महिन्याचा शेवटचा रविवार कधी येतोय याची अथर्व अगदी उत्सुकतेने वाट बघत असतो. कारण तेव्हा त्याची आत्या आणि पियू त्यांच्याकडे येतात. आत्या एका कॉलेजमध्ये इतिहास शिकवत असल्यामुळे तिच्याकडून इतिहासातल्या गमतीजमती त्याला ऐकायला मिळतात आणि पियू दिवसभर त्याच्यामागे ‘दादा-दादा’ करत त्याचं सगळं ऐकते म्हणून त्या दोघी आल्या की तो विशेष खूश असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेवटी एकदाचा रविवार उजाडला आणि आत्या पियूला घेऊन आली. दुपारी अथर्व पियूला पत्त्यांचा बंगला करून दाखवत होता. हळूच जपून एकेक मजला चढवताना अथर्व अगदी एकाग्र झाला होता आणि त्याची करामत बघताना पियू रंगून गेली होती. तेवढय़ात गॅलरीतून वाऱ्याची झुळूक आली आणि बंगला भुईसपाट झाला. अथर्व आणि पियूचे हिरमुसलेले चेहरे बघून आजोबांनी सगळे पत्ते गोळा केले आणि मस्तपैकी पत्ते पिसून कात्री केली! पियू तर बघतच राहिली!

‘भिकार-सावकार’ खेळूया का? आजोबांनी विचारलं. बंगल्याची पडझड विसरून दोघांनीही हा प्रस्ताव आनंदाने मान्य केला! पत्ते खेळता खेळता पियू तिथेच झोपून गेली म्हणून आत्या तिच्याजवळ येऊन बसली. मग आजीही आली आणि चौघे मिळून मेंढीकोट खेळायला लागले.

आजी म्हणाली, ‘बरं का अथर्व, तुझा बाबा आणि आत्या लहान होते ना, तेव्हा सुट्टीत त्यांचे मित्र-मैत्रिणी, चुलत-मावस भावंडं सगळे एकत्र जमायचे. मग मेंढीकोट, लॅडीज, चॅलेंज, बदामसात काय काय खेळायचे! धमाल असायची सगळी!’

आजोबा म्हणाले, ‘आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही वाडय़ातली मुलं मिळून सुट्टीत बऱ्याचदा पत्त्यांचा डाव मांडायचो. त्यामुळे जजमेंट, निर्णयक्षमता आणि हार-जीत पचवण्याची तयारी अशा सगळ्याच गोष्टींचा कसही लागायचा.’’

आपण आत्ता खेळत असलेला खेळ आपल्या बाबानेपण लहनपणी खेळलाय आणि आजोबांनीसुद्धा खेळलाय याची अथर्वला गंमत वाटली!

‘‘म्हणजे पत्त्यांचा खेळ इतका जुना आहे?’’ त्याने विचारलं.

आत्या म्हणाली, ‘‘अरे आजोबाच काय, पण त्यांच्याही आधीच्या कित्येक पिढय़ा हा खेळ खेळल्या असतील! कारण पत्त्यांचा शोध नवव्या शतकात लागला होता. असं म्हणतात की पत्त्यांचा शोध चीनमध्ये लागला आणि नंतर हा खेळ भारतात आला. भारत आणि पर्शियामध्ये पूर्वी प्रचलित असलेला ‘गंजिफा’ हा खेळही काहीसा याच प्रकारातला म्हणता येईल. आता एका पॅकमध्ये जशी ५२ पानं असतात तशी पूर्वी ३२ पानं असायची म्हणे! शिवाय हाताने रंगवलेले पत्तेही असत. अमेरिकेने पत्त्यांमध्ये ‘जोकर’ या पानाची भर घातली. आधी ‘राजा’ हेच पत्त्यातलं सर्वश्रेष्ठ पान मानलं जायचं. मग साधारण पंधराव्या शतकाच्या शेवटी ‘एक्का’ हेही कधी कधी सर्वोच्च पान मानलं जायला लागलं. आताच्या पत्त्यांवर कसं राजा असेल तर  ‘ङ’, राणी असेल तर ‘द’ वगैरे वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंना लिहिलेलं असतं, तसं पूर्वी नसायचं. म्हणजे ते फक्त एकाच बाजूला लिहिलेलं असे. त्यामुळे कार्ड्स हातात लावून घेताना एखाद्याकडे कुठले पत्ते असतील याचा दुसऱ्याला थोडासा अंदाज येऊ  शकायचा. मग सतराव्या शतकात ‘रिव्हर्सिबल कार्डस’ म्हणजे वर आणि खाली दोन्ही बाजूंना ‘५ं’४ी’ असलेली कार्ड्स वापरात आली.’’

अथर्वला हे सगळं ऐकायला आवडत होतं. तेवढय़ात आजोबांनी विचारलं, ‘‘पत्ते आपण खेळतो त्याच आकाराचे होते का गं? का मोठे-लहान होते?’’

आत्या म्हणाली, ‘‘पत्त्यांचा पूर्वीचा आकार आणि आत्ताचा आकार यात नक्कीच फरक आहे. शिवाय पूर्वी पत्त्यांच्या कडा शार्प असायच्या. त्यामुळे कोपरे दुमडून पानं लवकर खराब व्हायची, उलटय़ा बाजूने ओळखता यायची. नंतरच्या काळात कडांचा शार्पनेस कमी केल्यामुळे पत्त्यांचा टिकाऊपणा वाढला. शिवाय पूर्वी काही ठिकाणी पत्त्यांची मागची बाजू कोरी असायची. मग तिथे लिहिलं जाऊ  नये, खुणा केल्या जाऊ  नयेत म्हणून मागच्या बाजूलाही चित्रं किंवा जाहिराती आल्या. वेगवेगळ्या देशांमध्ये पत्त्यांवरची चिन्हंसुद्धा वेगवेगळी असत. अजूनही असतात.

‘‘म्हणजे सगळीकडे बदाम, किलवर, इस्पिक, चौकट असंच नसतं का?’’ अथर्वने विचारल्यावर आत्या नकारार्थी मान हलवत म्हणाली, ‘‘हा फ्रेंच पॅटर्न आहे. काही देशांमध्ये कप्स, कॉइन्स, स्वॉर्डस अशीही चिन्हं वापरली जातात. शिवाय सगळीकडे ५२ पानंच असतात असं नाही. ३८, ४०, ४८ पानंही असतात!’’

मेंढीकोटची पानं तशीच हातात धरून या सगळ्या गप्पा चालल्या होत्या. तेवढय़ात पियू उठल्यामुळे आत्या आणि अथर्व तिच्याशी बोलायला लागले. आजी उठून चहा करायला गेली. आजोबांनी मात्र सगळ्या मेंढय़ा आणि त्यांचे कोट एकत्र करून खोक्यात ठेवले!

anjalicoolkarni@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cards game
First published on: 13-03-2016 at 01:02 IST