लाल लाल ‘शेजवान राईस आणि चिकन लॉलीपॉप’ कोणाकोणाला आवडतं? अं हं, मी आत्ता कुठल्याही चायनीज गाडीवर हे खात नाहीये, पण या पदार्थाचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं. त्यात लॉलीपॉप डार्क लाल रंगाचं आहे म्हणून पाहायलाही आवडतं. हेच चिकन लॉलीपॉप पांढरं असतं तर तितकीशी मजा आली नसती, असं वाटतं. या चायनीज गाडय़ांवर काम करणारी गोरीपान व बारीक डोळ्यांची मुलं ही त्या पदार्थाप्रमाणेच ‘चायनीज’ नसतात, तर सिक्किम, पूर्वाचल, नेपाळ, तिबेट या भागांतील असतात. याच भागात एक भित्तिचित्रांची व कपडय़ावरची, लाकडावरची कला टिकून आहे. आणि चिकन लॉलीपॉप व शेजवान चटणीसारखी दिसायलाही चटपटीत आहे. तसेच भडक रंग, त्यावरील बारीक नक्षी पाहायला, वापरायला एकदम आकर्षक वाटून जाते.

या चित्रात आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्राणी दिसतो तो म्हणजे ड्रॅगन, सिंह आणि वाघ!

याच प्रदेशातील ड्रॅगन डान्स आपण पहिला असेलच किंवा ‘चिंटू- १’ या चित्रपटात ड्रॅगन पहिला असेलच. जुन्या बौद्ध मठ किंवा बौद्ध मंदिरांत असणाऱ्या या चित्रप्रकाराला थांका, थानका, तिबेटियन चित्र असं काहीही म्हणतात. तिबेट देश हा खूप मोठा देश होता. मग तो ‘चीन’ झाला. आता तिबेट खूप छोटा देश आहे आणि चिनी आक्रमणामुळे पूर्व भारतात चीनला त्रासलेले तिबेटी राहतात. हिमाचल प्रदेशातील मक्लोडगंज या भागात तुम्हाला थांका चित्रशैली जवळून बघता येईल. तशा वाघ, ड्रॅगनची नक्षी असणारे, प्रिंट असणारे कपडे, कागदी (रोल) चित्रं, लाकडी वस्तूंवरील कोरीव काम पाहायला मिळेल. रेशमी कापडावर, शालीवर, कार्पेटवर ही चित्रं असतात. आता कागदावरही मिळतात. हिमाचल प्रदेशात अशा प्रकारची चित्रं शिकविणारी केंद्रंदेखील आहेत.

या चित्रांतील रेषा व आकार काढण्याची स्टाइलदेखील खूप अलंकारिक! म्हणजे खूपच डेकोरेटिव्ह आकार काढायचा. इथे फोटोत दिसतंय तसं. ड्रॅगन या काल्पनिक प्राण्यासारखा काल्पनिक आकार! रंग पण भडक व एकसारखेच! पण त्यामुळे चित्रात एक प्रकारची लय येते. पुन:पुन्हा तोच आकार वापरल्याने आकारांचे रिपिटेशन झाल्याने नक्षीचा अनुभव येतो.

आपले डोळे चित्रभर आपोआप फिरतात. तिबेटियन लोकांची हीच लय त्यांच्या डान्समध्येही दिसते. चित्रातील हे प्राणी छान नाचतात. (म्हणजे मुखवटे घालून माणसंच नाचतात.)

इथे वाघाच्या अंगावरील पट्टे, ड्रॅगनच्या अंगावरील खवले पाहून छान वाटतं, पण खऱ्या वाघावर असे पट्टे नसणार, हेदेखील कळतं.

म्हणजे चीनमध्ये चायनीज भेळ नावाचा कुठलाही खाद्यपदार्थ मिळत नाही हे आपल्याला माहीत असतं तसं!

आजचा सराव, जवळच्या चायनीज गाडीवर जाणं आणि खाण्याची कुठलीही ऑर्डर न देता, तिथल्या मेन्यूकार्ड किंवा फलकावर असणाऱ्या ड्रॅगनचा आकार नीट पाहणं. ते शक्य नसेल तर गुगलवरून या प्रकारातली खूप चित्रं पाहा व काळ्या जेल किंवा मार्करने आपल्या दंडावर किंवा मित्राच्या दंडावर ‘थानका शैलीतील’ वाघ किंवा ड्रॅगन काढून त्याचा फोटो आम्हाला पाठवा.

shreeniwas@chitrapatang.in