बालमित्रांनो, गणपती घरी येणारेत ना आता? खूप धमाल चालली आहे ना घरात? त्याच्या आवडीचे मोदक केले जातील. आपणही त्यावर ताव मारूच. गणेशाला जास्वंदीची फुलं वाहिली जातील. बरोबरच दुर्वांची जुडीही भक्तिभावाने अर्पण केली जाईल. आज आपण या दुर्वांबद्दलच विचार करू या.
दुर्वा हे खरं तर एक सामान्य गवत, पण सगळ्या ऋतूत आपलं टवटवीत हिरवेपण जपणं हे या गवताचं वैशिष्ट्य. उन्हाळ्यात पाणी कमी असतं; परंतु दुर्वा त्याबद्दल तक्रार करत नाहीत. त्या काळातही आपलं टवटवीतपण टिकवून ठेवतात. प्रतिकूल परिस्थितीतही सामान्य राहणं ही सवय खरंच सर्वांना आकर्षित करून घेणारीच आहे, नाही का? दुर्वांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिची सतत होणारी वाढ. ही वाढ होताना दुर्वा फक्त पुढे पुढे जात नाहीत तर प्रत्येक ठिकाणी आपलं मूळ रुजवत असतात आणि त्या ठिकाणी नवीन रोपही तयार करतात. त्यांच्या पानांच्या रचनेतही एक प्रकारची शिस्त आढळते. टोकाची पानं नेहमी तीन किंवा पाच या संख्येत असतात. एवढं असूनही त्याबद्दल कोणताही गर्व नाही म्हणूनच ती अत्यंत थंड प्रवृत्तीची मानली जाते.
नेहमी शांत राहिलं, जीवनाला शिस्त लावून घेतली तर आपण आपला तजेला कायम राखू शकतो. त्याबरोबरच प्रगती करत करत जिथं जाऊ तिथं आपलं महत्त्वाचं स्थान निर्माण करू शकतो आणि मुख्य म्हणजे गणरायाचे लाडके होतो. पटतंय ना?
joshimeghana.23 @gmail.com
