मूळं

‘‘मी आजवर एकपण झाड तोडलेलं नाही. झाडं तोडण्याची शायनिंग हे मोठे लोक मारतात.

|| फारूक एस.काझी

‘‘अगं, काय झालं माझ्या चिमणीला?’’ आत्याने छोट्या अनुष्काला विचारलं.

भरलेल्या डोळ्यांनी अनुने आत्याकडे पाहिलं.

‘‘ओहोऽऽऽ माझ्या चिमणीला मम्मीची आठवण आली वाटतं?’’

‘‘हुम्म्…’’

‘‘अगं, रडतेस कशासाठी? तूच म्हणालीस ना, शरूदीदीसोबत खेळायला जायचंय म्हणून? इतक्यात कंटाळलीस?’’

‘‘मला मम्मीकडे जायचंय!’’

‘‘बरं जाऊ या आपण. आता जेवणाची वेळ झालीय. आधी गरम गरम चपाती आणि दूध-भात खायचा… मग जायचं.’’

सगळे जेवायला बसले. पण चिमणीचं मन काही केल्या लागेचना. तिला मम्मीची, भय्याची खूप आठवण येत होती. पप्पांच्या कुशीत झोपल्याशिवाय तिला झोपच लागत नसे.

सकाळी आत्या गावी आली आणि शरूदीदीपण. तिच्यासोबत मला जायचंय म्हणून चिमणी हट्ट करून रडू लागली. अवघ्या सात वर्षांची चिमणी… तिथे आपल्याशिवाय एकटी राहील का? मम्मीला काळजी वाटत होती. शेवटी तिचा नाइलाज झाला. पाठवलं तिला शरूदीदीसोबत.

तिचा उतरलेला चेहरा बघून आत्याने तिला खाऊ घातलं. लाडाने गालावरून हात फिरवले. मोबाईल दाखवला. पण चिमणी काही केल्या हसेना. बाहेर अंधार वाढू लागला तशी चिमणी आणखीनच उदास झाली. घाबरी झाली.

‘‘चिऊ, चल… आपण चित्रं काढू यात. मी एक कागद  देते तुला. तू चित्र काढ आणि रंगव…’’ शरूदीदी म्हणाली.

चिमणीने होकार देत मान हलवली.

कागदावर रंगांनी खेळायला तिला जाम आवडायचं. तिला खूप मज्जा यायची. त्या चित्रात पप्पा असायचे. मम्मी असायची. भय्या असायचा. केक आणि छोटी मनीमाऊ तर असायचीच असायची. पण आज तिच्या चित्रात म्हणावे तसे रंग भरेनात. मन उदास आणि एकाकी झालेलं.

चित्रात मम्मी, पप्पा आणि फक्त भय्याच होते. केक आणि मनी गायब झालेले. तिला जे हवं होतं ते कागदावर आलेलं… मनातलं. बघता बघता तिचं चित्र जिवंत झालं. ते तिघं मैदानात खेळत होते, हसत होते. आणि त्यात स्वत: चिमणी मात्र कुठंच नव्हती. ती आणखीनच घाबरली.भेदरून गेली. त्यांना हाका मारू लागली. ओरडू लागली. पण तिचा आवाज काही केल्या त्यांना ऐकूच जाईना. ती मोठमोठ्यानं ओरडत होती… रडत होती. चिमणीने दुसरा कागद घेतला. पण त्यावर आधीच एक झाड काढलेलं होतं. तिने त्यावरच स्वत:चं चित्र काढलं. आणि ते चित्रही जिवंत झालं. चिमणी दुसऱ्या कागदावरच्या चित्रात गेली. तिथं तिला मम्मी, पप्पा आणि भय्या कुठेच दिसेनात.

‘‘माझी चूक झाली. माझं चित्र मी वेगळ्या कागदावर काढायला नको होतं. आता काय करू?’’

ती इकडे तिकडे भटकू लागली. तिचं लक्ष झाडाकडे गेलं. ते अगदी वाकून बसलेलं झाड होतं. चिमणीनेच काढलेलं.

‘‘झाडोबा, तू असा का वाकलायस?’’

‘‘खुडखुडखुड… तूच मला असं केलंयस. माझी पाठ वाकवून ठेवलीयस. म्हातारा करून टाकलंयस मला.’’

झाड आपल्या दोन-चार फांद्या रागाने हलवत बोललं.

‘‘उंच झाडं काढून काय फायदा? मला कसं काय चढता येईल मग? चिंचा, आंबे खायचे झाले तर कसे खायचे? मोठी माणसं मोठी झाडं काढतात. लहान मुलं अशी वाकलेली झाडं. छोटीशी.  समजलं?’’

चिमणी पण गुरगुरली.

झाडाने गुमान माघार घेतली. पप्पांसारखी.

‘‘झाडोबा, मला माझ्या मम्मी, पप्पा आणि भय्याकडे जायचं आहे. तू मला मदत कर. झाडं खूप चांगली असतात. ती सर्वांना मदत करतात. मग तू कर ना मला मदत.’’

‘‘हो, मदत करतात म्हणून तुम्ही आम्हाला तोडता… मारून टाकता.’’

‘‘काय म्हणालास?’’

‘‘काही नाही… मला नाही मदत करता येणार. सॉरी.’’

चिमणी हिरमुसून गेली.

झाड हसू लागलं.

‘‘मी आजवर एकपण झाड तोडलेलं नाही. झाडं तोडण्याची शायनिंग हे मोठे लोक मारतात. आणि आम्हाला सांगतात, ‘झाडं लावा, झाडं जगवा.’ म्हणजे झाडं आम्ही लावायची आणि यांनी तोडायची. सगळा उफराटा कारभार!’’

चिमणी एखाद्या पोक्त बाईसारखी बोलत होती.

झाड म्हणालं, ‘‘तू माझा एक मित्र त्या चित्रात काढला आहेस. मी त्याच्याशी बोलून बघतो.’’

‘‘तू कसं काय बोलणार त्याच्याशी? तुझ्याकडे कुठं मोबाईल आहे? मी चित्रात मोबाईल नाही काढलाय.’’

‘‘अगं, आम्ही आमच्या मुळांनी एकमेकांशी संपर्क करतो. बोलतो. एकमेकांची हालहवाल विचारतो. आमचं नेटवर्क आहे ते!’’ असं म्हणून झाड सळसळून हसलं.

झाडाने आपल्या मुळांच्या साहाय्याने मित्राच्या मुळांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण शोध काही लागेना.

‘‘काय झालं झाडोबा? सापडली का मुळं?’’

‘‘नाही. पाणी शोधत शोधत मुळं खूप खोल गेलेली दिसताहेत त्याची. आणखी थोडा वेळ प्रयत्न करतो.’’

झाडाने पुन्हा अंदाज घेतला. आणि… आणि त्याला संदेश मिळाला. झाड काहीतरी पुटपुटतंय असं चिमणीला वाटलं. झाडाने फांद्या हलवून कुणाला तरी बोलावलं. इतक्यात एक मोठाली घूस तिथं आली. तिला बघून चिमणी घाबरली. घुशीला बघून तिला किळस आली.

झाडाच्या फांदीने घुशीच्या कानात काहीतरी सांगितलं. घूस पटकन् झाडाच्या खाली बुंध्याजवळ उकरू लागली. तिने भलामोठा खड्डा खोदायला सुरुवात केली. बघता बघता घूस गायब झाली. चिमणी खड्ड्यात घाबरत घाबरत वाकून बघू लागली.

‘‘थांब… तुला त्यातूनच पलीकडे जायचं आहे. घाबरू नकोस.’’

‘‘ही घूस कुठून आली? मी तर काढलीच नव्हती.’’

‘‘तूच काय, पण सहसा कुणीच तिचं चित्र काढत नाही. पण तीच आज आपल्या कामी आली. चित्राच्या मागे पण एक चित्र लपलेलं असतं. झाड आलं तर नुसतं झाड येत नाही… त्याची मुळं येतात… त्यावरची पाखरं, त्यांची घरटी येतात… विशाल आकाश आणि झुळझुळ वाहणारा वाराही येतो. पण माणसाला नाही समजणार हे. त्याला निसर्ग वाचता येत नाही. तो फक्त त्याला लुबाडतो… लुटतो.’’

चिमणीला थोडं थोडं समजलं… बाकी सारं डोक्यावरून गेलं. पप्पापण असंच काहीसं सांगत असतात. झाडपण पप्पांसारखंच बोलतंय. अचानक समोर आलेल्या घुशीला बघून चिमणी दचकून मागेच सरकली. पडली.

‘‘चिऊबाई, आता त्या बिळातून जायचं. घाबरायचं नाही. नीट जायचं.’’

तिने झाडाला मिठी मारली. घुशीला ‘थँक यू’ म्हणत तिने त्या मोठ्या बिळात उडी मारली. आतला अंधार बघून ती खूप घाबरली. आणि ‘‘मम्मीऽऽऽ… पप्पाऽऽऽ!!’’ असं जोरात ओरडू लागली. रडायला लागली.

 

‘‘चिऊ, काय झालं रे बाळा? घाबरलीयस का? स्वप्न पाहिलंस वाटतं?’’

मम्मीचा आवाज आला आणि चिमणी ताडकन् उठून बसली.

‘‘तू कधी आलीस? आणि पप्पा? भय्या?’’

‘‘सगळे आलोय आम्ही. तू आठवण काढत होतीस असा आत्याने फोन केला. मग काय, तुझ्या पप्पांना कुठला दम निघायला? निघालो. अर्ध्या तासात इथं!’’

चिमणीने आईला मिठीच मारली.

‘‘तू झोपेत काहीतरी बडबडत होतीस…’’ पप्पांचा आवाज आला.

‘‘काही नाही हो पप्पा. पण तुम्ही लोक मला एकटीला कधीच सोडून जाऊ नका. मला तुमची खूप खूप आठवण येते.’’

पप्पा हसले. भय्या चेकाळून हसत होता.

‘‘मागं लागून आलीस ना सकाळी? मग आता असं कसं होतंय?’’ असं म्हणून तो मोठ्याने हसत सुटला. यावर सगळेच हसायला लागले.

चिमणी मात्र मम्मीच्या कुशीतून पप्पांच्या कुशीत आली आणि पुन्हा गाढ झोपी गेली. तिला तिची मूळं सापडली होती.

farukskazi82@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Faruk s kazi article obstinacy sparrow story akp