थात Sociable lapwing (Vanellus gregarius) हा पक्षी नावाप्रमाणेच एक सामाजिक पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव फारच अर्थपूर्ण आहे. Vanellus म्हणजे टिटवी आणि gregarious म्हणजे lok26घोळक्याने राहणारी. ही मुख्यत: थव्याने राहण्याच्या प्रवृत्तीमुळे ओळखली जाते. १७७१ साली पालास या शास्त्रज्ञाने याचे नामकरण केले.
हा पक्षी दक्षिण मध्य रशिया आणि कझाकस्तान येथील विस्तीर्ण माळरानावरचा रहिवासी आहे. या माळरानावरील छोटे-मोठे तलाव, त्यांच्या आजूबाजूचे माळ ही यांची आवडती वसतिस्थाने आहेत. यांची सोबत सैगा नावाची हरणे आणि मेंढपाळ करतात. या विस्तीर्ण माळरानावर राहणाऱ्या सैगा हरिणांचा आणि टिटव्या यांच्यात सहसंबंध आहे, असे म्हटले जाते. ही सैगा हरणे जिथून मोठय़ा प्रमाणात स्थलांतर करतात, तेथे या टिटव्यांना योग्य असा अधिवास तयार होतो. हरिणांनी माळरान तुडवल्यामुळे व तेथील गवत चरल्यामुळे गवताची उंची कमी होते व त्यामुळे तेथे खुरटे गवत व हरिणांची विष्टा राहते. या सर्व गोष्टी अनेक कीटकांना आकर्षित करतात आणि हे कीटकच या टिटव्यांचे मुख्य अन्न आहे. याबरोबरच कोळी, गोगलगाई, कालव, गवताच्या बिया, छोटी पाने, फुले इत्यादींचा समावेश यांच्या खाद्यात असल्याची नोंद आहे.
मे ते ऑगस्ट हा या टिटव्यांचा प्रजननाचा काळ असतो. सैगा हरिणांच्या स्थलांतरामुळे तयार झालेला अधिवास यांच्या प्रजननासाठी उत्तम असतो. अशा अधिवासात मादी जमिनीवर बनविलेल्या छोटय़ाशा खळग्यात छोटे छोटे दगड ठेवून त्यावर गवत घालून घरटे बनविते. या घरटय़ात ती ३ ते ५ अंडी घालते. ही अंडी जमिनीच्या रंगाशी खूप मिळतीजुळती असल्याने सहज दिसून येत नाहीत. सुमारे २८-३० दिवसांनी या अंडय़ांतून पिल्ले बाहेर पडतात.
सप्टेंबरच्या शेवटी यांचे थवे स्थलांतरासाठी सज्ज होतात. मध्य आशियाच्या गवताळ माळरानावरून यांचे थवे मध्य पूर्वेतील देश पार करून ईशान्य आफ्रिकेत जातात. यातील काही थवे भारतीय उपखंडातील भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात येतात. भारतात यांची नोंद काश्मीर, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळ मध्ये झाली आहे. महाराष्ट्रात हा पक्षी १८६२ -१९०० सालच्या दरम्यान धुळे, जालना, अहमदनगर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी आणि सातारा येथे सहजपणे दिसत असल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर मात्र ही टिटवी दिसल्याच्या नोंदी फारशा नाहीत. २००० साली हा पक्षी पुण्यातील मुळा-मुठा नदीवर, तर २००१ साली नागपूर येथे दिसल्याच्या नोंदी आहेत. १९६०च्या दशकापासून यांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाली. २००६च्या गणनेनुसार यांची संख्या ६००-१८०० इतकी असावी, असे मानले जात असे. त्यामुळे या पक्ष्यांना आता अतिसंकटग्रस्तांच्या यादीत टाकण्यात आले आहे. नंतरच्या दोन वर्षांत सीरिया येथे १५०० आणि तुर्कस्तान येथे ३२०० पक्षी पाहिले गेले आहेत. यामुळे या पक्ष्याला संकटग्रस्त यादीत ठेवले जावे, असा प्रस्ताव आहे.
या टिटवीला तिच्या वसतिस्थानात धोका आहे तो खोकड, पोलकॅट, हेजहॉग या शिकारी प्राण्यांकडून. तसेच मेंढपाळांच्या मेंढय़ा आणि सैगा हरिणांकडून यांची अंडी व पिल्ले तुडविली जातात, पण ही नैसर्गिक कारणे आहेत. परंतु या टिटवीला मुख्य धोका आहे तो तिच्या वसतिस्थानाचा विकासाच्या नावाखाली होणारा नाश. कीटकांपासून गवत वाचविण्यासाठी त्यावर होणारा कीटकनाशकांचा वारेमाप वापर आणि स्थलांतरादरम्यान सीरिया आणि इराक येथे यांची मोठय़ा प्रमाणात होणारी शिकार. अशा शिकारी दरम्यान या टिटव्यांचे थवेच्या थवे मारले जातात. या टिटवीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मध्य रशिया आणि कझाकस्तान येथे यांची वसतिस्थाने वाचविण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे. पण या मोहिमेचे फलित सीरिया आणि इराक येथील जनजागृतीवर अवलंबून आहे. पण सध्या या देशातील सामाजिक आणि राजकीय स्थिती अस्थिर असल्याने हिच्या संवर्धनाची वाट खूप बिकट बनली आहे. भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमध्ये या टिटवीच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची शक्यता आहे.
(छायाचित्र सौजन्य : धैवत हाथी)

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut Prakash ambedkar
मविआचा वंचितबरोबरच्या युतीचा पोपट मेलाय? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
raigad lok sabha seat marathi news, bjp ncp raigad lok sabha seat marathi news, raigad lok sabha marathi news, ncp ajit pawar sunil tatkare raigad lok sabha seat marathi news,
रायगडवरून अजित पवार – तटकरे आक्रमक, भाजपला सुनावले
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?