श्रीनिवास बाळकृष्ण shriba29@gmail.com

मागच्या रविवारी आपण आवडत्या- नावडत्या पदार्थांना एकाच ताटात घेऊन पाहिले आणि खाद्यपदार्थाचे मजेदार कॉम्बिनेशन बनवले. आज आपण एकाच खाद्यपदार्थाला ‘आर्ट फॉर्म’मध्ये बदलणार आहोत. या प्रकाराला तुम्ही ‘फूड आर्ट’ म्हणू शकाल. तसं तुम्ही बिनधास्त काहीही म्हणा रे! मात्र, यासाठी तुम्हाला दोन अतिमहत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत- ज्या तुमच्याकडे असतीलच असं गृहीत धरलंय मी. त्यातली एक गोष्ट म्हणजे एखादा चांगल्या ‘आकारा’चा खाद्यपदार्थ.. जसं की वडापाव, बर्गर, पिझ्झा, समोसा, चकली, भजी, चिकन लॉलीपॉप, घट्ट  दही, मासा, कचोरी, इत्यादी. असा स्वस्त आणि सहज मिळणारा, ठरावीक आकार असलेला कुठलाही पदार्थ घ्यायचा. ही पहिली महत्त्वाची वस्तू मिळाल्यावर त्या पदार्थाला पांढऱ्या किंवा काळ्या कागदावर ठेवा. तसा एक कुठलाही प्लेन रंगाचा कागद किंवा बॅकग्राऊंड चालेल. मग तुम्हाला तासाभरासाठी एक स्मार्टफोन लागेल.. ज्यातून या पदार्थाचे क्लोजअप (जवळून) फोटो घ्यायचे. 

तुमचं दुसरं महत्त्वाचं काम पूर्ण झालं. काढलेल्या फोटोंपैकी चांगला फोटो निवडायचा.  आता थोडी कठीण स्टेप सुरू होणारेय. ती म्हणजे सोपा बॅकग्राऊंड रिमूव्हर अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये घ्या. तो वापरून खाद्यपदार्थ सोडून बाकीचे सर्व इरेज करा. हा फोटो (पदार्थ) पांढऱ्या बॅकग्राऊंडवर सेव्ह करा. आता पेंटसाठी दुसरं सोपं अ‍ॅप डाऊनलोड करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट लागेल ती म्हणजे तुमच्या जगावेगळ्या कल्पना. त्या तुम्ही कुठे अडगळीत टाकल्या असतील तर शोधा. पुन्हा कानातून डोक्यात भरा. भरल्या? ग्रेट!

आता या पदार्थाच्या बाजूला काहीतरी भन्नाट आणि मजेशीर करा! ही कल्पना करताना तो खाद्यपदार्थ आहे, हे मात्र विसरून जा.

मित्रांनो, स्मार्टफोन, त्यातले दोन अ‍ॅप किंवा एडिटिंग यापैकी काहीच माहीत नसेल तर तुम्ही गूगलवरून आवडत्या पदार्थांचे फोटो सरळ कलर पिंट्र करा किंवा वर्तमानपत्रात, मॅगझिनमध्ये आलेले फोटो कापा. त्यांना पांढऱ्या कागदावर चिटकवा. पुन्हा त्यांच्या आजूबाजूला भन्नाट काहीतरी काढून रंगवा. म्हणजे चित्रात खाद्यपदार्थही दिसला पाहिजे आणि तुमची जगावेगळी कल्पनाही! आणि हे फोटो मला नक्की पाठवा.