scorecardresearch

कार्यरत चिमुकले.. : वेळ, ऊर्जेची बचत

थोडा वेगळा विचार, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि इच्छाशक्ती यामुळे ऊर्जेची, वेळेची बचत होत आहे आणि हवेचे प्रदूषण कमी होत आहे.

carpooling from school students
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

अदिती देवधर

नेहा आणि यतीनच्या वर्गाची उद्या सहल जाणार आहे. पहाटे ठीक ६ वाजता शाळेत पोहोचायचं आहे. नेहमीची शाळेची बस नसल्यानं नेहाची आई दोघांना कारनं सोडणार होती. येताना यतीनचे बाबा त्यांना घेऊन येणार होते.

इतर वर्गमित्र आणि मैत्रिणींनाही त्यांचे आई-बाबा किंवा ताई-दादा सोडायला येणार होते. प्रत्येकाला सोडायला एक वाहन त्यामुळे नेहाला आठवलं की, मागच्या वर्षीच्या सहलीला शाळेच्या आवारात खूप गर्दी झाली होती.

तिची वर्गमैत्रिण नीताची सोसायटी त्यांच्या शाळेत जायच्या रस्त्यावरच आहे. नेहाला कल्पना सुचली. आईला विचारून तिनं नीताला फोन केला. दुसऱ्या दिवशी पहाटे तिघे निघाले. रस्त्यात नीताला त्यांनी कारमध्ये घेतलं. काल ठरल्याप्रमाणे ती सोसायटीच्या फाटकाजवळ तयारच होती.

Car- pooling केल्यामुळे तीन मुलांसाठी तीन वाहनं असं झालं नाही. शाळेत एकत्र जाताना, तिघे मस्त गाण्यांच्या भेंडय़ा खेळत होते. तो आनंद तर काही वेगळाच होता. वर्गातल्या इतरांनाही नेहाची कल्पना आवडली. याच वर्षी त्यांना कॉम्प्युटरच्या तासाला एक्सेल वापरून तक्ते कसे करायचे ते शिकवलं होतं. यतीन, नेहा आणि नीतानं वर्गातील सगळय़ांचे नाव-पत्ते गोळा करून तक्ता तयार केला. गूगल मॅपच्या मदतीनं त्यांनी  Car- pooling साठी नकाशा तयार केला.

शाळेची सहल, स्नेह-संमेलन, स्पर्धेसाठी दुसऱ्या शाळेत जायचं असेल किंवा जादा तासासाठी शाळेत यायचं असेल तर आता हा नकाशा वापरला जातो. प्रत्येक कारमधून एकऐवजी आता तीन मुलं प्रवास करतात. हाच नकाशा वापरून मुलं कधी एकत्र रिक्षानेसुद्धा जातात. एकच्या ऐवजी तिघे असल्यानं आई-वडिलांनाही काळजी नाही. एकमेकांना निरोप देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रयोगाबद्दल पालकसभेत सांगितलं आणि मुलांचं खूप कौतुक केलं. बाकी वर्गामध्येही हे सुरू झालं आहे. नेहा आणि यतीननं सुरू केलेला हा उपक्रम संपदा आणि यशच्या शाळेतही पोहोचला.

थोडा वेगळा विचार, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि इच्छाशक्ती यामुळे ऊर्जेची, वेळेची बचत होत आहे आणि हवेचे प्रदूषण कमी होत आहे.

aditideodhar2017@gmail.com

आठवडा

रविवारी नसते ना शाळा

तरी सूर्य का उगवतो ?

रोज रोज उठण्याचा

तो का बरं त्रास  देतो !

तो उगवला की मला

आई उठवते ओरडून

उठलंच पाहिजे काहो

तो उगवला म्हणून !

एक दिवस नको ना उगवू

करतो ८ दिवसांचा आठवडा

नाही तरी सात वारांना

उगाचच म्हणतो आठवडा !

          –     नरेश महाजन

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 01:02 IST