मॅटिल्डा अँथनी डिसिल्व्हा
‘‘आई ऽऽ दुष्काळ म्हणजे काय गं?’’ नेहा शाळेतून येताच आपली शाळेची बॅग बाजूला ठेवायच्या आधीच आईकडे पोहोचली.

‘‘अगं, दुष्काळ म्हणजे अन्नधान्याची टंचाई, पाण्याची दुर्भिक्षता, औषधे, फळे अशा सगळ्याच वस्तू न मिळणे म्हणजे दुष्काळ.’’ आईनं सांगितलं.

‘‘पण आपल्याला तर या सगळ्या वस्तू मिळतात…’’ दुसरीत शिकत असलेल्या नेहाला कळत नव्हते.

‘‘काय असतं नेहा, आपण शहरात राहतो. शहरातील लोक नोकरी करतात. त्यांना महिन्याला पगार मिळतो. बर्याचदा शहरात सगळ्या वस्तू जास्त पैसे देऊन मिळू शकतात. पण गावाकडच्या लोकांचं तसं नसतं. मग ते काय करणार?’’ आई तिच्या परीनं समजावून सांगत होती.

‘‘का नसतात पैसे?’’ नेहाने अजाणता विचारले.

‘‘गावाकडच्या लोकांच्या छोट्या छोट्या जमिनी असतात. त्याच्यात ते वेगवेगळ्या भाज्या लावतात. त्यांची सगळी भिस्त पावसावर अवलंबून असते. पण काय झालं यावर्षी नीटसा पाऊसच पडला नाही.’’ आईनं सांगितलं.

‘‘त्यांना आपल्यासारखं नळातून पाणी येत नाही का?’’ नेहाला प्रश्न पडला.

‘‘नाही बाळा. शहरात ज्या आपल्याला सुविधा मिळतात त्या गावात नसतात. पाऊस नाही म्हणून पाणी नाही. पाणी नाही म्हणून भाज्या टिकत नाहीत. लावलेली शेती करपून गेली. मग ते लोकं काय करणार?’’ आईनं समजावलं.

‘‘म्हणजे आई, आपण गणपतीला चंदूमामाकडे गावाला गेलो होतो; तेव्हा ती शेजारी राहणारी छोटी गंगा काकड्या आणि शिराळा घेऊन आली होती. आमच्या शेतातल्या असं सांगत होती. तसेच का शेतकरी?’’ नेहाला आता थोडे थोडे समजू लागलं होतं.

‘‘हो गं माझे राणी… पण तुला का बरं हा प्रश्न पडला?’’ आईला कळेना.

‘‘आज आमच्या शाळेत बाईंनी सांगितलं की यावर्षी दुष्काळ आहे. दिवाळीत पाण्याचा वापर कमी करा. फटाके कमी वाजवा. खर्च कमी करा. गरीबांना मदत करा.’’ नेहानं सांगितलं.

‘‘असं होय?’’आईला आता समजलं.

दुसर्या दिवशी सकाळीच आईनं नेहा आणि तिच्या दादाला लवकरच उठवले. खरं तर आज सुट्टी होती.

‘‘नेहा चला… लवकर तयारी करा. आपल्याला बाजारात जायचं आहे.’’ आईनं फर्मान सोडलं.

‘‘कशाला गं आई?’’नेहानं विचारलं.

‘‘अगं दिवाळीची खरेदी करायची नाही का? तूच म्हणाली होतीस ना! तुला दिवाळीसाठी शरारा ड्रेस घ्यायचा आहे म्हणून?’’ आईनं आठवण करून दिली.

‘‘हो… मी सांगितलं होतं की. पण आता मला नको आहे तो.’’ नेहानं सांगितलं.

‘‘का गं?’’ आईला आश्चर्यच वाटलं.

‘‘आपण आता दोन फ्रॉक घेऊ. एक माझ्यासाठी आणि एक गावच्या गंगासाठी.’’ नेहा म्हणाली.

‘‘आई मलासुद्धा एक शर्ट-पँट घेशील तसाच गंगाच्या भावालाही घेऊ या.’’ दादालाही नेहाची कल्पना आवडली होती.

‘‘अरे व्वा! माझी दोन्ही मुलं अगदी शहाणी बाळं आहेत!’’ आईलाही आनंद झाला.

मग दिवाळीची सगळी खरेदी करताना दोघांनी आपल्यासारखेच कपडे, चप्पल, फटाकेसुद्धा गंगासाठी घेतले. दिवाळी जवळ आली तसे घरात बरेच फराळाचे पदार्थ आईनं बनवले. नेहाची आई दरवर्षी मामाकडे देण्यासाठी नेहमी जास्तच फराळ बनवत असे. पण यावर्षी तर तिनं अजून जास्त पदार्थ बनवले. चंदूमामा येऊन ते घेऊन जाणार होते. मग आईनं मामासाठी एक फराळाची पिशवी भरली. मग दुसर्या मोठ्या पिशवीत गंगा आणि तिच्या भावासाठी घेतलेले कपडे, फटाके,   फराळाचे पदार्थ आणि बरेच धान्य भरून चंदू मामाकडे पाठवून दिलं. ते बघून नेहा आणि तिचा दादा खूप खूश झाले.

फराळ मिळाल्यावर चंदूमामानं व्हिडीओ कॉल केला. तो गंगाच्या घरी गेला होता. 

‘‘नेहादीदी आणि दादा तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा! आमची आठवण ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. तुमच्यामुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकू.’’ गंगाचा दादा आणि आई सगळ्यांना धन्यवाद देत म्हणाली.

‘‘नेहा तुझं आणि दादाचं आम्हा आईबाबांना खूप कौतुक वाटतं. तुमच्यामुळे त्यांचीही दिवाळी आनंदाची होणार.’’ बाबांनी दोघांना जवळ घेऊन त्यांची पाठ थोपटली. नेहाचा आणि दादाचाही आनंद द्विगुणित झाला. म्हणतात ना…

‘‘दिवाळी सण मोठा… नाही आनंदा तोटा…

matildadsilva50@yahoo.co.in