पोटलीबाबा : शीऽऽऽ इ इ इ!

पुस्तक जापनीज् आणि इंग्रजीतून असलं तरी त्याने काही फरक पडत नाही. कारण तो चित्रांतून बोलतो.

cartoonist Taro Gomi Book
cartoonist Taro Gomi Book

श्रीनिवास बाळकृष्ण shriba29@gmail.com

‘‘आता सक्काळी सक्काळी हा विषय कशाला?’’

‘‘मित्रा, पण  विषय सकाळचाच आहे ना रे!’’

शहरी मराठी मुलखात असे ‘शी-शू’चे विषयच काय, पण हे शब्दही चारचौघांत बोलणं म्हणजे काहीतरी गलिच्छ वाटतं. म्हणून इथं त्या क्रियांना इंग्रजी शब्द देऊन मोकळे होतात. ते चालतं. आमच्या गावाकडं नाही हो असा खोटेपणा.. आणि जगातही नाही. म्हणून तर ४५ वर्षांपूर्वी जगाच्या एका टोकाला असलेल्या जपानमधून ‘एव्हरीवन पुप्स’ हे पुस्तक प्रकाशित झालं.. आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला- म्हणजे अमेरिकेत पोहोचलं. तिथून पुन्हा इंग्रजीत प्रकाशित होऊन जगभर वाचलं गेलं.

टारो गोमी या जपानी चित्रकथा लेखकाने हे पुस्तक केलं. त्याने अशा ‘शी’ विषयावर पुस्तक का केलं असेल? बहुतेक त्यांच्या घरीही या विषयावर बोलणं टाळत असतील का?

माहीत नाही. या पुस्तकात कुठलीही कथा नाही. निवडक प्राणी, पक्षी, मासे आणि माणूस असा प्रत्येक जण कसा शी करतो, त्याचे दर्शन म्हणजे हे पुस्तक. सर्वजण का शी करतात? कारण सिम्पल आहे, सर्व जण खातात म्हणून. अशा सोप्या थीमवर सोपी चित्रं त्याने काढलीत. जे कधी कधी आपण अ‍ॅनिमल प्लॅनेटवर पाहतो. ज्यांच्याकडे फिशटॅन्क आहे ते माशांच्या शेपटातून निघालेली लांब दोरी पाहू शकतात. कुत्रा पाळलाय त्यांनी त्याचे शीचे नखरे सांभाळलेले असतात. घरी लहान मुलं असतील त्यांनी डायपर बरबटलेले पाहिले असतील.  अशी आपण पाहिलेली आणि बरीच न पाहिलेली दृश्ये टारो गोमी आपल्यासाठी उघड करतो.

हे ही वाचा : पोटलीबाबा : फ्रेंच मिसळपावची गोष्ट !

हे ही वाचा : पोटलीबाबा : पोटातले मासे

पुस्तक जापनीज् आणि इंग्रजीतून असलं तरी त्याने काही फरक पडत नाही. कारण तो चित्रांतून बोलतो. टारो दोन गोष्टींसाठी जगप्रसिद्ध आहे. एक म्हणजे ‘लिटिल शिप’, ‘लिटिल प्लेन’, ‘बस स्टॉप’, ‘ओव्हर द ओशन’ अशी मुलांसाठी सोपी आणि कल्पक पुस्तकं तयार करण्यासाठी; आणि दुसरं तो पोटलीबाबाचा खासम् खास मित्र आहे.

त्याच्या कथा साध्याच विषयांभोवती असतात आणि त्यातलं चित्रही साधं-सोपंच असतं. बाल गटासाठी चित्रं काढताना तो खूप कमी आकार काढतो. सोपे, सुटे त्रिकोण, चौकोन, गोल असे आकार, सरळ रेषा एकत्र केल्यासारखे. त्या आकाराला काळ्या रंगाची खूपच जाड बॉर्डर देतो. आणि मग आत प्लेन रंग भरतो. बहुतेक डिजिटल! ‘एव्हरीवन पुप्स’सारख्या किशोर-कुमार वयासाठी वेगळी शैली वापरतो. प्राण्यांच्या फोटोवरून चित्रांत पुसट पेन्सिलने आकार काढत असावा. त्याचे प्राण्यापक्ष्यांचे आकार फोटोत असतात तसे फार डिटेल (तपशील) नसतात. उगाच शेडिंग करता येतंय म्हणून शायिनग मारायला केलं, असं नाहीच. यात प्लेन वॉटर कलर भरून बॅकग्राउंडदेखील मस्त वेगळ्या प्लेन रंगाने रंगवतो. त्यात भिंत, वस्तू, झाड, डोंगर, सूर्य असे काही दाखवत नाही. इतकं केलं की झालं चित्र!

असे साधे, सोपे, सहज आकार काढण्या-रंगवण्यामागे त्याचा उद्देश केवळ विषय समजावा, उगाच चित्रप्रेमात पडू नये, हा असावा; की वाचणाऱ्याला आपणही अशी चित्रं काढू शकतो असा विश्वास यायला?

तसं असेल तर आपल्याला असे विषय शोधले पाहिजेत. असे विषय- जे सर्व जण करतात, पण त्याविषयी बोलत मात्र कुणीच नाही. जसं की- सर्व जण पादतात!

सर्व जण हसतात!

सर्व जण झोपतात! सर्व जण.. करा करा.. विचार करा. एक भन्नाट विषय निवडून त्याची प्राणी, पक्षी, कीटक, मासे, भुतं, माणूस अशी लिस्ट करा. माहीत नसेल तर पालकांना विचारा. पुस्तकं पाहा. नेटवर सर्च करा. १०-१२ पानांवर ती सोप्या पद्धतीने काढा. सोबत दिलेल्या दोनपैकी एका सोप्या पद्धतीने सर्व रंगवा. म्हणजे टारो गोमीसारखे तुम्हीही पोटलीबाबाचे मित्र होऊन प्रसिद्ध व्हाल.

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book by japanese cartoonist taro gomi zws

Next Story
बालमैफल: तू इथंच राहा..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी