मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा

डिसेंबर महिना सुरू झाला आणि सगळीकडे हळूहळू ख्रिसमसचे (नाताळ) वातावरण तयार होऊ लागले. बाजारातील, रस्त्यावरील दुकाने ख्रिसमससाठी लागणाऱ्या साहित्यांनी ओसंडून वाहू लागली. वेगवेगळय़ा प्रकारच्या दिव्यांच्या माळा झगमगत लटकल्या होत्या. ‘ख्रिसमस ट्री’चे छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत अनेक प्रकार सजवून ठेवले होते. किती तरी वेगवेगळय़ा डिझाईन्सचे ‘स्टार्स’ वाऱ्याबरोबर झुलताना दिसत होते. एका मोठय़ा स्टारमध्ये मधोमध चक्क ‘जिझस’ , ‘मदर मेरी’ आणि ‘जोजेफ’ यांचे चित्र गोलगोल फिरताना दिसत होते. नाताळचा ‘गोठा’ (क्रिब) करण्यासाठी लागणाऱ्या सगळय़ा प्रकारच्या लहान-मोठय़ा मूर्ती तेथे मांडलेल्या होत्या. शाळेतून येताना स्कूल बसच्या खिडकीतून ती दुकाने पाहण्यासाठी मार्क, जिमी व त्यांचे मित्र यांची झुंबड उडायची.

sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
bengaluru water crisis similar to Cape town
Water Crisis: बंगळुरूमध्ये केपटाऊनपेक्षाही भीषण जलसंकट? कारणीभूत कोण?
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Thane, Traffic Police Implement, Traffic Changes, Ghodbunder Road, Metro Line Construction, marathi news,
मेट्रो कामांमुळे घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतुक बदल

प्रत्येक वर्षी काही तरी नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी असायच्याच. मग आधी घेतलेल्या वस्तू जुन्या वाटायच्या. मार्क व जिमी मग आई-बाबांच्या मागे लागून नव्या गोष्टीतील काही तरी वस्तू घरी घेऊन येत. या वर्षीही काय घ्यावे त्याचा मार्क विचार करत होता.जिमी त्याचा जानी दोस्त होता. दोघेही नेहमी एकत्र असत. शाळेत जाताना सोबत असतच, पण घरीदेखील दोघं एकत्र खेळत असत. दोघांची घरे जवळ जवळच होती. इतकंच कशाला, आता ख्रिसमसची सजावट करायलासुद्धा ते एकमेकांच्या घरी मदत करायला जात असत.

‘‘जिमी, तू कधी येशील आमच्या घरी? सजावटीचे सगळे सामान काढून पाहू या. सगळे बरोबर आहे की नाही ते.’’ मार्कनं विचारलं.
‘‘तू सांग मला त्या दिवशी मी येईन मार्क.’’ जिमी म्हणाला.
‘‘बरं मग उद्या येशील? आपल्याला उद्या सुट्टी आहे ना!’’ मार्कनं सांगितलं.
‘‘हो, चालेल.’’ जिमीनं आश्वासन दिलं.
दुसऱ्या दिवशी दोघांनी मिळून मार्कच्या घरच्या सजावटीला सुरुवात केली. आधी ख्रिसमस ट्री लावून घेतला. त्यावर छोटय़ा छोटय़ा चांदण्या लावल्या. मग बाळ येशूच्या जन्माचा देखावा (क्रिब) तयार करायला घेतला. त्यामध्ये असणाऱ्या उंटाची मान तुटली होती. ती फेव्हिकॉल लावून चिकटवायचा प्रयत्न केला, पण ती काही एकजागी राहातच नव्हती.
‘‘आई, आपल्याला उंट नवीन आणावा लागेल..’’ मार्कनं जाहीर केलं.
‘‘दुसरं सगळं सामान बरोबर आहे का बघ बरं जरा जिमी.’’ आईनं विचारलं.‘‘बघतो काकू.. हे येशू बाळ, मदर मेरी आणि जोजेफ, तीन राजे (तीन ज्ञानी पुरुष, जे आकाशात तेजस्वी तारा पाहून बाळ येशूला भेटायला निघतात.) त्यांचे उंट आणि गोठय़ातल्या गाई नि वासरे. आणि हो, एक राहिले- देवदूतपण आहे. म्हणजे एक उंटच आणावा लागेल..’’ जिमीनं सगळं पाहून घेतलं.
‘‘जिमी, ख्रिसमस नाइटला ‘सांन्ताक्लॉज’ (ख्रिसमसबाबा) येईल. तू या वर्षी काय मागणार त्याच्याकडे?’’ मार्कनं उत्साहानं विचारलं.
‘‘या वर्षी काही नको मला..’’ जिमी दु:खी होऊन म्हणाला.
‘‘का रे? तुला का नको काही? मी तर या वर्षी मोठी स्पोर्ट्स कार मागणार आहे. माझी आधीची मोडली आहे ना! तुझीसुद्धा जुनी झाली आहे ना?’’ मार्क म्हणाला.
‘‘आमच्याकडे या वर्षी ख्रिसमस होणार नाही.’’ जिमी दु:खी स्वरात म्हणाला आणि निघून गेला.
‘‘आई, असा काय हा जिमी, काही नको म्हणतो. नेहमी आम्ही सारखेच काही तरी मागतो ना ख्रिसमसबाबाकडे?’’ मार्कनं आईकडे तक्रार केली.
‘‘अरे मार्क, बरोबर आहे त्याचं. त्याचे बाबा गेले ना मागच्या वर्षी.. त्यांना वाईट वाटत असेल सगळय़ांना.. म्हणून तो दु:खी आहे.’’ आईनं मार्कला समजावलं.
‘‘मग मीपण मागणार नाही काही या वर्षी.’’ मार्क तोंड पाडून म्हणाला.
‘‘त्यापेक्षा आपण असं करू या का? जिमीनं काही मागितलं नाही, पण ख्रिसमस आहे म्हणजे त्यांचाही सण आनंदात जायला हवा ना! तू असं कर मार्क, ख्रिसमसबाबाला जिमीच्या नावानं एक चिठ्ठी लिही. म्हणजे सांताक्लॉज त्यालापण गिफ्ट देईल.. हो की नाही?’’
‘‘गुड आयडिया आई! तसंच करू.’’ मार्क एकदम खूश झाला. ‘‘पण मी चिठ्ठी लिहिल्यावर सांताक्लॉजला जिमीचं घर सापडेल ना आई ?’’ त्याला प्रश्न पडला.
‘‘अरे, ख्रिसमसबाबांना सगळय़ा लहान मुलांची घरं माहीत असतात.’’ आईनं सांगितलं. त्यानंतर मार्कनेच जिमीच्या घरी जाऊन ‘स्टार’ लावला आणि छोटासा गोठाही केला. जसजसं ख्रिसमसचे दिवस जवळ आले तसे सगळीकडे उत्साहाचं वातावरण तयार झालं. ‘ख्रिसमस ईव्ह’ला मार्क व त्याच्या सगळय़ा मित्रांनी सांताक्लॉजला चिठ्ठय़ा लिहिल्या आणि मोज्यामध्ये घालून आपल्या आपल्या घराच्या गच्चीत लटकावून ठेवलं. मार्कनं दोन मोजे ठेवले. एक त्याचा आणि दुसरा जिमीचा.
ख्रिसमसचा दिवस उजाडला. सगळय़ाच मुलांना आपले ‘गिफ्ट’ सान्ताक्लॉजबाबांनी ठेवलंय की नाही त्याची उत्सुकता होती. प्रत्येक जण उठल्याबरोबर आपले मोजे पाहायला धावले. मार्कही धावत-धावतच गच्चीत गेला. तेथे त्याचं गिफ्ट ठेवलं होतं. लगेच त्यानं ते उघडून पाहिलं. त्यात त्यानं लिहिलेली स्पोर्ट्स कार होती. त्याचबरोबर एक उंटही होता. तो खूप खूश झाला.
‘‘आई.. आई, बघ मला ख्रिसमसबाबानं काय दिलं.’’ मार्कनं जोरजोरात ओरडून आईला बोलावलं.
‘‘अरे व्वा! मज्जा आहे एका माणसाची..! ‘हॅप्पी ख्रिसमस मार्क.’ आईनं त्याला शुभेच्छा दिल्या.
‘‘आई, मी जिमीकडे जाऊन येऊ का? पाहतो ख्रिसमसबाबा तेथे पोहोचला का?’’ मार्कनं विचारलं.
‘‘हो.. जा जाऊन ये.’’ आईनं परवानगी दिली.
मार्क तसाच धावत-धावत जिमीकडे पोहोचला. त्यांच्या घराचे दार बंद होतं. त्याला आश्चर्य वाटलं, अजून जिमी उठला नाही? त्यानं बेल दाबली. जिमीनंच दरवाजा उघडला.
‘‘जिमी, ख्रिसमसबाबा आले नाहीत तुझ्या घरी?’’ मार्कनं विचारलं.
‘‘अरे पण मी काही मागितलेच नव्हते. मग कशाला येईल ख्रिसमसबाबा?’’ जिमी म्हणाला. तेवढय़ात त्याचं लक्ष गॅलरीच्या कोपऱ्याकडे गेलं. पाहतो तो काय! तेथे मोठा गिफ्ट बॉक्स ठेवला होता.
‘‘मार्क, हे बघ.’’ जिमी तेथे धावला. दोघांनाही खूप आनंद झाला. मार्कच्या गिफ्टपेक्षाही मोठा बॉक्स होता.
‘‘चल पाहू या का आत काय आहे ते.’’ मार्कलाही उत्सुकता लागली होती. मग दोघांनी मिळून तो बॉक्स उघडला. त्यामध्ये मार्कसारखीच, पण दुसऱ्या रंगाची स्पोर्ट्स कार होती. एका बॉक्समध्ये मिठाई आणि फराळ होता. दुसऱ्या बॉक्समध्ये ख्रिसमस केक होता.
‘‘अरेच्चा! काल आईनं असाच केक आमच्या घरी बनवला होता.’’ मार्क आश्चर्यानं म्हणाल.
जिमी मात्र ते सगळं पाहून खूप खूश झाला होता. दोघेही मित्र परत मार्कच्या घरी त्याची कार बघायला आले.
‘‘आई, तुला माहीत आहे का, ख्रिसमसबाबांनी फक्त कारच नाही तर मिठाई आणि केकपण दिला जिमीला.’’ मार्कनं सांगितलं.
‘‘मग मी सांगत होते ना, सांताक्लॉज सगळय़ा लहान मुलांना ओळखतो.’’ आई हसत हसत म्हणाली.
‘‘हुर्रेऽऽ थॅंक यू सांताबाबा..’’ दोघेही ओरडले आणि दोघांनीही एकमेकांना विश केले- ‘हॅपी ख्रिसमस’..
matildadsilva50 @yahoo.co.in