शर्यत

सर्व मामे-मावस भावंडे आजी-आजोबांकडे जमली होती. शाळेच्या गॅदरिंगमध्ये कुणाकुणाला कुठल्या स्पर्धेत बक्षिसे मिळाली, यावर गप्पा रंगल्या होत्या.

सर्व मामे-मावस भावंडे आजी-आजोबांकडे जमली होती. शाळेच्या गॅदरिंगमध्ये कुणाकुणाला कुठल्या स्पर्धेत बक्षिसे मिळाली, यावर गप्पा रंगल्या होत्या. जयला धावण्यात पहिले बक्षीस, तर मल्हारला चित्रकलेत. चार्वीला सुंदर हस्ताक्षरात. मधुराला निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले होते. प्रत्येक जण आपल्याच बक्षिसाचे bal02महत्त्व इतरांपेक्षा कसे जास्त आहे, ते पटवण्याचा प्रयत्न करीत होता. हळूहळू गप्पांचे रूपांतर भांडणात होतेय हे पाहून आजोबा त्यांच्यात जाऊन बसले आणि म्हणाले, ‘‘अरे दुपारचे सगळे झोपलेत ना? किती मोठय़ा आवाजात बोलताय? मला सांगा, तुम्हा सर्वाना बक्षिसे मिळालीत ना?  मग आनंदाची गोष्ट आहे की! तुम्ही वेगवेगळ्या विषयांत छान कामगिरी केलीत म्हणून तर बक्षीस मिळाले ना! त्यामुळे कुणाचे बक्षीस कमी किंवा अधिक महत्त्वाचे म्हणण्यात काय अर्थ आहे?’’
मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आजोबा म्हणाले, ‘‘तुमच्या या भांडणावरून मला एक गोष्ट आठवलीय, ऐकणार का?’’
गोष्ट म्हटल्यावर सर्वाचा कोरस आला.. ‘हो.’
‘‘ही गोष्ट आहे फार पूर्वी जंगलात राहणारे ससा, मासा आणि पोपट या जिवलग मित्रांची. जंगलात तळ्याच्या काठावरच्या पेरूच्या झाडावर पोपट येई, तर झाडाखाली ससा आणि तिथेच काठाशी मासा एकत्र येऊन रोज तासन्तास एकमेकांशी गप्पा मारीत. पण त्यांच्या गप्पांचा, खरं तर त्यांच्या मैत्रीचाच झाडाच्या ढोलीतील दुष्ट घुबडाला त्रास होई. एकदा त्याने त्यांची मैत्री तोडण्याच्या हेतूने एक कट रचला. तिघांशी गप्पा मारण्याचा बहाणा करून ते घुबड तिघांजवळ गेले आणि म्हणाले, ‘‘किती छान मैत्री आहे रे तुमची. रोज भेटता तेव्हा गप्पांत अगदी रंगून जाता तिघे. पण रोज रोज नुसत्या गप्पांपेक्षा काहीतरी वेगळे करा की!’’
‘‘म्हणजे काय करायचे घुबडकाका?’’ पोपटाने विचारले.
‘‘अरे, म्हणजे आपापसात कधी खेळ तर कधी शर्यत वगैरे ठेवा ना.’’ घुबडाने सुचवले.
‘‘म्हणजे नक्की काय करू?’’ सशाने गोंधळून विचारले.
घुबड खुशीत येऊन म्हणाले, ‘‘मीच सांगू म्हणता! बरं.. ऐका तर मग. उद्या आपण एक शर्यत ठेवू, म्हणजे एक प्रकारचा खेळच हं.. मजा वाटेल तुम्हाला. तेव्हा उद्या नक्की या.’’
दुसऱ्या दिवशी तिघे मित्र उत्साहाने जमले. मासा म्हणाला, ‘‘हं घुबडकाका, आता आम्ही काय करायचे सांगा?’’
तिघा मित्रांचा भाबडेपणा पाहून घुबडाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पण चेहऱ्यावर तसे न दाखवता ते म्हणाले, ‘‘समोर ते आंब्याचे झाड दिसतेय ना, तुम्ही जमिनीवरून धावत जाऊन त्या झाडाला हात लावून परत यायचे. जो पहिला येईल त्याला माझ्याकडून बक्षीस.’’
घुबडाने धावायला सांगताच फक्त ससाच धावू शकला. पोपटाला वेगाने चालणे जमेना आणि मासा तर बिचारा दुसऱ्या मिनिटालाच घाबराघुबरा होऊन पाण्यात शिरला. ससा झाडाला हात लावून विजयी चेहऱ्याने परतला, आणि पाहतो तर काय त्याचे दोस्त पोपट आणि मासा तोंड लहान करून त्याची वाट पाहात होते. कारण त्यांनी शर्यतीत आधीच माघार घेतली होती. कावेबाज घुबडाने पोपट आणि माशाची टर उडवत त्यांच्यासमोर सशाचे जरा जास्तच कौतुक केले. अर्थातच ससाही जरा जास्तच फुशारून गेला. दुष्ट घुबड मनातल्या मनात हसत तिथून निघून गेले. पण त्याचा हा लबाड कावा समोरील झाडावरच्या म्हाताऱ्या माकडाने ओळखला होता. दुसऱ्या दिवशी त्याने तीनही मित्रांना एकत्र बोलावले आणि त्यांना म्हणाल, ‘‘बाळांनो, काल मी तुमची शर्यत पाहिली बरं का! त्यात पहिला आला म्हणून आधी सशाचे अभिनंदन करतो पण..’’
‘पण काय वानरकाका?’ सशाने उत्सुकतेने विचारले.
  ‘समजा, आज मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तिघांनी उडत उडत आंब्याच्या झाडाकडे जाऊन या. किंवा उद्या पाण्यातून पोहत पोहत समोरच्या काठावरच्या झाडाला हात लावून या; तर अशा शर्यतीत कोण पहिला येईल सांगा पाहू.?’
 ‘‘मला उडता येते तेव्हा उडण्याच्या शर्यतीत माझा पहिला नंबर येईल.’’ पोपट आनंदाने ओरडला.
‘‘आणि मला छान पोहता येते तेव्हा पोहण्याच्या शर्यतीत मीच जिंकणार.’’ मासा खुशीत म्हणाला.
ससा मात्र तोंड लहान करून गप्प बसला.
तिघांकडे बघत माकड म्हणाले, ‘‘अरे, या जगातील प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या  विषयात हुशार, तरबेज असतो. त्यामुळे काल ससा जिंकला म्हणून त्याने फुशारायचे नाही. कारण तुम्हाला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी त्याला कुठे जमणार आहेत? आणि तुम्हीही निराश व्हायचे नाही, कारण धावण्यात नाही, पण इतर गोष्टीत तुम्हीही त्याच्यासारखे हुशार आहातच की! तेव्हा यापुढे घुबडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि नेहमीसारखे रोज एकत्र येऊन आपसात निखळ मैत्री ठेवा.’’
गोष्ट संपवून आजोबांनी मिश्कीलपणे हसत विचारले, ‘‘काय, कशी वाटली गोष्ट?’’
सगळे जण एकमेकांकडे पाहू लागले. मुलांचे चेहरे पाहून आजोबा म्हणाले, ‘‘अरे बाळांनो, या जगात कुणी एखाद्या कलेत तर कुणी अभ्यासात तर कुणी खेळात आपल्या परीने हुशार असेल. म्हणून कुणाचीच हुशारी किंवा श्रेष्ठत्व एका ठरावीकफुटपट्टीने ठरवता येत नाही. कुणीही तसे ठरवू नयेच. समजतंय का मला काय म्हणायचेय ते?’’
आजोबांच्या प्रष्टद्धr(२२४)्नाावर सर्वानी माना डोलावल्या; कारण आजोबांना काय सांगायचे होते ते मुलांना बरोब्बर समजले होते.
अलकनंदा पाध्ये  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Competition