चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. करंज, उक्शी, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरते; ते झाड म्हणजे ‘बहावा’. पिवळ्याधम्मक फुलांच्या लडींनी भरलेले बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहावा, सदाहरित तसेच वर्षांवनात आढळणारी पानझडीची भारतीय वनस्पती. Cassia Fistulal (कॅसिया फिस्टुला) हे त्याचे शास्त्रीय नाव. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. त्याची उंची साधारणपणे ४० फुटांपर्यंत असू शकते. बहाव्याच्या खोडाचा रंग पांढरट असतो. बहाव्याला पिवळ्या रंगाची फुले येतात. प्रत्येक फुलाला ५ पाकळ्या असतात. फुलांचे घोस झाडावर अशा प्रकारे लटकलेले असतात की, जमिनीकडे झुकलेले ते फुलांचे घोस जणू पिवळ्या रंगाचे झुंबर झाडाला लटकावे तसे ते दिसतात.  म्हणून त्याला इंग्रजीमध्ये  ॅ’ीिल्ल २ँ६ी१ ३१ी  असे म्हणतात. फुलांच्या गुच्छांत कळ्या आणि फुले असे दोन्ही पाहायला मिळतात. या फुलांच्या पाकळ्या वाळवून त्यापासून पिवळा रंग तयार करता येतो. या पाकळ्यांना मंद सुगंध असतो. दिवसा कदाचित तुम्हाला बहाव्याच्या झाडाखाली गेलात तर फुलांचा सुगंध येणार नाही, पण रात्री बहाव्याच्या झाडाखाली गेलात तर फुलांचा मंद सुगंध मंत्रमुग्ध करतो. याचा पिवळा रंग मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतो. याच्या सुंदर पिवळ्या फुलांमुळे याची शोभेची वनस्पती म्हणून लागवड केली जाते.

दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना विशेष लोकप्रियता लाभली आहे. तिकडे या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. त्याला ‘कणिपू’ असे म्हणतात. ‘विशूच्या’ सणाला घरातील ज्येष्ठ व्यक्ती सर्व सौभाग्य व संपत्तीच्या गोष्टींची आरास करतात त्यात बहाव्याची फुलेदेखील असतात. घरातील प्रत्येकाने झोपेतून उठताना डोळे उडताना ही आरास पाहिली की त्याचे संपूर्ण वर्ष सोन्यासारखे भरभराटीचे जाते अशी त्यामागे श्रद्धा आहे. केरळ या राज्याचे राज्यफूल ‘बहावा’ असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटदेखील काढले आहे.

बहाव्याच्या पानांचा रंग गडद हिरवा असून ती संयुक्त प्रकारची असतात. बहाव्याला ३-८ पर्णिकेच्या जोडय़ा असतात. हा पानगळीचा वृक्ष असल्यामुळे साधारण फेब्रुवारीपासून पानगळीला सुरुवात होते. या पानांचा वेगवेगळ्या औषधांत वापर केला जातो. त्वचाविकारावर बहाव्याची पाने अत्यंत गुणकारी असून भाजल्यामुळे होणाऱ्या जखमेवरदेखील यांचा वापर होतो. कोरडा खोकला तसेच ताप यावरदेखील ही पाने औषधी म्हणून वापरतात. कॉमन इमिगंट्र नावाचे फुलपाखरू बहाव्याच्या पानावर अंडी घालते. त्याचा सुरवंट या झाडाची पाने खाऊन आपली उपजीविका चालवतो. बहावा ही कॉमन इमिग्रंट या फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे.

बहाव्याची फुले गळून पडली की, साधारण पावसाळ्याच्या दरम्यान बहाव्याला शेंगा येतात. या शेंगाची लांबी साधारण शेवग्याच्या शेंगाइतकी असून त्या गुळगुळीत नि दोन्ही टोकांना गोलाकार असतात. या शेंगा कोवळ्या असताना त्यांचा रंग हिरवागार असतो. पानांमध्ये त्या लगेच दिसून येत नाहीत. पक्व झाल्या की त्यांचा रंग चॉकलेटी होतो. या शेंगामध्ये बिया असतात. त्यांचा आकार बदामासारखा असून बिया चकचकीत असतात. बहाव्याच्या शेंगेमध्ये पिवळसर चिकट डिंक/ गम असतो. तो गोड लागतो. माकडांना तो फार आवडतो म्हणूनच कदाचित त्या शेंगांना ‘बंदरलाठी’ असेदेखील म्हणतात. तो डिंक/ गम बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे.

बहाव्याच्या पक्व शेंगेतून बिया काढून ठेवल्या नाहीत, तर त्यांना लवकर टोस (एक प्रकारचा कीटक) लागतो. बियांचे आवरण खूप कडक असते. त्यामुळे रुजवण्याआधी बियांवर प्रक्रिया करावी लागते. बहाव्याच्या नवीन रोपांची निर्मिती बियांपासून होते. बियांचे आवरण कडक असल्यामुळे ती जमिनीवर घासली असता गरम होते. त्वचेवर ती घासून टेकवली असता चटका लागतो. गावाकडील खोडकर मुलांचा हा आवडता खेळ. बहाव्याची पक्व शेंग खुळखुळ्यासारखी वाजवता येते.

बहाव्याची साल आणि मुळंदेखील औषधात वापरली जातात. सर्दीमुळे वाहणाऱ्या नाकाला बहाव्याच्या मुळाची धुरी दिली असता तात्काळ फरक पडतो. बहाव्याची मुळेदेखील तापावर गुणकारी आहेत.

बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुच्र्या बनविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तसेच सरपणासाठीदेखील हे लाकूड वापरले जाते.

संपूर्ण फुललेला बहाव्याचा वृक्ष पाहाणे म्हणजे निसर्गातील अद्भुत घटनेचे साक्षीदार होणे. सध्या बहावा फुललेला आहे. मी खात्रीने सांगतो की, जेव्हा तुम्ही बहाव्याचा फुलोरा पाहाल तेव्हा या झाडाच्या प्रेमातच पडाल आणि या पावसाळ्यात बहाव्याचे एक तरी रोप आपल्या सोसायटीमध्ये, शाळेच्या आवारात, घराच्या आवारात, शेताच्या बांधावर लावण्यासाठी घरातील मोठय़ा मंडळींकडे हट्ट धराल हे नक्कीच.

bharatgodambe@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cassia fistula flower colorful flowers
First published on: 09-04-2017 at 00:22 IST