मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com

भारतात करोना व्हायरसमुळे स्थानबद्धता जाहीर झाली आणि मनवा व ओमला आईने स्थानबद्धतेबाबतची अनेक उदाहरणं दिली. त्यामध्ये शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे ते अगदी नेल्सन मंडेलांपर्यंत खूप मोठमोठय़ा व्यक्तींचा दाखला तिने दिला. मनवा आणि ओमने या सगळ्यांबद्दल आजी-आजोबा, आई-बाबा यांच्याकडून किंवा गुगलवरून जशी जमेल तशी माहिती मिळवायची आणि ती लिहून फोनवरून किंवा शाळेच्या ग्रुपवरून आपल्या इतर मैत्रिणींना कळवायची हे पक्कं ठरलं. आई-बाबा सध्या घरात असल्यामुळे ते मदत करणार होतेच. सातवीतला ओम आणि पाचवीतील मनवा ही भावंडं हे ऐकून खरं तर खूश नव्हती; पण वेळ कसा घालवायचा हा प्रश्न सुटेल म्हणून तयार झाली एवढंच; पण जशी त्यांनी शिवाजीमहाराजांची गोष्ट वाचली तशी त्यांना खूप मजा वाटली आणि रोज नवीन गोष्टीची ते वाट पाहू लागले. आता घरातल्या माणसांना एकच काम उरलं, ते म्हणजे- उद्या कोणाची माहिती मिळवायची ते नाव फळ्यावर लिहायचं. ते नाव बघायचं आणि त्याची माहिती मिळवून लिहायची आणि मित्रांशी शेअर करायची. याची खूप मजा येत होती दोघांनाही. पण परवा आजोबांनी गंमतच केली. घरातल्या व्हाइट बोर्डवर नाव तर लिहिलंच नि त्याखाली चार ओळी लिहिल्या होत्या-

आली जरी कष्टदशा अपार।

न टाकिती धैर्य तथापि थोर।

केला जरी पोत बळेचि खाले।

ज्वाला तरी ते वरती उफाळे॥

‘‘आजोबा, हे कसलं गाणं?’’ मनवा म्हणाली.

‘‘अगं, या आमच्या वेळच्या शाळेतल्या कविता आहेत. जशा आठवतील तशा चार ओळी लिहून ठेवत जाईन. तुम्ही काय करा, या चार ओळी वाचाच आणि दोघांनी मिळून अशाच चार ओळी तयार करा.’’

आता मात्र मुलांना मजा वाटली आणि दोन दिवसांत त्यांच्या चार ओळी तयार झाल्याही.

राहू जरी घरी लहान थोर।

सोडू न आम्ही अमुचे घरदार।

आला जरी करोना मम देसी।

सोडु घर न आम्ही बहु प्रयासी।

या ओळींच्या शेजारी ओमने घरात बसलेल्या माणसांचं चित्रही काढलं होतं.

‘‘कशी वाटली ‘आमची’ कविता?’’ ओमने विचारलं.

‘‘आमची कसली, शेवटच्या दोन ओळी लिहायला आजीने मदत केलीय.’’ मनवा म्हणाली. पण आश्चर्य म्हणजे, आजोबा यावर चिडले नाहीतच. उलट घरातले सगळे खो खो हसले आणि त्यांनी मुलांच्या कवितेची तसेच ओमने काढलेल्या घराची मुक्तकंठाने तारीफ केली.

‘‘आता दुसरी कविता मी देते. त्या कवितेत म्हटल्यासारखं व्हायला नको म्हणून आपण घरी राहायचं आणि सतत हात धुवायचे. पण आमच्या वेळेची सगळ्यांची आवडती कविता होती ही.’’ आजी म्हणाली.

पडू आजारी। मौज हीच वाटे भारी॥

नकोच जाणे मग शाळेला।

काम कुणी सांगेल न मजला।

मऊ मऊ गादी निजावयाला।

चैनच भारी। मौज हीच वाटे सारी॥

यावर दिवसभरातच मुलांनी कविता केली-

राहूया घरी। मौज आम्हा न वाटे भारी।

सभोवती भिंतींचा खोडा।

संग कुणी नच खेळायाला।

कावुनि आमुचा जीव गेला।

पडू बाहेरी, मौज तीच वाटे भारी॥

पुन्हा एकदा त्यांनी आपली कविता सगळ्यांना दाखवली. बाबा जरा कुरबुरले. अजून चांगली जमली असती म्हणे! पण आजोबांनी खोडा, संग, कावुनि वगैरे शब्दांचं कौतुक केलं. ओमने परत परत हे शब्द माझे आहेत असं सांगून मनवाची चेष्टा करायची संधी सोडली नाही.

आता पुढची संधी आपोआपच बाबांना. त्यांनी लिहिलं-

लहानपण देगा देवा

मुंगी साखरेचा रवा

ऐरावत रत्न थोर

त्यासि अंकुशाचा मार॥

‘‘सोप्पं आहे.’’ दोघंही ओरडली आणि म्हणाली,

‘‘लहानपण नको देवा,

नाही शाळेचा विसावा

जीवा आनंद वाटेना

सल्ला मोठय़ांचा संपेना॥’’

‘‘शेवटची ओळ बदलायला हवी. नाही जमली बरोबर.’’ बाबा म्हणाले. पण आजी-आजोबांनी कौतुक म्हणून चॉकलेटही दिलं आणि बाबांना म्हणाले, ‘‘जमेल रे त्यांना हळूहळू.’’ आता आईने कविता दिली ती कवी वि. म. कुलकर्णी यांची-

‘‘आधी होते मी दिवटी।

शेतकऱ्यांची आवडती॥

झाले इवली मग पणती।

घराघरातून मिणमिणती॥’’

आई म्हणाली, ‘‘या कवितेवर चांगलं काम करा. ही पूर्ण कविता मिळवा. तिचा अर्थ समजून घ्या. उगाचच घाई करून काही तरी उरकू नका.’’ तेव्हापासून ओम आणि मनवा थोडे कोडय़ात पडल्येत. त्यांना मदत कराल का तुम्हीही?